चिंचेचे झाड दिसे मज चिनार….!
1 min read🌳 चिंच म्हणजे सुखद आठवणीचा काळ
चिंच हा शब्द जरी नुसता आपल्या कानावर पडला तरी आपल्या जिभेला लगेच पाणी सुटू लागते. आपल्या शरीरातील भावना आणि हॉर्मोन्स लगेच जागृत होतात आणि आपल्या जिभेवरती तरंगू लागतात. चिंच ही सर्वाना आवडते. चिंचेचा विषय निघाला की, आपलें मन लगेच भूतकाळात जाते आणि असंख्य आठवणी मनपटलावर जमा होतात. लहानपणी पावसाळ्यात जुलैनंतर चिंचेला छोट्या छोट्या चिंचा येण्यास सुरुवात होते. या कच्च्या चिंचा खाण्याचा आनंद अवर्णनीय असतो. या कच्च्या चिंचांवर सर्व जण तुटून पडतात. जानेवारीमध्ये या चिंचा घाबुळ्या होऊ लागतात, यावेळी तर चिंच खाण्यापासुन आपण स्वतःला रोखू शकत नाही. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी चिंच पिकते त्यावेळी ती आहे तशी तोडून एका बाजूने छोटे छिद्र पाडून आपण त्यामध्ये शेळीचे दूध सोडतो. कारण याचे दही बनते आणि मग आपण ते खातो. याप्रकारे चिंच म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद आठवणीचा काळ असतो.
🌳 अनंत काळापर्यंत फळं दे झाड
जगातील कोणतीही महाकाय आणि अनंत काळापर्यंत टिकणारी गोष्ट ही कशी निर्माण होते, हे आपल्याला चिंचेच्या झाडाकडून शिकायला मिळते. चिंचेचे बी हे खूप छोटे असते. ते जमिनीत टाकल्यानंतर उगविण्यासाठी जवळपास एक महिना घेते. उगवल्यानंतर या झाडाची वाढ़ खूप संथ गतीने होत असते. सुरुवातीच्या काळात हे झाड स्वतःचा विस्तार जमिनीखाली करते. पहिले 10 वर्ष हे झाड जमिनीच्या वरती खूप कमी वाढते. परंतु, जमिनीखाली ते खूप वेगाने खाली जाते. 10 वर्षानंतर ते जमिनीच्या वरती वेगाने वाढते आणि खूप कमी काळातच महाकाय वृक्ष बनते. या झाडाला 15 वर्षानंतर फळ येण्यास सुरुवात होते आणि अनंत काळापर्यंत हे झाड फळ देत राहते.
🌳 चिंचेच्या झाडाचे वैशिष्ट्य
चिंचेचे झाड अतिशय वेगाने वाढणारे आणि अनंत काळापर्यंत आयुष्य असलेले झाड आहे. या झाडाचा विस्तार महाकाय असतो. या झाडाला खूप छोटी छोटी पाने असतात. या झाडाच्या फ़ांद्या खूप चिवट असतात. कितीही वजन पडले तरी या फ़ांद्या मोडत नाहीत. त्यामुळे आम्ही लहानपाणी या फ़ांद्यांना लोंबकाळून झोका खेळत असत. या फ़ांद्याना धरून झाडावर चढत असत. या झाडाला मेमध्ये फुलोरा येतो, त्या फुलानपासुन चिंच बनते आणि चिंच परिपक्व होऊन पिकायाला साधारण एक वर्ष काळावधी लागतो. मार्च-एप्रिलमध्ये चिंच पूर्णपणे पिकते. चिंच हे खूप कमी पाण्यात येणारे झाड आहे. दुष्काळामध्ये तग धरणारे झाड आहे. भारतामध्ये सर्वत्र हे झाड चांगल्या प्रकारे वाढते. आज भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप प्राचीन आणि महाकाय चिंचेचे झाडे पाहायला मिळतात. पोपट या पक्षाचे हे आवडते झाड आहे. जुन्या चिंच झाडावरती पोपट हमखास पाहायला मिळतो.
🌳 औषधी गुणधर्म
चिंचेच्या झाडाचे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म खूप आहेत. मानव जातीसाठी हे झाड म्हणजे एक वरदान आहे. चिंच नियमित खाल्ल्याने शरीरातील एन्सुलिन नियंत्रणात राहते, त्यामुळे मधुमेह कमी होतो. चिंच ही शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कार्य करते, यामुळे वजन कमी करण्यास ही मदत करते. चिंच रक्तदाब नियंत्रणात ठेवते. चिंच शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. शरीर मजबूत करण्यासाठी चिंच फायदेशीर आहे. कारण ती ताकद वाढविते. चिंच दातदुखीवर सुद्धा गुणकारी आहेत. गायक चिंचेची पाने नेहमी खात असतात. कारण ही पाने घसा साफ ठेवण्याचे कार्य करतात.
🌳 आहारातील महत्त्व
आहारामध्ये पण चिंचेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक पदार्थांमध्ये चिंच पाणी वापरले जाते. चिंचेपासुन दही तयार केले जाते. आम्ही लहानपणी पाण्यात चिंच टाकून त्याचे चिंच पाणी करून त्यामध्ये भाकरी चुरून खात असत, याची चव अप्रतिम होती. खाद्य पदार्थात सांबर, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर गिरणीमध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते.
🌳 अवैध वृक्षतोड व जनजागृती
प्राचीन काळापासुन भारतामध्ये चिंच हा वृक्ष आढळतो. अनेक ठिकाणी घनदाट चिंचेची जंगले आपल्याला पाहायला मिळतात. मारुती चित्तमपल्ली यांनी विदर्भामध्ये मोठं मोठी चिंचेची वने आहेत, असे लिहिले आहे. मेळघाटामध्ये अनेक गावांमध्ये महाकाय चिंचेची झाडे पहायला मिळतात. आपल्या भागातही पूर्वीच्या काळी चिंचेची खूप झाडे होती. आधुनिक काळामध्ये चिंचेच्या महाकाय वृक्षाची लोकांनी कत्तल केली. यासाठी विविध कारणे दिली गेली. चिंच हे उत्पन देणारे झाड होते तरी पण लोकांनी या झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणावर केली. हजारो वर्ष जगलेली झाडे निर्दयी पद्धतीने तोडली गेली. आज कुठं तरी एखादे मोठे चिंचेचे झाड पहायला मिळते..काय माहीत की, हे झाड हा मानव अजून किती दिवस ठेवणार आहे. या झाडाची वृक्षतोड थांबविण्यासाठी शासकीय कायदे आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे.
🌳 100 टक्के उत्पादन व उत्पन देणारे झाड
चिंचेचे झाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून चिंचेचे रॊप बनते. बियांपासून रोपे तयार करून व शिवाय कलमे तयार करून रोप तयार केले जाते. आजच्या काळात या झाडाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कमी पाण्यात येत असल्यामुळे दुष्काळी भागामध्ये हे झाड उपयुक्त आहे. कोणताही खर्च न करता 100 टक्के उत्पादन व उत्पन देणारे हे झाड आहे.
🌳 1,500 झाडांची लागवड व संवर्धन
नागर फाउंडेशनने मागील दोन वर्षात रवळगाव येथील चिंतामणी मंदिर परिसरात 1,500 चिंचेच्या झाडांची लागवड करून यशस्वी संवर्धन केले आहे. आज ती झाडे चांगल्या प्रकारे वाढत आहेत. मी माझ्या शेतातही अनेक चिंचेची झाडे लावली आहेत. ती पण वेगाने वाढत आहेत. नागर फाउंडेशनने रवळगावमध्ये 500 चिंचेची रोपटी शेतकऱ्यांना लावण्यासाठी दिली होती, ती झाडें 90 टक्के यशस्वी झाली आहेत.
🌳 शेतकऱ्यांसाठी वरदान
चिंचेचे झाड शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. कोणताही खर्च न करता अनेक पिढ्यापर्यंत उत्पन मिळवून देणारे हे झाड आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये, बांधावरती, अंगणामध्ये, विहिरीवरती, पडीक क्षेत्र, माळरान किंवा जेथे मोकळी जागा असेल तेथे जास्तीजास्त चिंचेची झाडे लावावीत, अशी नम्र विनंती. विना मेहनत ही झाडे तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पुढील पिढ्याना अनंत काळापर्यंत उत्पन देत राहतील आणि पर्यावरण संतुलन करतील. यातून आपण दुष्काळमुक्तीकडे वेगाने जाऊ शकतो. या आज आपण सर्वजण मिळून संकल्प करू यावर्षी आम्ही जास्तीजास्त चिंच लावून तिचे संवर्धन करूया.
चिंच चावता चावता
जीभ वेडावली काही
दात आंबले तरीही
नाही म्हणवत नाही