अमेरिकेतून होणार 1 लाख टन सोयाबीन तेलाची आयात!
1 min readउत्पादनात घट आणि किमतीत वाढ
दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या देशांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे तेथील सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. सोयाबीनला भरीव मागणी असली तरी पुरवठा प्रभावित झाला आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय पातळीवर पामतेलाच्या (Palm Oil) किमतीत वाढ झाली आहे. परिणामी, भारतीय व्यापाऱ्यांनी अमेरिकेकडून सोयातेल (SoyoOil) आयातीला पसंती दर्शविली आहे. त्याअनुषंगाने भारतीय व्यापाऱ्यांनी अमेरिकेतून 1 लाख टन सोयाबीन तेल आयातीसाठी (SoyOil Import) करार केले आहेत. भारत अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल खरेदी करणार असल्याने अमेरिकेतील सोयाबीन व सोयातेलाच्या किमतींना आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यातच यावर्षी अमेरिकेत सोयाबीन व सोयातेलाच्या किमती 20 टक्क्यांनी वधारल्या आहेत. ही दरवाढीची चालू दशकातील सर्वोच्च पातळी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अमेरिका एकमेव पर्याय
मागील दोन दशकात भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार (Edible OIl Importer) देश बनला आहे. भारतात सहसा अर्जेंटीना (Argentina) आणि ब्राझील (Brazil) या दोन देशांमधून सोयातेलाची खरेदी व आयात केली जाते. यावर्षी या दोन्ही प्रमुख खाद्यतेल निर्यातदार देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना अमेरिकेकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही तज्ज्ञांचे सांगितले. ‘अमेरिकेतील सोयातेलाचे दर आर्थिकदृष्ट्या परवडणारे होते. दुसरीकडे, दक्षिण अमेरिकन देशांमध्ये सोयाबीन व सोयातेलाचा पुरवठा मर्यादित होता. त्यामुळे भारतीय खरेदीदारांनी अमेरिकन सोयातेलाची खेरदी केली,’ अशी माहिती काही भारतीय व्यापाऱ्यांनी (Traders) दिली. येत्या काही दिवसांमध्ये आणखी सोयातेल खरेदी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोयातेल निर्यातदार देश
भारताला लागणाऱ्या सोयातेलापैकी साधारणतः दोन तृतीयांश सोयातेल अर्जेंटिना आणि उर्वरित ब्राझीलमधून आयात केले जाते. गेल्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अर्जेंटीनामधील सोयातेलाचा साठा कमी झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या सोयातेल निर्यातीवर झाला. त्यामुळे भारतीय खरेदीदारांना पर्याय शोधावे लागत आहेत. त्यात काळ्या समुद्राच्या आसपासच्या प्रदेशातून सूर्यफूल तेल खरेदी करावी लागत आहे.
रशिया-युक्रेन युद्ध
सूर्यफूल तेलाचे दर पाम आणि सोयातेलापेक्षा कमी आहेत. युक्रेन सूर्यफूल उत्पादनात जगात अग्रणी आहे. परंतु, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सूर्यफूल तेलाचे उत्पादन व पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे खरेदीदार पुरवठ्याबाबत साशंक आहेत, अशी प्रतिक्रिया काही भारतीय व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कच्च्या सोयाबीन तेलाचे दर 1,620 डॉलर प्रति टन असून, सूर्यफूल तेलाचे फार 1,515 डॉलर आणि पामतेलाचे दर प्रति टन 1,575 डॉलर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यात विमा व मालवाहतूक खर्चाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी 2022 आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयातेल पाम आणि सूर्यफूल तेलाच्या तुलनेत स्वस्त होते, परंतु, सोयातेलाच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने महिनाभरात सोयातेलाच्या किमती 16 टक्क्यांनी वाढल्या. दरवाढीची ही पातळी मागील 14 वर्षातील सर्वोच्च असल्याचे व्यापारी सांगतात.
धन्यवाद सर.
आपल्याकडून वेळोवेळी शेतमाल भावा संदर्भात मार्गदर्शन केले जाते याचा आम्हाला निश्चितच फायदा होतो. खरे पाहता शासनाने प्रत्येक पिकाचा देशांतर्गत साठा, उत्पादन व मागणी तसेच जागतिक साठा, उत्पादन व मागणी अशी माहिती प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना हंगामपूर्व उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून कोणते पीक घ्यायचे शेतकरी ठरवू शकेल आणि देशाचे शेतमाल आयातीत खर्च होणारे परकीय चलन वाचेल रुपयाचे अवमूल्यनही होणार नाही.
आपले मार्गदर्शन कायम असू द्या.