krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

कापूस पिकावरील कीड व रोगांची ओळख

1 min read

🐞 मावा
✳️ माव्याचा जीवनक्रम :-
मावा हा कीटक लहान (1 ते 2 मिमी ), मऊ शरीर असलेले पिवळसर, हिरवट, तपकिरी किंवा काळसर हिरवट रंगाचे असून, झाडाच्या कोवळ्या भागावर आढळतो. या किडीच्या पोटावरील भागावर दोन सुक्ष्म नलिका असून, त्याद्वारे ही कीड चिकट, गोड द्रव बाहेर टाकते. हा द्रव खाण्यासाठी मुंग्या रोपावर आढळतात. या मुंग्याच्या पाठीवर माव्याची पिले बसून ती एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जातात. ही कीड अंडी घालीत नाही. तिचे प्रजनन संयोगाविना होत असते. माद्या बिन पंखाच्या, आकाराने मोठ्या, फिक्कट रंगाच्या असतात. एक मादी दररोज 8 ते 22 पिलांना जन्म देते. पिले चार वेळा कात टाकून प्रौढावस्थेत जातात. किडीची वाढ 7 ते 9 दिवसात पूर्ण होऊन प्रौढ मावा 2 ते 3 आठवडे जगतो. वर्षभरात 12 ते 14 पिढ्या उपजतात.
✳️ माव्यापासून होणारे नुकसान :-
मावा हा कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूला समूहाने राहून रस शोषतो. परिणामी, झाडे कमजोर होऊन पाने मुरडतात. पानांचा रंग फिक्कट पडतो. माव्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास झाडे कापल्यासारखी दिसतात. यामध्ये जुन्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे नुकसान अधिक होते. पावसामुळे मावा धुवून खाली जमिनीवर पडतो व मरतो. खडकाळ, हलक्या जमिनीत किंवा भारी चिकण जमिनीत कापसाच्या मुळ्या शिरत नाहीत. अशा झाडांवर मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो. माव्यामुळे कापसावर चिकटा येतो.
✳️ मावा किडीचे नैसर्गिक शत्रू :-
लेडीवर्ग बिटल (ढाल किडा किंवा कॉक्सीनेलीड कीटक) हे कीटक मावा कीड खावून आपली भूक भागवितात. तसेच क्रायसोपा व सिरकीड माशी (हॉपर फ्लाय ) मावा किटक खातात. चाल्सीड नावाचे परजीवी कीटक मावा किडीची संख्या वाढू देत नाही.

🐞 तुडतुडे
फिक्कट हिरव्या रंगाचे प्रौढ कीटक पानावर तिरकस चालतात. नर व मादीचे मीलन झाल्यावर मादी 2 ते 7 दिवसांनी पानांच्या वरील पृष्ठभागावरील शिरामध्ये 1-1 पिवळी अंडी घालते. एक मादी 30 ते 40 अंडी घालते. अंडी घालण्यासाठी 35 ते 40 दिवसाची कापसाची पाने आवडतात. 4 ते 11 दिवस अंडी अवस्था राहते. पिल्ले पानांच्या खालील पृष्ठभागावरून रस शोषतात. 21 दिवसात त्यांची वाढ पूर्ण होते. तुडतुडे मोठे होताना दर 2-3 दिवसांनी कात टाकतात. दिवस पानांच्या खालील बाजूस व रात्री पानांवरील बाजूस आढळतात. मादीशी संगम न झालेले तुडतुडे 3 महिन्याहून अधिक काळ जगतात. संगम झालेले तुडतुडे उन्हाळ्यात 5 आठवड्यापेक्षा व हिवाळ्यात 7 आठवड्यापेक्षा अधिक काळ जगत नाहीत. ऋतुमानानुसार 15 ते 16 दिवसात जीवनक्रम सुरू होतो. वर्षभरामध्ये 11 पिढ्या तयार होतात.
✳️ तुडतुड्यांपासून होणारे नुकसान :-
प्रौढ तुडतुडे व पिल्ले पानांतील रस शोषतात व पानांच्या पेशीत ओली विषारी लाळ टाकतात. त्यामुळे पानांची कडा प्रथम फिकट हिरवी व नंतर पिवळी आणि शेवटी विटकरी लाल ते तपकिरी दिसते. पानांचा रंग बदलून पाने वाळू लागतात व नंतर गळतात. झाडांची वाढ खुंटते. परिणामी, फुलांची व बोंडांची संख्या घटते. कापसाचे उत्पादन कमी, वजन कमी भरून कापसाची प्रत ढासळते. या किडीचा प्रादुर्भाव लवकर पेरणी केलेल्या पिकामध्ये अधिक जाणवतो. पूर्ण वाढ झालेल्या पण अद्याप पंख न फुटलेला लहान तुडतुड्यापासून जास्त नुकसान होते. ही कीड पानांच्या शिरेमध्ये सुईसारखी सोंड खुपसून पानातील रस शोषतात.
✳️ तुडतुड्याचे नैसर्गिक शत्रू :-
दोन प्रकारचे क्रायसोपा तुडतुडे खातात. लेडीबर्ड बिटल (ढाल किडा) बरेच प्रकारचे कोळी (अष्टपदी) व मुंगळे हे तुडतुड्यांचे शत्रू आहेत. मात्र, या नैसर्गिक परजीवी कीटकांचा परिणाम तुडतुड्यांची संख्या कमी करण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. Cephalospemum नावाची बुरशी तुडतुड्याचा नाश करते.
✳️ तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे :-
तुडतुडे हिरवे किंवा पिवळसर हिरवे असतात. स्पर्श केल्यास ते तिरपे चालतात. प्रादुर्भाव झालेल्या पानाच्या कडा प्रथम पिवळसर होतात व त्यावर तुडतुड्याच्या काती दिसतात. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास पानाच्या कडा खालच्या बाजूने कोकाडतात. पानाच्या कडा नंतर लालसर होतात व प्रादुर्भाव कायम राहिल तर जळल्यासारखा दिसतो. तुडतुड्याचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास बोंडे गळून पडतात व बोंडातील घागा कच्चा राहतो.

🐞 फुलकिडे
✳️ ओळख व प्रकार :-
फुलकिडे अत्यंत लहान असतात. ते भिंगाच्या सहाय्याने पहावे लागतात. फुलकिडे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे काळ्या रंगाचे फुलकिडे याला कॅलिओथ्रिप्स इंडिकस म्हणतात. दुसरे पिवळसर पांढर्‍या रंगाचे फुलकिडे याला फ्रॅक्लीनिओन शुल्टझी म्हणतात. काळ्या फुलकिड्यामुळे झाडाच्या खालच्या पानावर वरच्या बाजूने अतिशय पांढरे ठिपके पडतात. पिवळसर पांढर्‍या रंगाच्या फुल किड्यांमुळे खालच्या बाजूने पाने काळपट तर वरच्या बाजुने कोकडल्यासारखी व कडक होतात. व्यवस्थित पानाचे निरिक्षण केल्यास त्यावर काळ्या रेघा किंवा जळाल्यासारखा भाग दिसतो. काळे फुलकिडे पानाच्या वरच्या पृष्ठभागावर असल्याने पाऊस पडल्यास वाहून जातात. मात्र, पिवळे फुलकिडे झाडावरील मधल्या व कोरड्या पानाच्या खालच्या भागात राहतात. त्यामुळे जोराचा पाऊस किंवा पानाच्या खालच्या बाजूने फवारणी केल्यास त्याचा नाश होतो.
✳️ जीवनक्रम व प्रादुर्भाव :-
फुलकिडे आकाराने लहान 1 ते 2 मिमी लांब, सडपातळ, नाजूक व लांबोळे असतात. उष्ण व आर्द्र वातावरणात फार झपाट्याने वाढतात. पिल्ले गवती रंगाची असतात. प्रौढ कीटकांच्या पंखावर दाट झालर असते. नर व मादीचा संगम होऊन किंवा न होताही प्रजनन होते. दररोज 2 ते 4 अंडी पानाच्या कोवळ्या उतीमध्ये घालते. एक मादी 20 ते 40 दिवस जगते आणि 50 ते 100 अंडी देते. 10 ते 14 दिवसात नवीन पिढी तयार होते. फुलकिड्यांच्या तोंडात भाल्यासारखा एक अवयव असतो. त्याला मँडीबल म्हणतात. हा मँडीबल वारंवार पानात टोचून अनेक जखमा करून त्यातून निघणारा द्रव तोंडाद्वारे शोषून घेतात. जखमेतील रस शोषल्यानंतर जखमेत पोकळी निर्माण होते व त्यात हवा शिरते. जखम भरल्यानंतर हवा आतमध्ये राहते व त्याचा आरशासारखा चमकदार भाग तयार होतो. म्हणून फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास पाने खालच्या बाजूने कडक होऊन चमकतात. पानांचा रंग तपकिरी होऊन शेवटी पाने विटकरी दिसतात. किडीची तीव्रता वाढल्यास पाने चंदेरी, मुरडलेली, भुरकट तपकिरी दिसतात. शेवटी पाने वळतात. झाडवर मधल्या व खालच्या पानापेक्षा शेंड्याकडील पानावर किटकांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.

🐞 पांढरी माशी
कापसाच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने पांढरी माशी अंडी घालते. 0.20 मिलीचे अंडे असते. अंडी घालताना मादी मेणासारखा पांढरा पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे अंडी पानावर चिकटतात. जास्त अंडी घातली असल्यास पाने खालच्या बाजूने पांढरट दिसतात. प्रत्येक मादी जास्तीत जास्त 120 व सरासरी 28 ते 43 अंडी घालते. अंडी अवस्था उन्हाळ्यात 9 ते 14 आणि हिवाळ्यात 17 ते 81 दिवस असते. कोषावस्था 2 ते 8 दिवस असते. पांढर्‍या माशीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास हवामानानुसार 14 ते 107 दिवस लागतात. वर्षभर प्रजनन होत असल्याने सर्व अवस्थेतील कीड कापूस पिकावर आढळते. बर्‍याच वेळा तर मादीचे मीलन न होताच प्रजनन होते असते. वर्षभरात 10 ते 12 पिढ्या तयार होतात.
✳️ प्रादुर्भाव :-
कीटकनाशकांच्या सतत फवारणीमुळे पांढर्‍या माशींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढतो. कारण पांढर्‍या माशीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झालेली आहे. मे-जून महिन्यात पेरलेल्या नवीन कापसाचे पिकावर ही कीड येते. जून ते ऑगस्ट महिन्यात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात प्रादुर्भाव कमी होतो. मात्र, पाऊस संपल्यावर पुन्हा वाढतो. जास्त तपमान व कमी पाऊसमान या किडीस अनुकूल असते. त्यामुळे पानांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो.
✳️ नुकसानीचा प्रकार :-
ही माशी पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडून पान जळल्यासारखे दिसते. नंतर गळून पडते. पांढरी माशी रस शोषून घेतल्यानंतर विष्टेद्वारे गोड पदार्थ शरीराबाहेर टाकते. यावर काळी बुरशी वाढते. संपूर्ण पान काळे पडते. या बुरशीलाच ‘कोळशी’ म्हणतात. यामुळे बोंडे, पाती गळतात किंवा बोंड पूर्ण उमलले जात नाही.
✳️ पांढर्‍या माशीचे जैविक नियंत्रण :-
पांढर्‍या माशींना प्रतिकारक असणार्‍या जातींची लागवड करावी. या जातींची पाने चोपडी दाट किंवा आखूड लावा असणारी सिलिका व फेनालचे प्रमाण अधिक असून, पाने रसदार नसलेली असतात. तसेच पिवळ्या रंगाकडे पांढरी माशी लगेच आकर्षित होत असल्याने तेलाचे पिवळे डबे अथवा पिवळे कापड एरंड तेलामध्ये बुडवून कापसाच्या झाडाच्या 1 फुट उंच बांधावे किंवा मजुरांकडून एरंड तेलामध्ये बुडविलेले पिवळे कापड कापसाच्या पिकातून फिरवावे म्हणजे असंख्य पांढर्‍या माशी कापडाकडे आकर्षित होऊन चिकटून मरतात. कडूनिंबाचे तेल आणि कडूनिंबाचा निंबोळी अर्क प्रत्येकी 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

🐞 लाल ढेकण्या
✳️ जीवनक्रम :-
प्रौढ अवस्थेतील लाल ढेकण्या सडपातळ व समोरचे पंख नारंगी, गर्द लाल किंवा पिवळ्या रंगाचे असतात. पिल्ले बहुदा लाल किंवा पिवळ्या रंगाची असतात. पूर्ण वाढ झालेले कीटक 12 ते 18 मिमी लांब असतात. मादी पिवळसर रंगाची असून, ती 100 ते 130 अंडी झाडाच्या खाली ओलसर जमिनीत घालते. 5 ते 8 दिवसात अंडी उबवतात. 50 ते 90 दिवसात पिल्लाची पूर्ण वाढ होते. वर्षातून 3 ते 4 पिढ्या निपजतात.
✳️ प्रादुर्भावाचे स्वरूप :-
लाल ढेकण्या सुईसारख्या सोंडेने नुकत्याच फुटलेल्या बोंडातून बियामधील रस (द्रव) शोषतात. शिवाय, सोंडेतून नेमाटोस्पोरा गॉसीपी नावाची बुरशी बोंडात सोडतात. त्या बुरशीमुळे कापूस पिवळा पडतो व बोंड सडते.

🐞 पाने गुंडाळणारी अळी
✳️ जीवनक्रम व प्रादुर्भाव :-
अळीचे मादी पतंग, कोवळ्या पानाच्या मागील बाजूस चपटी, गुळगुळीत पांढर्‍या पिवळसर हिरावत रंगाची अंडी घालते. अंडी 6 ते 7 दिवसात उबतात. 15 ते 30 दिवस अळी पानाच्या कडेने कडा खाऊन उपजिविका करते. पानांची गुंडाळी करून कोषावस्थेत जाते. 6 ते 7 दिवस कोषावस्था टिकते. पूर्ण वाढलेली अळी एक इंच लांब, चकचकीत हिरव्या रंगाची असून डोके गर्द हिरवे असते. जीवनक्रम एक महिन्याचा असून, हिवाळ्यात बांधावरील झुडपात ही कीड राहते. दमट व ढगाळ हवेमध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो.

🐞 बोंडअळी
कापसावर मुख्यत: ठिपक्याची बोंडअळी, हिरवी बोंडअळी (घाटेअळी) आणि शेंदरी बोंडअळी (गुलाबी) या तीन प्रकारच्या बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. ठिपक्याची व गुलाबी बोंडअळी पक्क्या (पक्व) बोंडाचे नुकसान करते. जास्त करून गुलाबी बोंडअळी पक्क्या बोंडाचे नुकसान करते. त्याचबरोबर ठिपक्याच्या बोंडअळीमुळे बोंडात बुरशी वाढल्याने बोंडे निरोपयोगी होतात. हिरव्या बोंडअळीमुळे कळ्या, पात्या आणि बोंडाचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होते. यामुळे झाडावरील पूर्ण कापूस वेचता येत नाही. कारण निकृष्ट कापूस वेचणीस योग्य नसतो. तसेच वेचणीस उशीर लागून दर्जा ढासळलेला असतो. अशा कापसाचे प्रमाण जास्त असते. बोंडअळीमुळे सामान्य बोंडापेक्षा अशी बोंडे 3 दिवस लवकर उमलतात. त्यामुळे बियाचे, रूईचे वजन कमी होऊन उतार कमी पडतो. शिवाय, बोंडअळीने डागाळलेला, कमजोर तंतू असलेला, पोकळ सरकीचा कापूस निघतो.

🐛 ठिपक्याची बोंडअळी
ठिपक्याच्या बोंडअळीचा रंग करडा असून, तिच्या अंगावर बरेच काळे व बदामी ठिपके असतात. पतंगाचा विस्तार 25 मिमी असून, एरीएस इन्सुलाना जातीच्या पतंगाच्या पुढील पायाचा रंग गवती हिरवा असतो. तर एरीएस फॅब्रीया जातीच्या पतंगाच्या मध्यावर पाचरीच्या आकाराचे पांढरे पट्टे असतात. अंडी निळसर हिरवी व गोल मुकूटासारखी असतात. जिवनक्रम मात्र दोन्ही जातींचा सारखाच असतो. सूर्य मावळल्यानंतर कोषातून पतंग निघतात. 2-3 दिवस नर- मादीचा संगम झाल्यानंतर मादी रात्री पात्या, फुले, कळ्या, बोंड किंवा झाडाच्या शेंड्यावर लव असणार्‍या भागावर 1-1 याप्रमाणे एक मादी 200 ते 300, जास्तीत जास्त 700 पर्यंत अंडी घालते. उबदार हवामानात 2 ते 4 दिवस आणि थंडीमध्ये 7 ते 9 दिवसात अंडी उबतात. त्यातून बारीक अळी बाहेर पडते ही अळी फांद्या फुलाच्या कळ्या किंवा बोंडामध्ये शिरून आतील पेशीवर आपली उपजीविका करते. उबदार हवामानात अळीची पूर्ण वाढ व्हायला 9 ते 20 दिवस तर थंडीमध्ये 50 ते 60 दिवस लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी 1.9 सेंमी लांब, तपकिरी रंगाची असते. तिच्या लांबीला समांतर अंगावर पांढर्‍या व फिक्कट पिवळ्या किंवा हिरव्या रेषा असतात. एरीएस इन्सुलाना या जातीच्या अळीचा रंग मळकट, हिरवट पांढरा असतो. अंगावर काळे नारंगी ठिपके असतात. झाडाचे खाली पडलेल्या पात्या, बोंड किंवा जमिनीतील भेगात अळी कोष तयार करते. कोषातून 6 ते 25 दिवसात पतंग बाहेर पडतात. ही कीड उन्हाळ्यात भेंडी किंवा अंबाडी अशा पिकावर आपली उपजिविका करते.
✳️ नुकसानीचा प्रकार :-
ठिपक्याची बोंडअळी कापसाचे शेंडे, फुले व बोंडाचे नुकसान करते. शेंडे सुकतात, खाली वाकतात व मारतात. किडलेली फुले, पाती गळतात. बोंडे लालसर होऊन गळतात. मोठी बोंडे अपरिपक्क अवस्थेत फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत खालावते. अळी नव्या फुटीस जास्त नुकसान करते. बोंडाची गळ होत नाही. मात्र, बोंडावर विष्टेने बंद झालेली छिद्रे दिसतात. बोंडातील आतील भाग पोखारल्याने बोंडे निकामी होऊन रुईची प्रत खालावते. या अळीमुळे 70 ते 80 टक्के बोंडगळ व 40 ते 50 टक्के शेंडेमर होते.

🐛 हिरवी बोंडअळी
बोंडअळीच्या पतंगाचे शरीर 16 ते 18 मिमी लांब असून, पंखाचा विस्तार 32 ते 38 मिमी असतो. पंखाची समोरची जोड पिवळसर, तपकिरी करडी तपकिरी किंवा तांबूस तपकिरी बदामी रंगाची असून, पंखावर रेषा असतात. मागील पंखाची जोडी घुरकट, पांढरट असून, त्यावर रुंद, गर्द, करड्या किंवा तपकिरी रंगाचे पट्टे असतात. त्यावर फिक्कट दोन ठिपके असतात. हिरव्या बोंडअळीचे पतंग कोषातून संध्याकाळी 6 वाजतानंतर बाहेर येतात. प्रामुख्याने 8 ते 10 वाजताच्या दरम्यान जास्त पतंग बाहेर पडतात. दिवसा एकही पतंग बाहेर येत नाही. कोषातून नुकतेच निघाल्याने पतंगाचे पंख ओलसर व सुरकुतलेले असतात. ते हळूहळू झाडावर चढून 2 ते 4 तास शांत बसून पंखामध्ये हवा भरून पंख पूर्णपणे उमलतात. पंख पक्के झाल्यानंतर उडतात. मादी पतंग कोषातून बाहेर पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी तीचा नराशी संबंध येतो. रात्री 2 ते 4 नर पतंग शेतातून उडत असतात. तर मादी पतंग पानावर बसून फेरोमोन नावाचे संजीवक (हार्मोन ) निर्माण करून हवेत सोडतात. या संजीवकाच्या वासामुळे नर पतंग मादीकडे आकर्षित होतात. दोन्हींचा संगम झाल्यानंतर 1 ते 4 मादी 3 ते 5 दिवस शेंड्यावर कोवळ्या पानावर एक एक अंडी घालते. अंडी चकचकीत, गोल, घुमटाच्या आकाराचे हिरवट पिवळी असतात. अंड्यातून अळ्या निघण्यासाठी तापमानानुसार 2 ते 4 दिवस ते थंडीमध्ये 8 दिवस लागतात. वाढीस लागलेल्या अळ्या, पात्या, कळ्या, फुले व हिरवी बोंड यांना छिद्र पाडून आतील भाग खातात. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी बोंडला छिद्र पाडू शकत नाही. त्यामुळे दोन आळ्या एकत्र आल्यावर, एकमेकींना जखमा करून खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एका बोंडामध्ये एकापेक्षा अधिक अळ्या आढळत नाहीत. पूर्ण वाढलेल्या अळीचा रंग पिवळसर, फिक्कट ते गडद हिरवा, तपकिरी, लालसर गुलाबी, नारंगी आणि थोडासा काळसर असते. अंगावर तुरट गर्द करड्या रेषा असून, पाय तपकिरी असतात. अळीची लांबी 37 ते 50 मिमी असते. हिरव्या अळीची 20 ते 21 दिवसात पूर्ण वाढ होते. अळी बोंडाना छिद्र पाडून तोंडाकडील भागाने आत अर्धी शिरून आतील भाग पोखरते. मात्र, अर्धा भाग बाहेर राहत असल्याते नैसर्गिक शत्रुंना ही लवकर बळी पडते. ही अळी पूर्ण जीवनात 5 वेळा कात टाकते. कात टाकल्यानंतर नवीन कात पक्की होण्यास 2-3 तास लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी पानावरून खाली उतरून ओलसर जमिनीत 1 ते 6 इंच छिद्र करून आत घुसते व कोषावस्थेत जाते. कोष फिक्कट तपकिरी रंगाचा, 15 ते 20 मिमी लांब असतो. कोषावस्था दोन आठवड्यापासून अनेक आठवडे असते. बहुतेक पतंग जून, ऑगस्ट, डिसेंबर, जानेवारी महिन्यात आढळतात, पतंग दिवसा दिसत नाहीत. ते रात्री सक्रीय असतात. औषधांना प्रतिकारक पतंग शेतापासून लांब जातात. हिरव्या अळीला कापसाच्या बोंडातील वाढणारा कोवळा सेल्युलोज खाद्य म्हणून आणि सरकीच्या तेलाचा वास फार आवडतो. त्यामुळे कीटकनाशकामध्ये सरकी तेलाचा अंश असला म्हणजे अळी अकर्षित होते.
✳️ नुकसानीचा प्रकार :-
हिरव्या बोंडअळीमुळे किडलेल्या पात्या, फुले, कळ्या व लहान बोंडे गळतात. मोठी बोंडे गळत नाहीत. मात्र, अळीने आतील भाग पोखरल्याने बोंड निकामी होते व रूईची प्रत खालवते. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

🐛 शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंडअळी)
शेंदरी बोंडअळीचे मादी पतंग कोवळ्या पानाच्या मागील भागावर, पात्या, कळ्या व पुष्य कोषावर बारीक फटीत अलग अलग लांबोळी, पांढरी, गोल, चपटी अंडी घालते. सर्व साधारण 4 ते 5 दिवसात अंडी उबतात. 15 ते 16 मिमी लांबीची अळी असते. अळ्या रात्री पात्यामध्ये बोंडात शिरायला 5 ते 6 दिवस लागतात. बोंडामध्ये अळी शिरल्यानंतर ओल्या विष्टेने छिद्र बंद करते. त्यामुळे वरून छिद्र जाणवत नाही. बोंडातील अळ्या रुईमधील सरकी खातात. सरकीची प्रत व तेलाचे प्रमाण कमी होते. 9 ते 21 दिवसात अळीची पूर्ण वाढ होते. गुलाबी रंगाच्या आळ्यांचे डोके बदामी रंगाचे असते. पूर्ण वाढ झालेली अळी बोंडाच्या टोकावरील भागावर गोल छिद्र करून बाहेर पडते. नंतर ती रेशमी आवरणात कोष तयार करते. कोषावस्था बोंडात, रुईमध्ये, खाली पडलेल्या पाल पाचोळ्यात 6 ते 20 दिवस टिकते. एकूण जीवनक्रम 23 ते 31 दिवसात पूर्ण होतो. नर व मादीचा संयोग रात्री होतो. नंतर 3 दिवसात मादी अंडी घालते. पतंग आकाराने लहान असतात. त्यांची पुढील पंखाची जोडी विटकरी रंगाची असून, त्यावर काळपट ठिपके असतात. कीडग्रस्त पात्या व फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात.

🐛 पिंक बोल वर्म (Pink Boll Worm)
ही कीड कापूस या पिकास ‘कॅन्सर आहे असे म्हटलयास वावगे ठरणार नाही. यासाठी अनेक कंपन्यांनी अतिविषारी कीटकनाशके निर्माण केली. ही कीटकनाशके वापरल्यानंतर कीड आटोक्यात येते म्हणून जगभरातील शेतकरी ही औषधे वापरू लागले. म्हणून या अळीपासून जे फुलपाखरू निर्माण झाले, ज्या अंड्यापासून अळी निर्माण झाली ती या कीटकनाशकास प्रतिकारक झाली. मग या किडीने सर्व प्रकारची कीटकनाशके पचविली. याचा अतिशय दु:खदायी व वाईट अनुभव येऊ लागला. याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यात कापूस पिकावर या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर व वारंवार होत असल्याचे आढळून येते आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी महागडी कीटकनाशके खरेदी व फवारणीवर मोठा खर्च करूनही ही अळी व पिकांचे नुकसान नियंत्रणात येत नसल्याने कापूस उत्पादकांनी आत्महत्या केल्या व करत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी कीड व रोग प्रत्यक्ष पिकांवर येण्याअगोदरच योग्य खबरदारी घेतल्यास या किडींस व रोगास प्रतिबंध होऊ शकेल.

🐞 फुलकिडे, तुडतुडे, बोंडअळीचे पतंग यांचे नियंत्रणासाठी जैविक उपाय
✳️ प्रकाश सापळा :-
कापूस पिकावर आघात करणार्‍या बहुसंख्य किडींना (फुलकिडे तुडतुडे, बोंडअळीचे पतंग) पंख असल्याने ते प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. त्यामुळे अशा किडींच्या नियंत्रणासाठी शेताच्या मध्यभागी मोठ्या पसरट भांड्यामध्ये रॉकेल मिश्रीत पाणी भरून भांड्याच्या मधोमध उंचीवर दिवा किंवा गॅसबत्ती लावाली. म्हणजे या दिव्याकडे किडी आकर्षित होऊन त्या रॉकेलमिश्रीत पाण्यात पडतात व मरून जातात. किडीचे पूर्ण नियंत्रण होईपर्यंत दिवा व द्रावण शेतामध्ये तसेच ठेवावे. यामध्ये विषारी किटकनाशकाशिवाय साध्या व सोप्या पद्धतीने नियंत्रण करणे यालाच प्रकाशसापळा म्हणतात.हा सापळा रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत चालू ठेवावा. या सापळ्यामुळे किडींचा बाल्यावस्थेत व लवकर नाश होत असल्याने पिकाच्या उत्पादनक्षमतेत वाढ होते. शिवाय, कीटकनाशाकावर होणार्‍या खर्चामध्ये 50 ते 60 टक्के बचत होते. या पद्धतीने किडींचे नियंत्रण करण्यासाठी प्रथम गॅसबत्ती/दिवा तीन बांबुंना टांगून त्यांच्यामध्ये स्टूलवर रॉकेलमिश्रीत पाण्याचे भांडे ठेवावे. हे करत असताना महत्त्वाची बाब म्हणजे दिव्याची उंची ही जमिनीपासून दीड ते दोन फुट उंचीवर असावी. यामध्ये पिकाची उंची व योग्य निरीक्षण करून बदल करावा, अशी जैविक उपाययोजना सांगितली जाते. या अळी व रोगांना प्रतिबंधक कापसाचे GM बियाणे विकसित करण्यात आले असून, त्या बियाण्याचा जगभर वापर करून कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. भारतात केंद्र सरकारने या GM बियाणे वापरावर बंदी घातली आहे. ती बंदी हटवणे आणि GM बियाण्याचा व्यावसायिक वापरासाठी परवानगी देणे आवश्यक आहे.

✴️ कापसावरील रोग
कापसावर करपा, मर (फ्युजेरियम विल्ट, व्हर्टीसिलीयम विल्ट न्युविल्ट ऑफ कॉटन) मुळकुजव्या, कवडी, दह्या पानावरील ठिपके, लाल्या, मरोडिया हे रोग प्रामुख्याने आढळतात.

🐞 करपा
लक्षणे व नुकसानीचा प्रकार :-
झान्थोमोनॉस कापेस्ट्रिस पी. व्ही मालव्हेसिअरम या जीवाणूमुळे करपा हा रोग होतो. साधारणपणे झाड 5 ते 6 आठवड्याचे असताना पानाच्या खालील बाजूस काळ्या रंगाचे कोनात्मक ठिपके दिसू लागतात. नंतर अशाच प्रकारचे ठिपके पानाच्या वरील बाजूसही तयार होतात. पानाच्या शिरा, पानाचे देठ, काळे पडतात. पानावरील ठिपक्यांचा आकार वाढून ठिपके एकमेकांत मिसळून पूर्ण पान करपून गळून पडते. करप्यामुळे पानातील हरीतद्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. पानाप्रमाणे खोडावरही काळे ठिपके पडतात. खोडाला भेगा पडून झाडे वार्‍याने मोडतात. रोगट झाडावरील पात्या, फुले, कळ्या गळून पडतात. मोठी बोंडे व आतील कापूस सडतो. बोंडावर वरून काळे डाग पडतात. आतील कापसाचा रंग पिवळसर पडून प्रत खालावते. परिणामी बाजारभाव कमी मिळतात.
✴️ रोगाचा प्रसार प्रथम बियाणांपासून होतो. रोगाचे जिवाणू बियाणांच्या आत व आवरणावरही असतात. बोंडअळीच्या विष्टेमध्येही करप्याचे जिवाणू जिवंत राहतात. प्रामुख्याने या रोगाचा प्रसार बोंड अळीची विष्ठा, पावसाचे पाणी, कापसावरील लाल ठेकण्या या मार्फत होतो.
✴️ रोगाची लक्षणे जाणवताच फवारणी पत्रकातील पिकाच्या कालावधीनुसार त्या त्या दोन फवारणीमध्ये कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनरचे प्रमाणे 4 ते 5 मिली आणि हार्मोनी 2 मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये घेणे.

🐞 मर
कापसाच्या मर रोगामध्ये तीन प्रकार आढळतात.
✳️ फ्युजेरियम विल्ट :-
हा रोग फ्युजेरियम ऑक्सीस्पोरम फॉस्पी, व्हेसिनफेकटस या बुरशीमुळे होतो. तापमान 22 ते 30 डिग्री सेल्सिअस आणि भारी जमीन जर असेल तर रोगाची तीव्रता वाढते. लहान रोपांची पाने पिवळ्या ते करड्य रंगाची दिसतात. नंतर रोप वाळते व मरते. मोठ्या झाडाची पाने पिवळी मलूल होऊन वाळतात. जमिनीलगत खोडाचा भाग काळपट पडतो. रोगाची लागण झालेले झाड मधोमध चिरल्यास आतून काळपट उभ्या रेषा दिसतात. या रोगाचा प्रसार मुळावाटे होतो. जमिनीत असणारी बुरशी मुळावाटे खोडात जाऊन तेथे फुजारीक अॅसीड नावाचे विषारी द्रव्य तयार करते. तसेच झायलम पेशीत टायनोज हे द्रव्य तयार होते. त्यामुळे मुळातील व खोडातील झायलम पेशी मरतात. त्यामुळे झाडांना क्षार व पाणी मिळत नाही व शेवटी झाडे मरतात.
✳️ व्हार्टीसिलीयम विल्ट :-
व्हार्टीसिलीयम डेहली या बुरशीमुळे हा मर रोग होतो. यामध्ये झाडाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडू लागतात. प्रथम पानाच्या कडा पिवळ्या पडून नंतर शिरांवर हा रोग पसरतो. शेवटी पाने गळून झाड वाळते. झाडाचे सोटमुळ मधोमध उभे चिरले तर करड्या तपकिरी रंगाची रेष आतमध्ये दिसते. मुळापासून पानांना अन्नघटक पोहचविणारी नलिका (झायलम पेशी) सडल्यामुळे ही रेष दिसते. पाण्याचा योग्य निचरा केल्यास रोगाचे प्रमाण कमी येते.
✳️ न्युविल्ट ऑफ कॉटन (पॅरा विल्ट) :-
यामध्ये दोन प्रकार जाणवतात. झाडाची पाने लाल होऊन सुकतात व गळतात. म्हणून याला सविल्ट म्हणतात. काही वेळेस झाडाची पाने गळण्यापूर्वीच झाड वाळते म्हणून याला क्वीक विल्ट म्हणतात. तापमान 30 डिग्री सेल्सिअस असल्यास आणि पावसाने ओढ देऊन अचानक जोराचा पाऊस झाल्यास न्यु विल्ट रोगाचा प्रादुर्भाव होतो. झाडाच्या बुंध्याला जमिनीजवळ प्लोयेमपेशी असल्यास मध्ये इथीलीनचा थर तयार होतो. तसेच व्हॅसक्युलर सिस्टीममध्ये हवेच्या पोकळ्या तयार झाल्याने होतो.

🐞 मुळकुजव्या
रायझोक्टोनिआ बटाटी कापला किंवा रायक्टोनिमा सार्लिनी या बुरशीमुळे मुळकुजव्या हा रोग होतो. जमिनीचे तपमाना 35 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असल्यास रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. सर्वसाधारण महिना सव्वा महिन्याचे रोपे झाल्यानंतर पाने वाळू लागून गळतात. रोगट मुळ पूर्ण कुजलेले असते. रोगट झाडाला हाताने धरून ओढल्यास ते अलगद सहज उपसते. फक्त सोटमुळे वर येते. त्याची साल सोटमुळापासून वेगळी झालेली असते. कुजलेल्या सालीवर सक्लेरोशिया तयार होतात. सोटमुळावर चिकट पदार्थ तयार होतो.
✳️ उपाय :-
मुळकुजव्याची लक्षणे दिसू लागताच 100 लिटर पाण्यात 500 ग्रॅम कॉपरऑक्सीक्लोराईड घेऊन प्रत्येक रोपावरून 50 मिली द्रावणाचे ड्रेंचिंग (आळवणी ) 4-4 दिवसाच्या अंतराने दोन वेळा करणे.

🐞 कवडी
कवडी रोग हा कोलेटोटायकम कँसिस किंवा कोलेटोटाकम गॉपसी या बुरशीमुळे होतो. रोपे 3 ते 4 आठवड्याचे असताना पानावर व खोडावर लालसर गोलाकार ठिपके तयार होतात. रोगट रोपटे सुकून मरते. मोठ्या खोडावर भेगा पडून साला निघते. कापसाच्या बोंडावर गोलाकार, खोलगट, लालसर करड्या रंगाचे ठिपके दिसून पुढे नंतर काळे ठिपके होतात. ठिपाक्याचे प्रमाण वाढून आकार वाढल्याने कापूस पिवळा होतो.

🐞 कापसावरील दह्या रोग
हा रॅम्पुलॅपर या एपरआपला या बुरशीमुळे होतो. पानाच्या खालच्या भागवर पिवळसर रंगाचे ठिपके पडून पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे ठिपके पडून पानाच्या वरील भागवर दह्यासारखे पांढरे ठिपके दिसतात. रोगाचा प्रसार हा हवेद्वारे होत असल्याने प्रादुर्भाव अधिक झाल्यास पाने गळतात. दह्या रोगाचा प्रादुर्भाव आषाढ महिन्यात जास्त जाणवतो. या महिन्यात झिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण कोंदट हवा असल्यामुळे या रोगाचे प्रमाण वाढते.

🐞 लाल्या
कापसाचे पीक फुलोर्‍यात असताना पानावर हा रोग पडतो. म्हणजेच सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये पाऊस अधिक झाला किंवा पाण्याचा ताण पडला की झाडाची हिरवी पाने लाल होतात. पानाच्या शिरा मात्र हिरव्याच असतात. पाने लाल झाल्याने 50 टक्के प्रकाश संश्लेषणाचे कार्य कमी होते. परिणामी पात्या व बोंडगळ होते. अन्नरस शोषणार्‍या किडींचा (मावा, तुडतुडे, फुलकिडे) प्रादुर्भाव अधिक झाल्यास तसेच जमिनीतील मॅग्नेशियम व नायट्रोजनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो.
✳️ कपाशीवरील लाल्या रोगाची लक्षणे :-
पानाच्या कडा तांबूस दिसतात. शेंड्यावरील पाने लालसर तांबूस झालेली आढळतात व शेवटी पाने वाळून गळून पडतात. लाल्या हा कोणत्याही जीवाणू अथवा विषाणूमुळे होणारा रोग नसून, अन्नद्रव्यांच्या कमतरमुळे दिसून येणारी शरीरशास्त्र विकृती आहे. उच्च उत्पादकता असलेल्या संकरीत व बीटी वाणांची लागवड हलक्या जमिनीवर केल्यास अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते व लाल्याची लक्षणे दिसून येतात. कापसाची लागवड पाणथळ जमिनीत केल्यामुळे झाडास नत्र घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते. सर्वसाधारण परिस्थितीमुळे फुले येणे ते बोंडे तयार होण्याच्या कालावधीत नत्राची कमतरता झाल्यास वरील लक्षणे दिसतात. बीटी कापसासाठी केलेल्या खताच्या शिफारशीप्रमाणे खते न दिल्यास पात्यांच्या पोषणासाठी झाडांच्या खालच्या पानातील अन्नद्रव्य उपयोगात येते. त्यामुळे पाने लाल पडतात. मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे देखील पाने लाल पडण्याचे एक कारण आहे. अचानक उष्ण वारे वाहू लागल्यास तसेच दिवस व रात्रीच्या तापमानात जास्त फरक पडल्यास पाने लाल होतात. एकाच जमिनीत वारंवार कापसाचे पीक घेतल्यामुळे झाडाला पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही, त्यामुळे लाल्या उद्भवतो. रस शोषण करणर्‍या किडींमुळे देखील पाने लाल पडतात.
✳️ लाल्यावरील उपाययोजना :-
खताची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. तसेच लागवडीचे अंतरही शिफारशीप्रमाणे ठेवावे. संकरित व बीटी वाणाची लागवड हलक्या जमिनीमध्ये करू नये. पाणथळ जमिनी कापूस लागवडीसाठी टाळाव्यात. लाल्याची लक्षणे दिसताच 1 टक्का मॅग्नेशियम सल्फेट फवारावे किंवा प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत टाकावे. कीड नियंत्रणासाठी सिंथेटीक पायरेथ्राइडचा वापर कमी करावा. पावसाने जास्त दिवस ताण दिल्यास उपलब्ध सिंचन सुविधेचे पाणी मर्यादितच द्यावे. जास्त पाणी देऊ नये. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची दक्षता घ्यावी.

1 thought on “कापूस पिकावरील कीड व रोगांची ओळख

  1. कोणत्या वातावरणात कोणती कीड वाढते. आर्द्रता, तापमान, पाऊस, ऊन, पाणी साचणे यानुसार कोणती कीड, रोग वाढते किंवा कमी होते ती माहिती पुढच्या लेखात द्यावी ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!