ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांचे थैमान….🐀
1 min read🐀 झाडाच्या खोडात राहणारे घुबड (Owl). झाडाच्या शेंड्यावर बसून शेताची राखण करणारे ससाणे. किडी मुंग्यापासून सुटका करणारे पक्षी(Birds). त्यांची घरे उद्ध्वस्त झाली. गावाच्या वेशीवर झाडा झुडुपात ढोली करून राहणारे कोल्हे (Fox) आणि मार्जार (Cat) कुळातील प्राणी इत्यादींचा नायनाट झाला. व्यापारी कंपन्यांनी केलेल्या एकल पीक लागवडीमुळे पीक खूप मोठ्या प्रमाणावर आले. पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पिकांवर टोळधाडी (Locusts) आणि इतर उपद्रवी प्राण्यांची संख्या वाजवीपेक्षा जास्तीने वाढत गेली. परिणामी अधिकाधिक फवारणी होऊ लागली, खते, कीटकनाशक औषधे यांच्या वापरामुळे विषाक्त अन्न (Toxic Food) तयार झालं. जे पृथ्वीच्या पाठीवर ठिकठिकाणी वितरीत झालं. ज्यामुळे जिथं हे पीक जाईल तिथल्या स्थानिक शेतमालाचे भाव देखील पडत गेले. ज्यामुळे त्या त्या देशातील पारंपरिक शेतकरी देखील दुःखी होत गेला. आणि असे विषारी अन्न खाऊन कित्येक लोक कॅन्सरसारखे (Cancer) दुर्धर आजार होऊन मेले.
🐀 ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांनी थैमान घातलं असं वाचलं. तिथे प्रत्येक शेतकरी दररोज त्याच्या घरातून शेकडो उंदीर मारून बाहेर काढून देखील त्यांची संख्या आटोक्यात येत नाही. त्यांच्या घरातील वस्तू उंदीर खराब करत आहेत आणि एवढच काय रात्री झोपेत देखील कित्येकांना उंदीर चावा घेत आहेत. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी तब्बल 5,000 लिटर ब्रोमाडायोलिन (Bromadioline) नावाचं विष भारतातून आयात केलं आहे, असं त्यांच्या सरकारनं सांगितलं. यावर्षी उन्हाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे ऑस्ट्रेलियात चांगले पीक आले. ज्यामुळे उंदरांची संख्या हाताबाहेर गेली, असं तिथल्या शेती तंत्रज्ञ लोकांचं मत आहे. परंतु ते चुकत आहेत. उंदरांची संख्या वाढली, कारण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे घटक जैवविविधता नष्ट केल्याने नष्ट झालेत. ढोलीमध्ये राहणारे कोल्हे, रानमांजरी, झाडावर राहणारे घुबड, गरुड, ससाणे शेतात विचरण करणारे साप (Snake) हे सर्व घटक आणि त्यांचे अधिवास यांत्रिक शेतीने नष्ट केले. जे उरले त्यांना पेस्ट कंट्रोलने संपवले.
🐀 एक जोडी उंदीर वर्षाकाठी जवळपास 5,000 उंदरांची पैदास करतो. परंतु, एक घुबड, एक साप, एक रानमांजर प्रत्येक आठवड्याला सरासरी चार जोडी उंदीर खाऊन फस्त करतात. ज्यामुळे त्या जोड्या प्रजनानातून बाद होतात. म्हणजेच एक घुबड, एक साप, एक रानमांजर, एक कोल्हा वर्षाकाठी सरासरी चार ते पाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवत होता. पण जैवविविधता नष्ट केल्याने उंदरांना भक्षक उरले नाहीत आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा पीक जास्त आले, तेव्हा तेव्हा उंदीर वाढत गेले आणि विषारी फवारणी केली जाऊ लागली. झिंकची विषारी भुकटी साठवण केलेल्या धान्यावर लावली जाऊ लागली. पुढे त्याचे मानवी शरीरावर परिणाम काय होणार ते अधिक सांगायला नको.
🐀 आता जे विकसित देशात झालं, अगदी त्याच मार्गावर आपण देखील जाऊ पाहत आहोत. यांत्रिक शेती, करार शेती, यातून जन्माला येणारे एकल पीक लागवड आणि त्यातून होणारा जैवविविधतेचा (Biodiversity) नाश भारतात देखील सुरू होणार आहे किंबहुना काही ठिकाणी सुरू झाला आहे. आपण त्वरित डोळे उघडुन जागं होणे गरजेचे आहे. अन्यथा विनाश अटळ आहे.
राखू दूर दृष्टी, वाचवू पृथ्वी सृष्टी….!