krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

रेल्वेने ऊस वाहणारा कारखानदार : करमशीभाई सोमय्या

1 min read
महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 'स्वदेशी चळवळ' सुरू केली होती़. त्याचवेळी गांधीजी नेहमी म्हणायचे, खेड्याकडे चला़! गांधी विचारांवर असीम श्रद्धा असलेल्या करमशीभाई सोमय्या यांनी गांधीजींच्या विचारांनुसार खेड्यांमध्ये विविध उद्योग उभे केले. त्यांनी आयुष्यभर हातमागावर विणलेले खादीचे कपडे वापरले.

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘स्वदेशी चळवळ’ सुरू केली होती़. त्याचवेळी गांधीजी नेहमी म्हणायचे, खेड्याकडे चला़! गांधी विचारांवर असीम श्रद्धा असलेल्या करमशीभाई सोमय्या यांनी गांधीजींच्या विचारांनुसार खेड्यांमध्ये विविध उद्योग उभे केले. त्यांनी आयुष्यभर हातमागावर विणलेले खादीचे कपडे वापरले.

करमशीभाई जेठाभाई सोमय्या या आभाळा एवढ्या व्यक्तिमत्त्वाचे आजवर अनेक लेखकांनी लेख लिहिले़, पुस्तके लिहिली़, त्यात त्यांचा जीवन प्रवास मांडला़. सोमय्या उद्योग समूहाचं रोपटं वारी या छोट्याशा गावी लावलं गेलं. सातासमुद्रापार नावलौकिक असलेल्या करमशीभाई सोमैया यांच्या जीवन प्रवासाची पायमुळं वारीतच भक्कम रोवली गेली. श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे बुद्रूक या गावात 16 मे 1902 रोजी करमशीभाई जेठाभाई सोमय्या यांचा जन्म झाला. हे कुटुंब मूळचे गुजरात राज्यातील कच्छ भागातील तेरागाव येथील़! मात्र, त्याकाळी व्यापार व्यवसायासाठी महाराष्ट्रात आले आणि येथेच स्थायिक झाले़. त्यांच्या वडिलांचा किराणा मालाचा व्यवसाय होता. करमशीभाईंचे वडील जेठाभाई यांनी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे किराणा मालाचे दुकान सुरू केले. करमशीभाईंनाही बेलापूरमध्येच मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षणासाठी दाखल केले. मुंबईतील न्यू हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर करमशीभाई आपल्या मूळ गावी परतले. त्यावेळी गांधीजींची स्वदेशी चळवळ जोरात सुरू होती़. देशभर स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह आंदोलनेही केली जात होती़. त्यामुळे गांधीजींच्या विचारांनी करमशीभाई प्रेरित झाले़. दरम्यान, त्यांचा वयाच्या 14 व्या वर्षी 1916 साली विवाह झाला. परंतु, त्यांच्या पहिल्या पत्नीचे अल्पावधीतच दुर्दैवाने 1920 साली निधन झाले. त्यांचा दुसरा विवाह 1922 साली झाला. तरुण करमशीभाई सोमैया यांनी आपल्या करिअरची सुरुवात त्यांच्या वडिलांच्या छोट्या किराणा मालाच्या दुकानात काम करण्यापासून केली. त्यानंतर ते त्या परिसरातल्या एका साखर व्यापार कंपनीत भागीदार झाले. त्यातूनच त्यांनी महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंदांनी रंगवलेलं नव-भारताच्या निर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं.

एकदा करमशीभाई मुंबई येथून मनमाडमार्गे श्रीरामपूर येथे रेल्वेने येत असताना मनमाड रेल्वे स्थानकावर त्यांना कोपरगाव तालुक्यातील वारी येथील त्या काळचे प्रतिष्ठित व्यापारी बाबूशेठ संचेती भेटले़. त्यातून रेल्वे प्रवासादरम्यान त्या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली़. करमशीभाई म्हणाले, ‘मला या भागात साखर कारखाना सुरू करायचा आहे. त्यासाठी मी योग्य अशा जमिनीची पाहणी करतो आहे. या परिसरात जर कोठे चांगली जमीन असेल तर कळवा़’. बाबूशेठ संचेती म्हणाले, ‘कोपरगाव तालुक्यात गोदावरीचे कालवे आहेत़. तेच कालवे वारी परिसरातही असून, ते अखंड वाहत आहेत. तसेच आमच्या परिसरात शेतकरी पारंपरिक शेती करतात़. त्यामुळे आपणास वारी हे ठिकाण कारखाना काढण्यासाठी योग्य आहे.’ काही दिवसातच करमशीभाईंनी वारी परिसराची पाहणी करून उंचावर जागा बघून कारखाना टाकण्याचा निर्णय घेतला. जमीन संपादित करून वयाच्या 37 व्या वर्षी स्वातंत्र्यपूर्व काळात 1939 साली वारी (साकरवाडी) येथे करमशीभाईंनी ‘गोदावरी शुगर मिल्स’ या नावाने खासगी कारखाना सुरू केला. त्यांनी स्वत:चा साखर व्यवसाय सुरू केला. त्यानंतर अवघ्या तीन वर्षातच 1941 साली पुन्हा कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर (लक्ष्मीवाडी) येथे ‘गोदावरी शुगर मिल्स’ या नावाने दुसरा साखर कारखाना सुरू केला़. त्या काळात ते भारताचे साखर सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. या कारखान्यांमुळे वारी व सावळीविहीर परिसरातील शेतकऱ्यांचे आयुष्यच बदलून गेले. या भागाला भारताचा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखले जाऊ लागले, ते केवळ करमशीभाई यांच्या उद्योमशीलतेमुळेच!

करमशीभाईंनी ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी एकरी 10 रुपये खंडांनी घेण्यास सुरुवात केली. वारी परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनी मिळाल्या. गोदावरीच्या कालव्यांचे पाणी मुबलक असल्याने खंडानी घेतलेल्या जमिनीवर ते ऊस पिकवू लागले. उसामध्ये संशोधन करून विक्रमी उत्पादन काढले. त्यामुळे या परिसराची मोठ्या प्रमाणात भरभराट होऊ लागली. या परिसरातील इतर शेतकरीही त्यांचे अवलोकन करून आपल्या शेतीत ऊस पिकवू लागले व एकरी 100 ते 125 टन उत्पादन घेऊ लागले. विशेष म्हणजे, त्याकाळी संवत्सर परिसरातील बिरोबाचौक, रामवाडी, दशरथवाडी, लक्ष्मणवाडी, कान्हेगाव या गावांसह वारी परिसरात ऊस वाहतूक करण्यासाठी लाडीसची (छोट्या स्वरुपातील रेल्वे) निर्मिती केली़. या लाडीसमध्ये वरील परिसरात शेतात तोडलेला ऊस जमा करून कारखान्यात आणला जात असे़. हा त्या काळातील आधुनिक अभिनव यशस्वी प्रयोग होता. आजही वरील परिसरात काही ठिकाणी हा मार्ग पहावयास मिळतो.

कालांतराने करमशीभाईंनी या भागात मोठा दुधाचा उद्योग सुरू केला. त्यासाठी त्यांनी गुजरातमधून गीर, राजस्थानमधून सेहवाल जातीच्या शेकडो गायी आणल्या़. त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. करमशीभाईंनी ज्यावेळी साखर उद्योग सुरू केला, त्यावेळी कोठेही सहकारी साखर कारखाना नव्हता़. कालांतराने सहकाराची चळवळ सुरू झाली. त्यामुळे त्यांनी साखर कारखाना बंद करून 1967 साली त्यांनी वारीच्या कारखान्यात रासायनिक प्रकल्प सुरू केला़. त्याच्या उद्घाटनासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, कृषी राज्यमंत्री आण्णासाहेब शिंदे आले होते. त्यावेळी करमशीभाईंनी त्यांना आपली प्रगतीशील शेती दाखविली़. ती पाहून ते थक्क झाले. मात्र, 1962 साली कमाल जमीनधारणा कायदा आला होता. त्यामध्ये खासगी साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे ठरले. मात्र, त्या दरम्यान करमशीभाईंनी सर्व राजकीय मंडळींना आणून सर्व परिस्थिती दाखविली़. ‘मी देखील राष्ट्रहिताचेच काम करीत आहे. त्यामुळे आपण माझ्याकडील जमीन काढू नये,’ अशी विनंती त्यांनी सरकारला केली़. सरकारने ही विनंती फेटाळली आणि करमशीभाई यांच्याकडील जमिनी शासनाने काढून घेतल्या़. याच परिसरात शासनाने शेती महामंडळाची स्थापना केली. दरम्यानच्या काळात करमशीभाई यांनी परिसरात अनेक विधायक कामे केली़, ज्यामध्ये वारीच्या गोदावरी पुलाची निर्मिती, परिसरातील रस्त्यांची निर्मिती, गरीबांच्या मुलासाठी शैक्षणिक दालने उभी केली. खऱ्या अर्थाने त्या कालखंडात पारंपरिक शेती करून शेतकरी नुकसान सहन करायचे़. मात्र, पाटाचे पाणी मुबलक असतानाही या पाण्यामुळे शेती खराब होते, असा असलेला गैरसमज करमशीभाई यांनी शेतकऱ्यांच्या मनातून काढून टाकला़. येथील शेती सुजलाम सुफलाम केली.

त्या काळच्या पारंपरिक शेतीचे आधुनिक शेतीत रुपांतर करणारे खरे संशोधक ठरले. त्या काळात त्यांनी राबविलेले प्रयोग जर शासनाने देशात लागू केले असते तर ग्रामीण अर्थकारणात मोठी क्रांती झाली असती़. दुर्दैवाने तसे झाले नाही़. वारीचे तात्यासाहेब शिंदे (जहागीरदार), किसनराव टेके पाटील, बाबूशेठ संचेती, किशोर पवार, चांगदेव टेके पाटील, बन्शीसेठ काबरा, रामकिसन काबरा, मोतीशेठ ललवाणी, कचरू वाईकर, रेवजी वाघ, विष्णुपंत वाघ, मच्छिंद्र टेके पाटील, संवत्सरचे के. बी. आबक, पढेगावचे पंढरीनाथ शिंदे, लौकीचे माधवराव खिलारी, धोत्र्याचे गणपतराव चव्हाण, भोजडे येथील लहानू सिनगर पाटील यांच्यासह अनेक व्यक्तींचा करमशीभाई यांच्याशी जवळचा संबंध निर्माण झाला होता.

प्रेमळ आणि दिलदार व्यक्तिमत्त्व करमशीभाईंची एक आठवण नेहमी सांगितली जाते़. एकदा करमशीभाई कुठलीच पूर्व सूचना न देता रात्रीच्या वेळी रेल्वेने येऊन कान्हेगाव रेल्वे स्थानकावर उतरले़. साकरवाडी येथील त्यांच्या अतिथीगृहाकडे आले़. त्यावेळी तेथील गेटवर नुकतीच एका नेपाळ येथील व्यक्तीची सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्याने करमशीभाईंना बघितलेले नसल्यामुळे त्यांना आत जाण्यास मज्जाव केला़. ‘मी कारखान्याचा मालक आहे़ सोड मला, असे सांगूनही त्याने करमशीभाई यांना आत सोडण्यास स्पष्ट नकार दिला़. तेवढ्यात इतर लोकांना हा विषय समजल्यामुळे ते तेथे आले व सुरक्षा रक्षकाला माफी मागण्यास सांगितले गेले़. मात्र, करमशीभाई म्हणाले, ‘त्याने त्याचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावले आहे़. त्याला तर बक्षीस दिले पाहिजे़’ करमशीभाईंनी त्या सुरक्षा रक्षकाला बक्षिसी म्हणून थेट परमनंट करण्याचा निर्णय घेतला़. करमशीभाईंना ज्या व्यक्तीचे काम आवडेल, त्यासाठी ते काहीही करण्यास तयार असत़.

करमशीभाईंनी वयाच्या 60 व्या वर्षी व्यवसायाची जबाबदारी त्यांचे पुत्र डॉ. शांतीलाल सोमैया यांच्याकडे सोपवली आणि स्वत:ला पूर्णपणे समाजकार्यात झोकून दिले. तुम्हाला समाज जे काही देतो, ते सर्व तुम्ही विविध मार्गांनी परत केले पाहिजे, असा त्यांचा विचाऱ वाणिज्य, शिक्षण आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी पुढे भरीव कार्य केले़ त्यांचा हा वारसा त्यांचे नातू समीर सोमैया वृद्धिंगत करीत आहेत़. करमशीभाई हे अत्यंत प्रेमळ आणि दिलदार व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत साधे आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे व्यक्तिमत्त्व़ हातमागावर विणलेल्या खादीच्या कपड्यांची त्यांना विशेष आवड होती़. महात्मा गांधींनी दिलेला स्वदेशीचा नारा ते अशा पद्धतीने आयुष्यभर जगले़. त्यांनी शिस्तबद्धता आणि शिक्षण यांचे एक उत्तम दर्शन जगाला घडवले. ते अत्यंत दयाळू होते़. म्हणूनच त्यांनी अनेक गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली़. आपल्या प्रत्येक कामातून करमशीभाईंनी प्रेम आणि मानवतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. करमशीभाईंनी राबविलेला आणखी एक उपक्रम अद्याप सुरू आहे़. वारी परिसरात जर कोणी मयत झाले तर त्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य करमशीभाई मोफत पुरवित़. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा आजही सुरू आहे़. 9 मे 1999 रोजी करमशीभाई सोमैया यांचे देहावसान झाले़. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

करमशी भाई हा गांधीवादी उद्योजक. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारीला नवी दिशा देणारा. सीलिंग कायदा आला आणि सगळे उध्वस्त झाले. उद्योजक गांधीवादी हे ‘लिबरल’ होते. याची हा लेख साक्ष देतो.
परोपजीवी समाजसेवक तथाकथित गांधीवादी हे खरे तर गांधीवादी नव्हतेच, ते नेहरूवादी होते व आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!