पशुधनाचे पावसाळ्यातील व्यवस्थापन
1 min read🐂 निवारा व्यवस्थापन
ग्रामीण भागामध्ये बहुतांश भूमिहीन पशुपालक किंवा लहान शेतकरी पशुपालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करत असतात. बऱ्याच वेळा जनावरांच्या निवाऱ्यासाठी कोणताही खर्च न करता नैसर्गिकरित्या झाडांच्याखाली निवारा केला जातो किंवा कमी खर्चात पारंपारिक पद्धतीने निवाऱ्याची सोय केली जाते. ही सोय साधारणपणे उन्हाळ्यात उपयोगी ठरते. परंतु, पावसाळ्यात या जनावरांना थंड वातावरण व पाऊस यांचा सामना करावा लागतो. जनावरे जास्त वेळ अशा थंड आणि पाऊसाच्या वातावरणात राहिल्यास फुफ्फुसदाह, घटसर्प, स्तनदाह यासारख्या आजारांना बळी पडू शकतात. म्हणून पावसाळ्यात गायी म्हशींना थंड हवा व पावसाचे पाणी यांपासून परिपूर्ण संरक्षण देण्यासाठी पक्क्या गोठ्याचा निवारा देण्यात यावा. गोठ्यातील जमीन ही कोरडी व स्वच्छ ठेवावी. जेणेकरून कासेतून सडात होणारा जीवाणूसंसर्ग टाळता येईल. तसेच गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये जनावरांना आराम वाटेल एवढी जागा दिली पाहिजे तसेच गोठ्यात जनावरांची गर्दीही टाळली पाहिजे.
🐂 कीटकांचे व्यवस्थापन
पावसाळ्यामध्ये विविध जातींच्या माश्या, मच्छर, चिलटे, गोचीड अशा वेगवेगळ्या कीटकांची उत्पत्ती ही मोठ्या जोमाने होत असते. हे कीटक विविध जीवाणूजन्य तसेच प्रजीवजन्य आजार निरोगी जनावरांत संक्रमित करू शकतात. यामध्ये सरा, गोचीडताप, शेळ्या-मेंढ्यामध्ये नाकामध्ये माश्यांच्या हल्ल्यामुळे होणारी मेंदुबाधा (फाल्स गिड) यासारख्या आजारांचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून येते. म्हणून जनावरांची चरावयास गेल्यावर तसेच गोठ्यातील निवाऱ्यात असतानाही योग्य ती काळजी घेवून जनावरांचे कीटकांपासून संरक्षण केले पाहिजे. गोठा तसेच जनावरे यांचे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने नियमित बाह्यपरजीवीनाशक औषधांची फवारणी करून कीटकनिर्मुलन केले पाहिजे. तसेच गोठा व परिसराची स्वच्छता राखली पाहिजे. सरा या आजारास कारणीभूत ठरणाऱ्या माश्या प्रखर सूर्यप्रकाशात जनावरांना चावा घेवून त्याद्वारे सरा आजाराच्या प्रजीवांचे संक्रमण निरोगी जनावरांत करतात. म्हणून सरा आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी ज्या भागात आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो, तिथे पावसाळ्याच्या दिवसात चराऊ जनावरे प्रखर सूर्यप्रकाशात चरावयास सोडणे टाळावे. त्याचप्रमाणे आजाराचा जास्त प्रादुर्भाव असल्यास आजाराच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना टोचून घ्यावीत.
🐂 खाद्य व्यवस्थापन
पावसाळ्याच्या दिवसांत मुबलक हिरवा चारा असल्याने पशुपालकांचा कल हा जनावरांना फक्त हिरवा चारा देण्याकडे असतो. परंतु, कोणताही ऋतू असला किंवा उत्पादकतेची कोणतीही स्थिती असली तरी जनावरांना संतुलित व सर्वसमावेशक चारा नियमितपणे देण्यात यावा. यामध्ये हिरवा चारा, सुका चारा, खुराक तसेच खनिजक्षार मिश्रण यांचा समावेश असावा. दुधाळ जनावरांना तसेच गाभण जनावरांना त्यांच्या उत्पादकतेच्या गरजेनुसार आहारात वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे सर्व खाद्यघटकांची साठवण ही कोरड्या ठिकाणी करण्यात यावी. पावसाळ्याच्या दिवसांत कोणत्याही प्रकारे खाद्यास ओलसरपणा येणार नाही किंवा त्याला बुरशी लागणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे आपल्या पशुधनास मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे.
🐂 प्रतिबंधात्मक लसीकरण
जनावरांमध्ये प्रामुख्याने जीवाणूजन्य व विषाणुजन्य आजार हे खूप महत्त्व8 असून, अशा रोगांची साथ ही पावसाळ्याच्या सुरूवातीस मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामध्ये आजारी जनावरांची मरतुक होते, बाधित जनावरांची उत्पादकता कमी होते तसेच कळपातील बाधित जनावरांकडून निरोगी पशूना अशा आजारांचे संक्रमण होऊ शकते. याव्यतिरिक्त आजारी जनावरांच्या औषधोपचारावरही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. म्हणून पावसाळ्यापूर्वी गायी म्हशींमध्ये संसर्गजन्य आजारांप्रति लसीकरण करून घेण्यात यावे, त्याचप्रमाणे वर्षभरात आढळून येणाऱ्या सर्वच संसर्गजन्य आजारांसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लसीकरण करून घ्यावे.
©️ डॉ. अनिल भिकाने
संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
संपर्क :- 9420214453
मेल :- anilbhikane@mafsu.in
©️ डॉ. रवींद्र जाधव
सहायक प्राध्यापक, चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जिल्हा लातूर.
संपर्क :- 9404273743
मेल :- jadhavrk11@gmail.com