‘एमएसपी’चा भूलभुलैया : यंदा 50 नव्हे, फक्त 4.44 ते 8.86 टक्केच वाढ!
1 min read🌎 उत्पादन खर्च ठरविण्याची त्रिसूत्री
डाॅ. स्वामीनाथन आयाेगाच्या शिफारशीनुसार पिकांचा उत्पादन खर्च ठरविण्याची त्रिसूत्री अशी…
✴️ ए-2 (A-2) :- यात बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन व इंधनावरील (वीज) प्रत्यक्ष खर्च ग्राह्य धरला जाताे.
✴️ ए-२ एफएल (A-FL) (Family Labor) :- यात A-2 मधील सर्व घटकांसाेबतच शेतकरी व त्यांच्या घरातील सदस्यांचे श्रम मूल्य ग्राह्य धरले जाते.
✴️ सी-2 (C-2 :- यात A-2 आणि A-2 FL मधील सर्व घटकांसाेबतच गुंतवणुकीवरील व्याज व जमिनीचे भाडे ग्राह्य धरले जाते.
✴️ मुळात केंद्र सरकारने ‘एमएसपी’ ही C-2 अधिक 50 टक्के नफा या सूत्राने काढून ती जाहीर करणे व त्यानुसार शेतमालाची खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र, ‘एमएसपी’ A-2 FL याच सूत्राने काढून त्यावर 50 टक्के अधिक नफा जाहीर केल्याचा गवगवा करीत केंद्र सरकार शेतकऱ्यांची वारंवार दिशाभूल करीत आहे.
🌎 कृषी निविष्ठांच्या किमती व मजुरीत वाढ
केंद्र सरकारने सन 2022-23 ची ‘एमएसपी’‘C-2’ ऐवजी ‘A-2 FL’ याच सूत्रानुसार जाहीर केली आहे. यातील 14 पिकांचा उत्पादनखर्च हा सन 2014-15 मधील ‘एमएसपी’ दराच्या आसपास असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट हाेते. सन 2014-15 च्या तुलनेत सन 2022-23 मध्ये सर्वच कृषी निविष्ठांच्या किमतीत तसेच मजुरीच्या दरात किमान 35 ते 65 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ‘एमएसपी’ काढताना ‘सीएसीपी’ने म्हणजेच केद्र सरकारने या दोन्हीची दरवाढ या पिकांच्या उत्पादन खर्चात ग्राह्य धरली नाही. एमएसपी ‘C-2’ अधिक 50 टक्के नफा या सूत्रानुसार देणे आवश्यक असताना प्रत्येक सरकार ती ‘A-2 FL’ सूत्रानुसार जाहीर करते आणि चुकीच्या पद्धतीने उत्पादन खर्च (कमीतकमी) दाखवून त्यात 50 टक्के वाढ केल्याचे ढोल बढवते.
🌎 ‘प्राईज इंडेक्स’मध्ये वाढ
मागील दाेन वर्षात विविध वस्तूंच्या रिटेल (Retail) आणि हाेलसेल (Wholesale) प्राईज इंडेक्स (Price index) मध्येही माेठी वाढ झाली आहे. रिटेल प्राईज इंडेक्स 7 टक्क्यांनी वाढला असून, हाेलसेल प्राईज इंडेक्समध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय, डाॅलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. सध्या एका अमेरिकन डाॅलरची किंमत 77 रुपये एवढी आहे. रुपयाचे सातत्याने हाेणारे अवमूल्यन (Depreciation of Rupee) थांबवून आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयांची किंमत वाढविण्यासाठी केंद्र सरकार काहीही उपाययाेजना करीत नाही.
🌎 ‘एमएसपी’त 50 टक्के वाढीचा इतिहास
‘A-2 FL’ या सूत्रानुसार याआधीही पिकांची ‘एमएसपी’ जाहीर करण्यात आली आहे. डाॅ. मनमाेहन सिंग सरकारने याआधी सन 2008-09 मध्ये ‘A-2 FL’ अधिक 50 टक्के नफा या सूत्राने ‘एमएसपी’ जाहीर केली हाेती. सन 2007-08 मध्ये धानाची (Paddy) ‘एमएसपी’ 645 रुपये हाेती. ती सन 2008-09 मध्ये 850 रुपये करण्यात आली हाेती. सन 2007-08 मध्ये कापसाची (Cotton) एमएसपी 2,003 रुपये हाेती. ती सन 2008-09 मध्ये 3,000 रुपये करण्यात आली हाेती. साेयाबीन (Soybean) ची एमएसपी सन 2007-08 मध्ये 1,050 रुपयांवरून सन 2008-09 मध्ये 1,390 रुपये करण्यात आली. गव्हाची (Wheat) एमएसपी सन 2007-08 मध्ये 750 रुपये हाेती. ती सन 2008-09 मध्ये 1,000 रुपये जाहीर करण्यात आली हाेती. ही आकडेवारी पाहता, ‘एमएसपी’त केवळ आपणच मोठी वाढ केली आहे, हा नरेंद्र मोदी सरकारचा दावा चुकीचा व दिशाभूल करणारा ठरतो.
🌎 जागतिक बाजार व शेतमालाचे दर
आज कापसासह काही शेतमालाला ‘एमएसपी’पेक्षा अधिक दर मिळत आहेत. त्याला केंद्र सरकार जबाबदार नसून, जागतिक बाजारपेठेतील त्या शेतमालाची दरवाढ जबाबदार आहे. जागतिक बाजारात आजवर कापसाचे दर 70 ते 80 सेंट प्रती पाउंड दरम्यान हाेते. ते सन 2021-22 च्या हंगामात 170 ते 175 सेंट प्रति पाउंड झाले. पूर्वी साेयाबीनचे दर 5 ते 6 बुशेल वरून सन 2021-22 च्या हंगामात 13 ते 14 बुशेल झाले आहेत. गव्हाचे दर 4 ते 5 बुशेलवरून 12 ते 13 बुशेल, साखरेचे दर 300 डाॅलर प्रति टनावरून 580 डाॅलर प्रति टन आणि पामतेलाचे दर 600 डाॅलर प्रति टनावरून 1,300 डाॅलर प्रति टन झाले आहेत. त्यामुळे ‘एमएसपी’पेक्षा अधिक दर मिळाल्याचे श्रेय नरेंद्र मोदी सरकारला जात नसून, जागतिक बाजारातील दरवाढीला जाते. उलट, याच केंद्र सरकारने काही शेतमालाचे दर ‘एमएसपी’पेक्षा अधिक हाेत असताना महागाई नियंत्रणाच्या नावावर त्यावर स्टाॅक लिमिट (Stock limit), आयात शुल्क कपात (Import duty reduction), निर्यात बंदी (Export ban) सारखी हत्यारे वापरून ‘एमएसपी’ पेक्षा खाली आणले व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले.
🟢 पीक – उत्पादनखर्च (₹) – एमएसपी 2021-22 – एमएसपी 2022-23 – वाढ (₹) – वाढ (टक्के)
🌐 धान (साधारण) :- 1,360 – 1,940 – 2,040 – 100 – 5.15
🌐 धान (ग्रेड-ए) :- 1,360 – 1,960 – 2,060 – 100 – 5.15
🌐 ज्वारी (हायब्रीड) :- 1,977 – 2,738 – 2,970 – 232 – 8.47
🌐 ज्वारी (मालदांडी) :- 1,977 – 2,758 – 2,990 – 232 – 8.47
🌐 बाजरी :- 1,268 – 2,250 – 2,350 – 100 – 4.44
🌐 रागी :- 2,385 – 3,377 – 3,578 – 201 – 5.95
🌐 मका :- 1,308 – 1,870 – 1,963 – 92 – 4.92
🌐 तूर :- 4,131 – 6,300 – 6,600 – 300 – 4.76
🌐 मूग :- 5,167 – 7,275 – 7,755 – 480 – 6.60
🌐 उडीद :- 4,155 – 6,300 – 6,600 – 300 – 4.76
🌐 भुईमूग :- 3,873 – 5,550 – 5,850 – 300 – 5.41
🌐 सूर्यफूल :- 4,113 – 6,015 – 6,400 – 385 – 6.40
🌐 साेयाबीन :- 2,805 – 3,950 – 4,300 – 350 – 8.86
🌐 तीळ :- 5,220 – 7,307 – 7,830 – 523 – 7.16
🌐 जवस :- 4,858 – 6,930 – 7,287 – 357 – 5.15
🌐 कापूस (मध्यम धागा) :- 4,053 – 5,726 – 6,080 – 354 – 6.18
🌐 कापूस (लांब धागा) :- 4,053 – 6,025 – 6,380 – 355 – 6.18
🟢 केंद्र सरकारचा दावा
पीक- एमएसपी 2014-15 – एमएसपी 2021-22 – एमएसपी 2022-23 – उत्पादन खर्च – एमएसपीत वाढ – खर्चापेक्षा परतावा (टक्के)
✳️ धान (सामान्य) :- 1,360 – 1,940 – 2,040 – 1,360 – 100 – 50
✳️ धान (ग्रेड A) :- 1,400 – 1,960 – 2,060 – 100
✳️ ज्वारी (हायब्रीड) :- 1,530 – 2,738 – 2,970 – 1,977 – 232 – 50
✳️ ज्वारी (मालदांडी) :- 1,550 – 2,758 – 2,990 – 232
✳️ बाजरी :- 1,250 – 2,250 – 2,350 – 1,268 – 100 – 85
✳️ रागी :- 1,550 – 3,377 – 3,578 – 2,385 – 201 – 50
✳️ मका :- 1,310 – 1,870 – 1,962 – 1,308 – 92 – 50
✳️ तूर :- 4,350 – 6,300 – 6,600 – 4,131 – 300 – 60
✳️ मूग :- 4,600 – 7,275 – 7,755 – 5,167 – 480 – 50
✳️ उडीद :- 4,350 – 6,300 – 6,600 – 4,155 – 300 – 58
✳️ भुईमूग :- 4,000 – 5,550 – 5,850 – 3,873 – 300 – 51
✳️ सूर्यफूल :- 3,750 – 6,015 – 6,400 – 4,113 – 385 – 56
✳️ सोयाबीन (पिवळे) :- 2,560 – 3,950 – 4,300 – 2,805 – 350 – 53
✳️ तीळ :- 4,600 – 7,307 – 7,830 – 5,220 – 523 – 50
✳️ जवस :- 3,600 – 6,930 – 7,287 – 4,858 – 357 – 50
✳️ कापूस (मध्यम धागा) :- 3,750 – 5,726 – 6,080 – 4053 – 354 – 50
✳️ कापूस (लांब धागा)) ‘- 4,050 – 6,025 – 6,380 – 355