मान्सून म्हणजे नक्की काय..?मान्सून देशात येतो कसा..?
1 min read🌧️ बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस
हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यानांच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे असे म्हणतात. या वाऱ्यांपासून भारतीय उपखंडात पाऊस पडतो म्हणून या वाऱ्यांना भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नैऋत्येकडून येणारे वारे समुद्रावरून प्रवास करत भारतात प्रवेश करतात. मान्सून म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस असा आहे.
🌧️ जमीन व समुद्राच्या तापमानावर वाऱ्यांचा प्रवास
भारताची भौगोलिक रचना द्विपकल्पीय आहे. तीन बाजूने समुद्र आणि उत्तरेकडे जमीन. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते आणि तेथील दाब कमी होतो. याच काळात जमिनीवरील तापमानाच्या तुलनेत समुद्राचे तापमान कमी राहते आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे समुद्राकडून कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात, या वाऱ्यांत बाष्प मोठ्या प्रमाणात असते. हे बाषपयुक्त वारे जमिनीवरील समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या भागात जातात व तेथून पुन्हा समुद्राच्या दिशेने परत फिरतात आणि एक चक्र पूर्ण होते.
🌧️ हवेतील बाष्पाचे पावसाच्या थेंबात रूपांतर
याच काळात जेव्हा हे बाष्पयुक्त वारे जमिनीवरून वाहात असतात, तेव्हा ती हवा थंड होते. यामुळे वाऱ्याची बाष्पयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि ते पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर बरसतात. यालाच “मान्सूनचा पाऊस “असे म्हटले जाते. भारतीय उपखंडात ही क्रिया साधारणपणे मे च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरंतर सुरू असते. त्यामुळेच भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर हा काळ नैऋत्य मोसमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो.
🌧️ वाऱ्याचे उलटे चक्र
या उलट हिवाळ्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात हे वाऱ्याचे चक्र उलटे फिरते. या काळात जमिनीवरचे तापमान समुद्रावरील तापमानापेक्षा तुलनेत कमी असते. त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात. भारतीय उपखंडावरील मान्सूनच्या वाऱ्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्यामुळे भारतात सर्वत्र सारख्याच प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यात दर 5 ते 10 किलोमीटरवर फरक पडतो.
🌧️ मान्सूनच्या तारखा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने अनेक वर्षांच्या निरीक्षणावरून मान्सून दाखल होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम 20 मे च्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो 5 जूनपर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यात दाखल होतो. नंतर प्रवास करत तो 10 जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात दाखल होतो. त्यानंतर 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. 1 जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होतो. दरवर्षी मान्सून या ठराविक तारखेलाच येतो, असे होत नाही. काही वेळा केरळात मान्सून दोन-चार दिवस अगोदर किंवा पाच ते सहा दिवस विलंबाने देखील दाखल होतो. यालाच मान्सून यंदा लवकर आला किंवा उशिरा आला असे म्हटले जाते.
🌧️ चार प्रमुख व 36 उपविभाग
💦 भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सूनच्या दृष्टीने देशाचे चार प्रमुख विभाग आणि 36 उपविभाग केले आहेत.
चार प्रमुख विभाग असे…
💦 वायव्य भारत,
💦 मध्य भारत,
💦 पूर्व व ईशान्य भारत
💦 दक्षिण भारत
🌧️ सरासरी पावसाच्या नोंदी
💦 आयएमडीने महिनेवार पावसाची सरासरी ही निश्चित केलेली आहे. त्यानुसार देशात जूनमध्ये सरासरी 163.6 मिमी, जुलैमध्ये 289.2 मिमी, ऑगस्मध्ये 261.3 मिमी तर सप्टेंबरमध्ये सरासरी 173.4 मिमी पाऊस पडतो. विभागवार पुन्हा या पावसाचे वितरण दरवर्षी सरासरी इतकेच राहील हे मात्र निश्चित नाही.
🌧️ महाराष्ट्राचे चार उपविभाग
महाराष्ट्राचे चार उपविभाग केले आहेत.
💦 कोकण-गोवा,
💦 मध्य महाराष्ट्र,
💦 मराठवाडा
💦 विदर्भ
त्यानुसार त्या-त्या उपभागात पडणाऱ्या पावसाची नोंद केली जाते. आयएमडीने महाराष्ट्रातील उप विभागवार पडणाऱ्या पावसानुसार सरासरी ठरवलेली आहे.
🌧️ उपविभागातील पावसाच्या सरासरी नोंदी
💦 जून ते सप्टेंबर या काळात कोकण व गोवा उपविभागात सरासरी 2,915 मिमी, मध्य महाराष्ट्रात 729 मिमी, मराठवाड्यात 683 मिमी तर विदर्भात 955 मिमी पाऊस पडतो.
🌧️ पर्जन्यछायेचा प्रदेश
भारतात मान्सूनच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत. एक शाखा बंगालच्या उपसागरातून कार्यरत राहते तर दुसरी शाखा अरबी समुद्राकडून. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यातील काही जिल्ह्यांना मुख्यत: अरबी समुद्रातील शाखेकडून पावसाचा लाभ होतो. तर विदर्भाला बंगालच्या उपसागरातील शाखेकडून लाभ होतो.
महाराष्ट्रात सह्याद्री किंवा पश्चिम घाट हा पावसाचा दुभाजक म्हणून काम करतो. या पर्वतरांगामुळे कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी होते. तर पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात त्या तुलनेत कमी पाऊस पडतो. बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगाना अडतात आणि घाटमाथा व कोकणात भरपूर पाऊस देतात. मात्र, पुढे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत: अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात येईपर्यंत या मोसमी वाऱ्यांमधील बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.
©️ संदर्भ : विकिपीडिया/अजय कुलकर्णी.
©️ संकलन : मिलिंद पंडित, कल्याण.
©️ हवामान साक्षरता अभियान…!