krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

गायी-म्हशींना पावसाळ्यात होणारे विविध संसर्गजन्य आजार

1 min read
पावसाळा हा शेती व पशुपालन व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा ऋतू मानला जातो. उन्हाळ्यातील उष्ण व कोरडे वातावरण बंद होवून पावसाळ्यात हवेतील आद्रता वाढून दमट उष्ण प्रकारचे किंवा जास्त काळ पाऊस लागून राहिल्यास थंड वातावरण आढळून येते. पावसाळ्याधील हवामान हे संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या विविध कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर पशुंचे शास्त्रोक्त संगोपन करण्यात कसूर झाल्यास, संतुलित आहार न पुरविल्यास, प्रतिकूल वातावरणात आवश्यक निवारा न दिल्यास तसेच कीटकांपासून संरक्षण न केल्यास अशी जनावरे विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात. पावसाळ्यात योग्य निवारा न देता जनावरे वेळोवेळी पावसात भिजल्यास किंवा उष्ण व दमट वातावरणात जास्त काळ राहिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमी होवून ती विविध आजारांना बळी पडू शकतात. पावसाळ्यात पावसाळा जनावरांत प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या, फुफ्फ्सदाह (निमोनिया), सरा, स्तनदाह, गोचीडताप इत्यादी आजार आढळून येतात.

🐂 घटसर्प
घटसर्प हा जीवाणूजन्य आजार पास्चूरेला मल्टोसिडाया जीवाणूमुळे सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या सुरवातीला म्हशी व गोवंशामध्ये आढळून येतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हवामानात अचानक होणारे बदल, वातावरणात वाढलेली आद्रता व प्रवास किंवा तत्सम गोष्टीमुळे येणारा ताण यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होवून ती घटसर्प आजारास बळी पडतात. बाधित जनावरांमध्ये भरपूर ताप (104-106 फॅरनहाइट) येणे, डोळे लालबुंद होणे, थरथर कापणे, तोंडातून लाळ गळणे, नाकातून पाणी गळणे, ठसकने, खोकणे / शिंकणे अशी लक्षणे दिसून येतात. आजारी गायी, म्हशींना घाटीवर गरम सूज येवून श्वसनास त्रास होतो व श्वसनादरम्यान घरघर असा आवाज येतो. आजाराची तीव्रता जास्त असल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. या आजारावर उपचारपद्धती उपलब्ध आहे. परंतु सुरुवातीच्या टप्प्यात आजाराचे निदान होणे गरजेचे आहे. जेणेकरून पशुवैद्यक योग्य उपचार करू शकतात. घटसर्प आजाराचा संपूर्ण प्रतिबंध हा शक्य आहे. घटसर्प आजाराप्रती उपयुक्त अशी लस उपलब्ध असून, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतल्यास जनावरांना घटसर्प आजारापासून संपूर्ण संरक्षण मिळू शकते.

🐂 फऱ्या
फऱ्या हा आजार गोवंशामधील महत्वाचा जीवाणूजन्य आजार असून, याचा संसर्ग हा प्रामुख्याने 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील उत्तम मांसल बांधा असलेल्या गोऱ्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या जीवाणूंचा संसर्ग डोंगराळ भागामध्ये बाधित चाऱ्यातून होतो. बाधित जनावरांमध्ये ताप येणे (105-106 फॅरनहाइट), खाणे-पिणे बंद होणे, फऱ्यामध्ये अचानकपणे गरम वाटणारी व वेदनादायी सूज येणे व सुजेवर हात फिरवल्यास चरचर असा आवाज येणे ही लक्षणे दिसून येतात. बाधित जनावराला उठण्यास किंवा चालण्यास त्रास होतो, जनावर लंगडत चालते. आजार जास्त तीव्र असल्याने तत्काळ उपचार न झाल्यास बाधित जनावर दगावते. या जीवाणूजन्य आजारात उपचारापेक्षा लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत महत्त्वाचा असल्याने पावसाळ्यापूर्वी या आजाराप्रति लसीकरण करुन घेणे फायद्याचे ठरते.

🐂 सरा
सरा हा प्रजीवजन्य आजार असून, त्याचा प्रसार हा मुख्यत्वे पावसाळ्यामध्ये टॅबॅनस तसेच स्टोमोक्सिस, हिमॅटोबिया, हिमॅटोपोटा इत्यादी प्रवर्गातील रक्त शोषणाऱ्या माशांच्या चाव्यामुळे होतो. या आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरणाऱ्या… प्रामुख्याने टॅबॅनस माश्या प्रखर सूर्यप्रकाशात चरावायास जाणाऱ्या जनावरांवर हल्ला चढवितात. या आजाराचे संक्रमण करतात बाधित जनावरांमध्येभरपूर ताप येणे (105-106 फॅरनहाइट), गोलगोल फिरणे, तोल जावून खाली पडणे, आंधळेपणा येणे डोळे पांढरे पडणे / कठीण वस्तूंवर डोके आपटणे, घासणे, तोंडातून लाळ श्रवणे अशी लक्षणे तीव्र स्वरूपाच्या आजारात आढळून येतात. आजारी जनावरे 2-3 दिवसात मृत्यू पावतात. मध्यम स्वरूपाच्या सरा आजारामध्ये जनावर सुस्थ राहणे, डोळ्यातून निरंतर पाणी येणे, वजन घटणे, अधूनमधून ताप येणे, पायांना, पोटावर तसेच छातीला सूज, येणे, लसिका ग्रंथी सुजणे, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा (कॉर्निया) पांढरा पडणे, मादी जनावरात गर्भपात होणे, प्रजनन समस्या उद्भवणे अशी लक्षणे दिसून येतात. चेतासंस्थामेंदूस इजा झाल्यास पक्षाघात, चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसतात. आजारी जनावरे 15दिवस ते 2 महिन्याच्या आजारानंतर दगावतात. या आजारावर विविध गुणकारी औषधे उपलब्ध असून, ती बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देवून घेतल्यास बहुतांश जनावरे ही आजारातून बरी होतात. या आजारास कारणीभूत ठरणाऱ्या माश्या प्रखर सूर्यप्रकाशात म्हशींवर हल्ला चढवितात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात जनावरे गोठ्यात बांधून त्यांचे कीटकांपासून संरक्षण करावे तसेच गरजेप्रमाणे नियमित बह्यापरजीवी कीटकनाशकांची फवारणी करावी. ज्या भागामध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो, त्या भागामध्ये आजाराच्या प्रतिबंधासाठी पशुवैद्यकाकडून सरा प्रजीव प्रतिबंधक औषधे दिल्यास हा आजार टाळता येतो.

🐂 गोचीडताप
भारत हा उष्ण कटिबंधात येत असल्यामुळे येथील वातावरण हे जनावरांमधील बाह्यपरजीवींच्या प्रजननास फायदेशीर ठरते आणि त्याचमुळे जनावरांच्या गोठ्यात व अंगावर विविध बाह्यपरजीवींची उत्पती ही खूप मोठ्या प्रमाणत होत असते. यामधील गोचीडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांत विविध गोचीडजन्य तापाच्या प्रजीवजन्य परजीवींचे संक्रमण होते. गोचीडताप हा दुभत्या जनावरांमधील आर्थिकदृष्ट्या अत्यंत महात्त्ववाचा आजार असून, यामध्ये थायलेरीया, बबेसिया व ॲनाप्लास्मा हे प्रजीवजन्य जीवाणू आजारास कारणीभूत ठरतात. बाधित जनावरांमध्ये भरपूर ताप येणे, दुध उत्पादन कमी होणे, खाणे-पिणे मंदावणे किंवा बंद होणे, पिवळ्या किंवा लालसर रंगाची लघवी होणे अशी लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपाच्या गोचीड तापामध्ये जनावर रक्तक्षय होवून दगावू शकते, त्याचप्रमाणे आजाराच्या उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागतो आणि त्यातून पशुपालकांना खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. गोचीडतापाच्या निर्मुलनासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे, गोठा व जनावरांची नियमित गोचीडनाशक औषध फवारणी करने इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबल्यास गोचीड निर्मुलन करता येते व अनमोल पशुधनास प्राणघातक आजारांपासून वाचवता येते.

🐂 स्तनदाह
स्तनदाह हा दुधाळ जनावरांमधील आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा संसर्गजन्य आजार असून, त्याचा गोठ्यातील अस्वच्छता व ओलसरपणा या घटकांमुळे होतो. गायी गोठ्यात बसल्यानंतर शेण, लघवी व इतर घटकांमधून जीवाणूंचे सडातून संक्रमण होवून बाधित गायी-म्हशींमध्ये कासेला सूज येणे, कास गरम लागणे, काहीवेळेस ताप येणे, चारा, पाणी कमी करणे अशी लक्षणे दिसून येतात. बाधित सडांतून खराब रक्तमिश्रित किंवा पुमिश्रित किंवा जास्त पाणीयुक्त दुध येणे, दुधामध्ये गाठी किंवा शिंतोडे दिसणे अशी लक्षणे दिसून येतात. या सर्वांचा परिपाक होवून बाधित जनावरांचे दुध उत्पादन कमी होते. या आजारावर उपचार उपलब्ध असून, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार केल्यानंतर चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळून आजाराची तीव्रता कमी होते. आजाराच्या कालावधीमध्ये बाधित सडातील दुध वार काढून टाकल्यास आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होते. दुध काढताना व इतर वेळी गायी-म्हैशी, गोठा व परिसर स्वच्छ व कोरडा राहील याची काळजी घेणे आवश्यक असते. तसेच दुध काढून झाल्यानंतर गायी-म्हशी किमान अर्धा तास खाली बसणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

@ डॉ. अनिल भिकाने
संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
संपर्क :-
9420214453
मेल :-
anilbhikane@mafsu.in
@ डॉ. रवींद्र जाधव
सहायक प्राध्यापक, चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जिल्हा लातूर.
संपर्क :-
9404273743
मेल :-
jadhavrk11@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!