krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची रिकव्हरीत लूट

1 min read
sugar mills: चालू ऊस गळीत हंगामाची सांगता होत आहे. बरेच साखर कारखाने बंद झाले आहेत. तशातच गाळपाचा व साखर उत्पादनाचा उच्चांक झाला आहे. या हंगामाची रिकव्हरी (Recovery) लवकरच जाहीर केली जाईल. पण शेतकऱ्यांची लूट काही थांबत नाही.

अनेक वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष काटामारीकडे वळवले जात आहे. आजही काही कारखान्याबाबत तशी शंका घेतली जाते. पण शेतकऱ्यांनी त्याविरुद्ध आवश्यक तशी पावले न उचलल्याने व सक्षम पुराव्यानिशी तक्रारी केल्या नसल्याने काटामारीचा विषय तडीस गेला नाही.
याविषयी कारखानदारांबरोबरच सरकारच्या वजनमापे विभागाकडे संशयाने पाहिले जाते.

अधिक रिकव्हरीच्या जातीचा वापर
ऊसाची रिकव्हरी/शर्करांश प्रमाण (उसातील साखरेचे प्रमाण) कमी दाखवले जाते. याकडे आमच्या शेतकरी संघटनेने वेळोवेळी लक्ष वेधले आहे. अलीकडील सहा-सात वर्षात आपल्या भागातील शेतकरी को-86032, फुले-10001, कोसी-671, व्हीएसआय-3102, कोएम-265, व्हीएसआय-3102 सारख्या 20 ते 23.5 टक्के रिकव्हरीच्या जातीचा ऊस उत्पादित करतात. या टक्केवारीत सी-हेवी मोलासीसमधील 18 ते 20 किलो म्हणजे 1.8 ते 2 टक्के साखर अंशाचाही समावेश आहे. सात-आठ वर्षांपूर्वी आपल्या भागातील शेतकरी आतापेक्षा 3 ते ६6 टक्के कमी रिकव्हरीच्या को-7219, को-8014, कोएम-7527, को-740, कोएम-7125, को-8011 सारख्या उसाच्या जाती उत्पादित करत होते.

पुढाऱ्यांवरील आंधळे प्रेम
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यानी गेल्या 10 वर्षात जाहीर केलेल्या प्रत्येक हंगामाच्या सरासरी रिकव्हरीवर नजर टाकली असता. पाच ते दहा वर्षांपूर्वी इतकीच रिकव्हरीे आताही दाखवली जात आहे. हे शेतकऱ्यांच्या लुटीचे गंभीर प्रकरण आहे. सभासद शेतकऱ्याना कारखान्याच्या वार्षिक अहवालातून रिकव्हरीची माहिती मिळत राहते. पण पुढाऱ्यांवरील आंधळ्या प्रेमामुळे दुर्लक्ष केले जाते. ऊसकरी शेतकरी असून, ‘पुढाऱ्यांची तळी उचलणारे’ कार्यकर्ते याचा जाब विचारत नाहीत. हे दुर्दैव आहे.

कारखाने बनले राजकीय अड्डे
पूर्वी हुतात्मा (वाळवा) कारखाना सलग सहा वर्षे 13 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी दाखवत होता. त्याकाळच्या उसाच्या जातीपेक्षा आता जास्त रिकव्हरीचा ऊस गाळप करूनही साखर उतारा प्रती टन ऊसामागे 7 ते 12 किलोनी (0.7 ते 1.2 टक्के) कमी दाखवत आहे. तसेच विश्वास (चिखली) ने 8 ते 10 वर्षांपूर्वी सलग 13 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी दाखवली आहे.आता रिकव्हरी वाढलेल्या व्हरायटीचे गाळप करूनही 1 ते 1.5.टक्के कमी दाखवतात. या कारखानदारांनी निवडणूका लढवण्यास सुरुवात केल्यापासून रिकव्हरी घटवल्याचे दिसते. सर्वच कारखान्यांनी आधुनिक जातींच्या वाढीव रिकव्हरीचा फायदा शेतकऱ्यांना दिलेला नाही. हे कारखाने उद्योग न राहता, राजकीय अड्डे बनले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना टनामागे शेकडो रुपये कमी मिळाले आहेत. जिल्ह्यात जवळून ऊस मिळणारा व सर्वाधिक रिकव्हरीचा ऊस गाळप करणारा सर्वोदय (कारंडवाडी) हा कारखाना आहे. पण तोही रिकव्हरी कमी दाखवतो.
एकीकडे जास्त रिकव्हरीचे ऊस शेतकरी देवू लागले, तर दुसरीकडे सरासरी रिकव्हरी कमी दाखवली जात आहे. या लुटीची शेतकरी संघटना ऊस नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असून, ऊस उत्पादकांचे मेळावे घेणार आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!