चीन बनला भारतीय तुटलेल्या तांदळाचा माेठा आयातदार देश!
1 min read🌎 खरेदीदार म्हणून चीनचा उदय
सन 2021-22 या आर्थिक वर्षात भारतात एकूण 1290.66 लाख टन तांदळाचे उत्पादन झाले हाेते. यातील एकूण 212.10 लाख मेट्रिक टन निर्यातक्षम तांदळापैकी 7.7 टक्के म्हणजेच 16.34 लाख मेट्रिक टन तांदूळ ( rice) एकट्या चीनने खरेदी केला हाेता. या काळाज चीनमध्ये काेराेना महामारी हाेती आणि याच काळात चीन भारतीय तुटलेल्या तांदळाचा माेठा खरेदीदार म्हणून उदयास आला. या काळात चीनमध्ये निर्यात करण्यात आलेल्या 16.34 लाख मेट्रिक टन तांदळापैकी जवळपास 97 टक्के म्हणजेच 15.76 लाख मेट्रिक टन तांदूळ हा तुटलेला हाेता. त्यामुळे जगात भारतीय तांदळाच्या मागणीत वाढ झाली. पूर्वी तुटलेला भारतीय तांदूळ आफ्रिकन देशांमध्ये निर्यात केला जायचा. आता चीनच्या रुपाने भारताला तांदळाचा नवा खरेदीदार म्हणजेच आयातदार देश मिळाला आहे.
🌎 बासमती व बिगर बासमती तांदूळ निर्यात
सन 2021-22 मध्ये, भारतीय बासमती आणि बिगर बासमती या दाेन्ही भारतीय तांदळांचा निर्यात ही 212.10 लाख मेट्रिक टन हाेती. जी सन 2020-21 मध्ये 177.79 लाख मेट्रिक टन एवढी हाेती. त्यामुळे वर्षभरात भारतीय बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत 19.30 टक्के वाढ झाली हाेती. याच काळात भारतीय तांदळाची चीनमधील निर्यात 392.20 टक्क्यांनी वाढली. ही निर्यात 3.31 लाख मेटिक टनावरून 16.34 लाख मेट्रिक टनावर पाेहाेचली.
🌎 निर्यातीतील बासमती तांदळाचा वाटा
सन 2021-22 मध्ये एकूण भारतीय तांदळाच्या निर्यातीत बासमती तांदळाचा वाटा 39.48 लाख मेट्रिक टन हाेता. जी सन 2020-21 मध्ये निर्यात केलेल्या 46.30 लाख मेट्रिक टनापेक्षा 14.73 टक्के कमी होती.
🌎 निर्यातीतील बिगर बासमती तांदळाचा वाटा
भारतीय तांदूळ निर्यातीच्या बास्केटमध्ये बिगर बासमती तांदळाचा वाटाही मोठा आहे. सन 2021-22 मध्ये बासमती व्यतिरिक्त इतर तांदळाची (बिगर बासमती) निर्यात 172.62 लाख मेट्रिक टन होती. जी सन 2020-21 मधील 131.49 लाख मेट्रिक टनापेक्षा 31.27 टक्के जास्त होती.
🌎 निर्यातीतील तुटलेल्या तांदळाचा वाटा
सन 2021-22 मध्ये भारताने 83 देशांना एकूण 38.64 लाख मेट्रिक टन तुटलेला तांदूळ निर्यात केला. यातील सर्वाधिक म्हणजेच 15.76 लाख मेट्रिक टन तुटलेले तांदूळ एकट्या चीनने खरेदी केले होते. ही निर्यात सन 2020-21 मध्ये 2.73 लाख मेट्रिक टनापेक्षा 476.40 टक्के जास्त हाेती.
🌎 तुटलेल्या तांदळाचा वापर
तुटलेल्या भारतीय तांदळाची माेठ्या प्रमाणात आयात करण्यामागे चीनचे वेगळे अर्थकारण आहे. चीनमध्ये तुटलेल्या तांदळाचा वापर नूडल्स आणि वाईन तयार करण्यासाठी केला जाताे. चीनमध्ये या दाेन्ही बाबींची माेठी मागणी असल्याने त्यांना माेठ्या प्रमाणा तुटलेल्या तांदळाची आवश्यकता असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी काेराेना संक्रमणापूर्वी चीनचे एक शिष्टमंडळ भारताच्या दाैऱ्यावर आले हाेते. या शिष्टमंडळाने भारतातील अनेक राईस मिलला भेटी दिल्या हाेत्या. या शिष्टमंडळाने त्यांचा अहवाल चीन सरकारला सादर केल्यानंतर चीनने तुटलेल्या भारतीय तांदळाची माेठी मागणी नाेंदविली हाेती. नूडल्स व वाईन तयार करण्यासाठी काॅर्नचाही काही प्रमाणात वापर केला जाताे. अलीकडच्या काळात काॅर्नच्या किमती वाढल्याने त्याला पर्याय म्हणून तुटलेला भारतीय तांदूळ पुढे आला आहे. त्यात रशिया-युक्रेन युद्धाची भर पडल्याने तुटलेल्या भारतीय तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे.
🌎 भारतीय तांदळाची निर्यात
केंद्र सरकारने दर्जेदार तांदळाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच जगातील ज्या देशांमध्ये तांदळाचा अधिक वापर केला जातो त्या देशांमध्ये तांदळाची निर्यात वाढविण्यासाठी तसेच भारताची ओळख निर्माण करण्यासाठी पावले उचलणे व योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारताने सन 2021-22 या
आर्थिक वर्षात 9.6 अब्ज डॉलर किमतीचा तांदूळ निर्यात केला. सन 2019-20 या आर्थिक वर्षात भारताने 6.4 अब्ज डॉलर किमतीचे तांदूळ निर्यात केले होते.
🌎 निर्यातबंदीमुळे भारताची प्रतिमा मलीन
सन 2022-23 च्या खरीप हंगामात तांदूळ उत्पादनास अनुकूल परिस्थिती असल्याने भारतात तांदळाचे चांगले उत्पादन होण्याचे अंदाज देशातील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांनी व्यक्त केले जात आहेत. देशात तांदळाचा पुरेसा साठा असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महागाई वाढल्याचे कारण पुढे करून गहू आणि गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी लावली. याच काळात तांदळावर निर्यातबंदी लावण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन होता. परंतु, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. जगात भारतीय शेतमालाला मोठी मागणी आहे. केंद्र सरकार मध्येच निर्यातबंदीचा निर्णय घेत असल्याने भारतीय शेतमाल निर्यातदार अडचणीत येतात. केंद्र सरकारच्या ‘निर्यातबंदी’ या आत्मघातकी निर्णयामुळे जागतिक शेतमाल बाजारात भारताची प्रतिमा मलीन झाली आहे.
छान माहिती,
भारतात गरीब लोक असा चूरा तांदूळ इडली डोसे वगैरे बनवण्यासाठी वापरतात.
छान माहिती