शेतकरी स्त्री : आहार आणि आरोग्य!
1 min read🌱 उपेक्षित घरलक्ष्मी-श्रमलक्ष्मी; धान्यपूर्णा-अन्नपूर्णा
आता हे जगजाहीर आहे की, गरज नसताना आयात करून आणि संधी असूनही निर्यात थांबवून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडता येतात. हे ही जगजाहीर आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या जातीचा आणि पक्षाचा इतका काही अभिनिवेश असतो की, त्यांच्यात एकजूट होत नाही. त्यामुळे सगळ्याच शेतकऱ्यांना सगळेच पक्ष गृहीत धरतात. मात्र, यामुळे शेतकऱ्याच्या घरलक्ष्मीवर कायमच अन्याय होत आला आहे. ती स्वतः शेतात घरधन्यापेक्षा जास्त कष्ट करते. त्या श्रमलक्ष्मीमुळे शेती चालते. ती धान्यपूर्णा होऊन घरी आलेल्या धान्याची काळजी घेते. अन्नपूर्णा होऊन सगळ्यांना जेवू घालते. मायेने जिव्हाळ्याच्या नात्यांच्या धाग्याने कुटुंबाला जोडून ठेवते. शेती हा माणसाचा पहिला व्यवसाय आणि कुटुंब ही सामाजिक उत्क्रांतीतील शेवटची सर्वोत्तम व्यवस्था आहे. पण, शेती आणि कुटुंब दोन्हीही अतिशय सक्षमपणे सांभाळणारी शेतकरी स्त्री मात्र उपेक्षितच आहे.
🌱 बालपणापासून कष्टी जीवन
आजच्याही स्थितीत शेतकऱ्याच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेणे सुखावह नाहीच. तिला लहानपणापासून आईला मदत करता करता सगळे घरकाम करावे लागते. झाडलोट, सडासारवण, गाईचे दूध काढणे, वगारावासरांना कणीक पीठाचे उंडे चारणे, धुणे, भांडी करणे, पाणी भरणे ही तिचीच कामे. पेरणी सुरू असेल तर खत द्यायला, निंदण सुरू असेल पुंजाणे टाकायला आणि फवारणी सुरू असेल तर कळशी पोहऱ्याने पाणी पुरवायला तिला वावरात जावेच लागते. खताचा पहिला फेर झाला की, तिचे शाळेतजाणे सुरु होते. तोपर्यंत 15 ऑगस्टआलेला असतो. शाळेतून नवीन ड्रेस मिळतो. मग ती काम आणि शाळा आलटून पालटून करू लागते. पैसे वाचवायला स्वतःच्या वावरात आणि पैसे कमवायला दुसऱ्याच्या वावरात. कापूस वेचणी सुरू झाली की, सकाळीच वावरात जायचे व कापूस वेचायचा. आई घरची कामे उरकून वावरात आली की, घरी जाऊन अंघोळ,जेवण उरकून शाळेत जायचे. रात्री लाईन असेल तर पुस्तक उघडून बसायचे. थकल्या डोळ्यांनी पेंगत पेंगत अभ्यास करायचा. शाळेतले सर आणि मॅडम चांगले असतात. त्यांना जमेल तेव्हा ते वर्गात शिकवतात आणि परीक्षेत पासच करतात. नापास कुणालाच करत नाहीत. मॅट्रीकच्या परीक्षेत मात्र समोरच्या फळ्यावर लिहिलेली उत्तरे पेपरात पटापटा लिहावी लागतात. मॅट्रिक पास असेल तर नोकरदार नवरा मिळण्याची शक्यता. नाहीतर आहेच औतामागे जाणारा. पण, नोकरदाराला हुंडा द्यावा लागतो आणि नोकरीसुद्धा पैसे मोजून मिळते. त्यासाठी कधी कधी वावर तुकडा विकावा लागतो नाही तर बैलजोडी. टीव्हीत बघितलेले प्रेम… लग्न .. काचेच्या पलीकडेच राहते.टीव्ही सिनेमे बघून घरातून पळून जाऊन प्रेम केलेल्यांच्या आयुष्याची
लक्तरे होतात, हे पाहून शेतकऱ्यांच्या मुली शहाण्या होतात.
🌱 पाठीचे खापर आणि कमरेची काडी
लग्नापूर्वी आईबरोबर, लग्नानंतर सासूबरोबर वावरातली कामे सुरू! पाठीचे खापर आणि कमरेची काडी होईपर्यंत कामे करायची. निंदण करताना बोटे फुटली तर काथ-चुना लावून चिंधी बांधायची. पण निंदण थांबवायचे नाही. चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागली तरी घरात कुणाला फारसे कौतुक नसते. उगाच कोणी नावं ठेऊ नये म्हणून पाळण्याचा कार्यक्रम उरकला जातो. ‘शेतकऱ्याची बायको शेवटच्या घटकेपर्यंत घरा-वावरात काम करते’ असे घरातील मोठ्या बायकांकडून ऐकावे लागते. घरी गाय-म्हैस असली तर जास्त उठबस हिचीच होणार. जास्तीत जास्त दूध, दूध संकलन केंद्रावर जाणार. मानव्हाईक पाहुणा आला तर घरात बासुंदी होणार. उरली सुरली डावभर हिला मिळणार. भाजीपाला घरच्याच वावरातला असला तरी चांगला चुंगला निवडून बाजारात पाठवायचा. उलटी पट्टी यायला लागली किंवा उलंगवाडी झाली की मग हिच्या ताटात भाजी दिसते. पोळ्याला घरादाराला पुरणपोळी रांधून वाढणारी, गाईला गोग्रास, बैलांना कुड्याच्या पानातून पुरणपोळी चारणारी घरलक्ष्मी स्वतः मात्र त्यादिवशी पिठोराच खाते. क्वचित कोंबडं, बकरं कापल्या गेले तर पूर्वी मसाला वाटता वाटता खांदे दुखायचे आता भावकीत नोकरीवाल्याकडे नक्कीच मिक्सर असतं. मसाला वाटून मिळतो. पण अनेक घरांत मांसाहार फक्त पुरुषांनीच करायचा आणि ‘जीभ आणि जीव अजून बाटला नाही’ असं बायकांनी स्वतःच कौतुक
करण्याची पद्धत आहे.
🌱 आहार आणि आरोग्याची आबाळ
तिचा घरधनी कधीमधी तालुक्याला गेला तर त्याला परवडेल असे काहीबाही तिला आणून देतो. आजकाल गर्भवतींना सरकारातून खावटी मिळते, सकस आहार घेण्यासाठी. शेतकरी अन्नदाता-पोशिंदा त्याच्या गर्भवती बायकोला सरकारातून सकस आहार. काय हे शेतकरणीचे नशिब! बाळंतपणात दवाखान्यात मिळालेल्या औषधी, गोळ्या संपल्या की, संपले बाळंतपण! बारशाच्या दिवशी मात्र रिवाज म्हणून का होईना, माहेराहून आलेले खारीक खोबऱ्याचे गोडंबी-चारोळीचे लाडू खायला मिळतात. शेतकऱ्याच्या बायकोच्या आहार आणि आरोग्याची अशी तऱ्हा असते. विज्ञानामुळे आणि सगळ्यांना आलेल्या शहाणपणामुळे सततच्या बाळंतपणांतून तिची सुटका झाली आहे. पण आहार आणि आरोग्याची आबाळच आहे.
🌱 जुन्या पौष्टिक धान्याची आठवण
आता शहाण्या सुरत्यांना पुन्हा ‘जुनं पौष्टिक धान्य’ आठवू लागले आहे. हे वर्ष पौष्टिक धान्य वर्ष म्हणून जागतिक स्तरावर साजरे करणार आहेत. म्हणजे कागदोपत्री पौष्टिक धान्याचे कौतुक करण्याचे हे वर्ष आहे. आपल्या प्रदेशात पिकणारे धान्य आपल्यासाठी पौष्टिक असते. विदर्भात पिकणारी ज्वारी, बाजरी, तांदूळ, भड्डी, तूर, उडीद, मूग, बरबटी’ तीळ, भुईमूग, जवस हे वैदर्भियांसाठी पौष्टिक धान्य आहे. गहू किंवा मका विदर्भातले मुख्य धान्य नाहीत. पण आता गहू, मका आणि ओट्स खाणे प्रतिष्ठेचे समजले जाते. टीव्हीवरच्या खाद्य पेयांच्या जाहिरातींशी प्रामाणिक राहून, परदेशी पदार्थ कौतुक करत करत खाणारा सधन वर्ग खूप मोठा आहे. निम्न आर्थिक स्तर असणाऱ्यांना सरकारी खरेदीचे आणि आयात केलेले धान्य पुरवले जाते. स्वस्त धान्य दुकानांमुळे गहू आणि मका लोकप्रिय झाला. त्यामुळे विदर्भाचे वैशिष्ट्य असलेल्या खरीप-रबी ज्वारीचे उत्पादन आता जवळ जवळ संपुष्टात आले आहे. ज्वारी, बाजरी खुडणे हे काहीसे कष्टदायक काम आहे. पूर्वी शेतावर काम करणाऱ्या गड्यांना-सालदारांना ‘साल’ म्हणजे वार्षिक वेतन ठरवताना पैशाबरोबरच ज्वारीचेही मोजमाप असे. महिन्याला 40 ते 50 किलो ज्वारी शेतकरी गड्याला देत असे. महिला मजुरांना ज्वारी खुडण्याची मजुरी म्हणून विशिष्ट टोपली भरून कणसे दिली जात. त्याला वण म्हणत. परंतु, जेव्हापासून गहू स्वस्त म्हणजे 2 रुपये किलो मिळू लागला, तेव्हापासून कामाच्या मोबदल्यात ज्वारी हा व्यवहार थांबला. त्यामुळे आता ज्वारी, बाजरी खुडण्यासाठी मजूरही मिळत नाहीत. शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनीही व्यवहारीपणाने ज्वारी, बाजरी पेरणे बंद केले.
🌱 ज्वारी
ज्वारीच्या अनेक जाती विदर्भात पिकत होत्या. मोतीतूर नावाची ज्वारी लाह्यांसाठी सुप्रसिध्द होती. नागपंचमीला घराघरात मोतीतूराच्या लाह्या फोडल्याचा खमंग वास यायचा. भाद्रपदात महालक्ष्म्यांच्या उत्सवात ज्वारीच्या आंबीलीचाच प्रसाद. सामुदायिक सहभोजनासाठी ज्वारीच्या घुगऱ्यांचा मान होता. ज्वारीच्या कण्यांची खिचडी आवडीने खाल्ली जायची. ज्वारीच्या पीठाचे पापड, धापोडे आणि खारोड्या लहान मुलांचा आवडता खाऊ होता. कष्टकऱ्यांना खमंग खरपूस भाकरी तर आजाऱ्यांना ज्वारीच्या पीठाची पेज योग्य आहार आहे. ज्वारीच्या हुरड्याची तर मेजवानीच असायची. त्यातही ‘वाणीचा हुरडा’ खासच. दाणा भरली कसं हिरवी असतानाच खुडून भाजायची. त्या भाजलेल्या हुरड्या बरोबर भाजलेली हिरवी मिरची, मीठ, दही. रात्री अंगणात पंगतच बसायची. कधी भाजलेला हुरडा कुटून त्यात चवीपुरते भाजलेले तीळ घालून गुळ तूप घालून लाडू व्हायचे. नवरात्रात ज्वारी दळतानाच त्यात उडदा मुगाचा कळणा घालून त्या पिठाच्या भाकरीच खाण्याची विदर्भात पद्धत आहे. पचायला हलका आणि तरीही आरोग्य वर्धक असा हा आहार. एरवीही ज्वारीच्या भाकरीबरोबर तुरीचे वरण खाण्याची पद्धत आहे. डाळीतून भरपूर प्रथिने आणि ज्वारीतून पिष्टमय, तंतुमय पदार्थ आणि कोंडा मिळतो.
🌱 जाड तांदूळ
विदर्भात जाड तांदळाचे उत्पादन होते. हे धान कांडल्यानंतर तूस निघून गेल्यावर हा तांदूळ लाल दिसतो. हा चवीला गुळचट असतो. या तांदळाच्या पिठाची धिरडी, कण्यांचा उपमा, भाज्या किंवा मोड आलेले कडधान्य किंवा डाळी घालून खिचडी करण्याची पद्धत होती. पण, पांढऱ्या शुभ्र बारीक तांदळाच्या कौतुकामुळे हा तांदूळ वापरात येत नाही.
🌱 बाजरी
बाजरीत भरपूर लोह असते. पूर्वी दिवाळीपासून रथसप्तमीपर्यंत बाजरीचे अनेक पदार्थ घराघरात होत. तीळ लावून केलेल्या खमंग भाकरी, बाजरी कांडून केलेली खिचडी, बाजरीचे पीठ गूळ तूप घालून घट्ट भिजवून त्याचे वाफवलेले मुटकुळे दुधाच्या सायीबरोबर खाण्याची पद्धत होती.
🌱 भड्डी
भड्डी हे खास कोरडवाहू शेतीत पावसाच्या पाण्यावर पिकणारे धान्य. भगरी सारखाच थोडा मोठा दाणा आणि रंग पिवळा! अतिशय रुचकर भात हळद न घालता पिवळा धमक दिसतो.
🌱 वन कायद्यांचा अडसर
ज्वारी, बाजरी, भड्डी, तूर, उडीद, मूग बरबटी ह्यांचे उत्पादन हलक्या जमिनीत व कोरडवाहू शेतीतही चांगले येते. पावसाचा आणि वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावाचा उत्पादनावर परिणाम होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक ठिकाणी रानडुकरे, रोही, माकडे, हरिणांचे कळप या पिकांची नासधूस करतात. वनकायद्यांमुळे शेतकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करू शकत नाही. परिणामत: शेतकऱ्यांनी ही पिके घेण्याचे प्रमाण कमी केले आहे.
🌱 प्रायोगिक तत्त्वावर उत्पादने घ्यावी
आज या सगळ्या पौष्टिक धान्यांचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात घेतले जाते. या धान्यांचे उत्पादन वाढवायचे असेल तर आधी प्रायोगिक तत्त्वावर करून बघितले पाहिजे. शेतकऱ्यालाही आता जमेल तसे जीवनमान उंचावण्यासाठी कापसासारखी नगदी पिके घ्यावीच लागतात. सामान्य शेतकरी असे प्रयोग करायला धजावणार नाही. ज्यांना उत्पन्नाचे इतर मार्ग आहेत, जे हौस म्हणून शेती करतात, त्यांना हा प्रयोग करायला प्रोत्साहन द्यावे. पारंपरिक शेतीचा पुरस्कार करत असल्यामुळे आता कृषी विद्यापीठांची गरज नाही. सद्यस्थितीत कृषी विद्यापीठांच्या पडीत राहिलेल्या जमिनी, कृषी अधिकारी आणि कृषी संशोधकांना भाडे तत्त्वावर देऊन त्यांचेकडून पौष्टिक धान्य शेती करवून घ्यावी. त्यांचे वेतन कमी केल्यास ते जास्त हिरीरीने शेती करतील.
🌱 निर्यातीची वेगळी व्यवस्था हवी
या धान्यांच्या निर्यातीची वेगळी व्यवस्था करावी लागेल. आजपर्यंत शेतमाल आयात-निर्यात धोरण ठरविताना शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही. त्यामुळे ते धोरण नक्की ठरवावे लागेल आणि राबवावे लागेल. धान्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक गृहिणी तयार पिठे घेणे पसंत करतात. त्यामुळे कंपन्यांकडून जी पिठे पुरवली जातात. त्याचाच उपयोग बहुसंख्य गृहिणी करतात. पौष्टिक धान्य हवे असेल तर सोयीचे आणि स्वस्त धान्य खाणे थांबवावे लागेल. बाजारात खऱ्याखुऱ्या (जाहिरातीतल्या नाही) पौष्टिक धान्यांची मागणी वाढली तर पुरवठाही होईलच.
परिस्थिती चें गांभिर्य योग्य शब्दात व्यक्त झाले आहे
लेखिकेची कळकळ स्पष्ट होते
धन्यवाद
श्री ग बापट