गुजरातच्या गणदेवी कारखाना उसाला प्रति टन 4,361 रुपये भाव देतो, मग महाराष्ट्रात का नाही?
1 min readगुजरातमध्ये चढे दर
देशातील सर्वात जास्त रिकव्हरीचा (Recovery) ऊस गाळणाऱ्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व राज्यातील बाकीच्या जिल्ह्यातील कारखान्यांचा इतिहास बघता गणदेवींचा कमीतकमी दरही ते देणार नाहीत. एफआरपी (FRP-Fair and Remunerative Price) देतानाच दमछाक झाल्याचा आव आणतात. गुजरातमधील बारडोली साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या 10.95 टक्के रिकव्हरी उसासाठी ऊस तोडणी व वाहतूक वजा करून जास्तीतजास्त 3,503 रुपये तर कमीतकमी 3,203 रुपये प्रति टन दर देण्याचे जाहीर केले आहे. सायन साखर कारखान्याने 10.62 टक्के रिकव्हरी उसाला जास्तीतजास्त 3,281 रुपये व कमीतकमी 3,031 रुपये प्रति टन, चलथान साखर कारखान्याने 11.02 टक्के रिकव्हरी उसाला जास्तीजास्त 3,106 रुपये व कमीतकमी 2,906 रुपये प्रति टन दर देण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आता (एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात) हंगाम संपला असून, मेमध्ये गाळप होणाऱ्या उसाचा दर त्यांनी आताच जाहीर केला आहे. गणदेवी साखर कारखान्याने 31 मार्च 2022 रोजी शिल्लक असलेल्या साखरेचे (Sugar) 3,200 रुपये प्रति क्विंटल मु्ल्यांकन करून हा दर जाहीर केला.
गुजरातमधील साखर कारखान्यांचे अर्थशास्त्र
महाराष्ट्रात उसाला असे दर जाहीर करणे दूरच राहिले, साखर कारखान्याच्या संघटना ‘उसाला वाहतूक व साखर उतारा घट अनुदान द्या’, अशी राज्य सरकारकडे मागणी करत आहेत. गणदेवी येथील कारखाना पहिली उचल प्रति टन 800 रुपये, दुसरा गाळप हंगाम संपल्यावर 800 रुपये व उर्वरीत सर्व दिवाळीपूर्वी देतो. ऊस दर रक्कम चांगली मिळत असल्याने शेतकरी राजीखुशीने 800 ते 1,000 रुपये प्रति टन ठेव म्हणून साखर कारखान्याकडे ठेवतात. त्यामुळे कारखान्याला कर्जाच्या व्याजदराने रक्कम घेण्यापेक्षा ठेवीच्या व्याजदराने रक्कम वापरण्यास मिळते. गेली अनेक वर्षे गुजरातमधील कारखाने हे अर्थशास्त्र वापरतात. एखादा कारखाना आर्थिक संकटात सापडला तर त्याच्या मदतीला बाकीचे साखर कारखाने धावून जातात.
महाराष्ट्रात राजकीय कुरघोड्या
महाराष्ट्रात सत्तेच्या बळावर अथवा राजकीय कुरघोड्या करून एकमेकांचे साखर कारखाने बंद कसे पडतील? ते आर्थिकदृष्टया गोत्यात कसे येतील? याचा विचार करून त्यावर अंमल करतात. शेतकऱ्यांनाही त्याचा राग येत नाही. गणदेवी साखर कारखान्याने साखरेचे संपूर्ण उत्पन्न उसाचा भाव म्हणून शेतकऱ्यांना दिला आहे. ऊस तोडणी, वाहतूक व गाळप खर्च उप व सहपदार्थाच्या उत्पन्नातून भागवला आहे. हे सूत्र महाराष्ट्रातील कारखान्याना का जमू नये?
शेतकरी नेते एफआरपीमध्ये गुंतले
महाराष्ट्रातील साखर कारखाने व काही शेतकरी नेते केवळ FRP मध्ये, ती ही एकरकमी की तुकड्याने मिळणार, यात अडकले आहेत. तोच त्यांना मोठा राजकीय मुद्दा वाटतो. मात्र शेतकरी संघटनेने (शरद जोशी प्रणित) गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातमधील व गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे अंतिम दर जास्त मागीतला आहे. यंदा गणदेवीं कारखाना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीतील गाळप उसाला FRP पेक्षा 588 रुपये तर फेब्रुवारीमध्ये 688 रुपये, मार्चमध्ये 788 रुपये, एप्रिलमध्ये 888 रुपये, मेमध्ये 988 रुपये जास्त दर देणार आहे. त्यामुळेच ‘गुजरातचे ऊस उत्पादक शेतकरी ठेवीदार तर महाराष्ट्रातील लुटीमुळे कर्जदार’ बनले आहेत.