‘नागपुरी’ संत्र्याची वाताहत
1 min read
संत्र्याची उत्पादकता
जगात संत्र्याच्या 10 ते 15 जाती आहेत. संत्र्याच्या इस्त्राईलमध्ये 12 तर स्पेनमध्ये 9 जाती आहे. परदेशात ज्यूस व पल्पसाठी वेगळ्या तर ‘टेबल फ्रूट’ म्हणून वेगळ्या जातीची संत्री वापरली जातात. नागपुरी संत्र्याचा बाबतीत तसे नाही. ज्यूस व पल्पसाठी तसेच ‘टेबल फ्रूट’ म्हणून एकाच जातीचा संत्रा वापरला जातो.
नागपुरी संत्र्याची प्रति हेक्टरी उत्पादकताही इस्त्राईल व इतर देशांच्या तुलनेत करीत आहे. ती वाढविण्यासाठीही आजवर ठोस प्रयत्न करण्यात आले नाही. स्पेनमध्ये संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर 70 ते 100 टन असून, त्याखालोखाल इस्राईलमधील संत्र्याची उत्पादकता आहे. विदर्भात ती सरासरी प्रति हेक्टरी 7 टन एवढी आहे. मध्य प्रदेशात ही उत्पादकता प्रति हेक्टरी सरासरी 16 टन तर पंजाबमधील किन्नो संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर 23 टन एवढी आहे.
संशोधनाचा अभाव
नागपुरी संत्र्याचे उत्पादन घेण्यासाठी वर्षानुुवर्षे एकाच जातीचा वापर केला जात आहे. जंभेरीच्या खुंटावर संत्र्याची कलम बांधून नागपुरी संत्र्याचे उत्पादन केले जात आहे. वेगवेगळ्या खुंटावर कलम चढविण्याचे प्रयोगही विदर्भातील शेतकऱ्यांनी केले आहेत. यावर जे काही संशोधन केले ते केवळ शेतकऱ्यांनीच! वास्तवात, नागपुरी संत्र्यावर शासकीय पातळीवर प्रभावी संशोधन करणे गरजेचे असताना आजवर ते करण्यात आले नाही. निकोप व निर्यातक्षम संत्र्याचे उत्पादन घेण्यासाठी तसेच त्याला चांगला बाजारभाव मिळविण्यासाठी संत्र्याच्या पानांची तपासणी (लीफ अनॅलेसिस) (पानांच्या तपासणीवरून झाडांमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, हे लक्षात येते), झाडांची छाटणी (प्रूनिंग) (झाड विकसित होण्यास मदत होते व झाडांचे आयुष्य वाढते) आणि झाडांवरील फळांची विरळणी (किनिंग) (छोट्या व मध्यम आकाराची फळे मोठी होण्यास मदत होते) करणे या मूलभूत संशोधन व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासोबतच शासनाने संत्र्याचे योग्य ‘मार्केटिंग’ करणे आवश्यक आहे. या बाबींवर प्रामाणिकपणे काम केल्यास निर्यातक्षम नागपुरी संत्र्याचे उत्पादन करणे व उत्पादकता वाढविणे सहज शक्य आहे. दुसरीकडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व शासनाच्या लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्रांमार्फत संत्र्यावर संशोधन सुरू असून, बियाविरहित (सीडलेस) संत्राच्या कलमा तयार करण्यात त्यांना यश आले आहे.
प्रक्रिया उद्योग
विदर्भात 1.50 लाख हेक्टरवर संत्र्याच्या बागा बहरल्या आहेत. नागपुरी संत्र्याचे वर्षभरात अंबिया व मृग अशा दोन बहाराचे उत्पादन घेता येते. जगातील अन्य जातीच्या संत्र्याचे वर्षभरात एकाच बहाराचे उत्पादन घेता येते. विदर्भात दरवर्षी सात ते आठ लाख टन अंबिया बहाराच्या तर 12 ते 14 लाख टन मृग बहाराच्या संत्र्याचे उत्पादन होते. यात 40 ते 42 टक्के संत्रा हा छोट्या व मध्यम आकाराचा असतो. सरसकट संत्रा बाजारात आणला जात असल्याने मोठ्या आकाराच्या संत्र्याचे भाव कोसळतात. हा संत्रा वर्गीकरण करून विकला तरी प्रक्रिया उद्योग नसल्याने छोट्या व मध्यम संत्र्याचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. प्रक्रियेची सोय असती तर संत्र्याचे बाजारभार स्थिर राहण्यास मदत झाली असती. त्यामुळे संशोधनासोबतच नागपुरी संत्रा प्रक्रियेतही उपेक्षितच आहे.
या संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर शहरातील मिहान परिसरात पतंजली आयुर्वेदच्या मदतीने आधुनिक ‘फूड पार्क’ व जैन फार्म फ्रेश फूड लिमि. व हिंदुस्थान कोला कोला बेव्हरेज लिमि.च्या भागीदारीने ठाणाठुणी, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती येथे ‘ऑरेंज उन्नती प्रकल्प’ या दोन महत्त्वाच्या संत्रा प्रक्रिया उद्योगांची अनुक्रमे 31 ऑगस्ट 2016 व 30 डिसेंबर 2016 रोजी मुहूर्तमेढ रोवल्या गेली. या दोन्ही प्रकल्पांमध्ये मध्यम व छोट्या आकाराच्या अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचा ‘ज्यूस’तयार करून त्या ज्यूसचा विविध उत्पादनांमध्ये वापर करणे तसेच त्याच्यापासून स्वतंत्र उत्पादने तयार करण्याची योजना होती. या चार वर्षात दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वयित होणे अपेक्षित असताना त्यांचे काम तसूभरही पुढे सरकले नाही.
पतंजलीला मिहानमधील 230 एकर जागा देण्यात आली असून, या प्रकल्पाची किंमत 1 हजार कोटी रुपये एवढी आहे. पतंजलीने या जागेवर शेड उभारले असले तरी त्या शेडचा वापर संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी न करता पतंजलीची विकसित उत्पादने ‘पॅकिंग’ करण्यासाठी केला जातो. जैन फार्म फ्रेश फूड व हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजला ठाणाठुणी येथे 100 एकर जागा देण्यात आली. या प्रकल्पाची किंमत 150 कोटी रुपये असून, येथे रोपवाटिकेशिवाय काहीही नाही. त्यांनी शेतकऱ्यांना प्रति कलम 250 रुपयांप्रमाणे संत्र्याच्या ‘व्हॅलेन्सिया’ जातीच्या कलमा विकल्या. त्या झाडांना फलधारणा व्हायला सुरुवात झाली असून, हा ‘व्हॅलेन्सिया’ जातीचा संत्रा आज कुणीही खरेदी करायला तयार नाही.
संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘एमएआयडीसी’ (महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ)ने विदर्भात दोन तर पणन महासंघाने एक असे एकूण तीन प्लांट सुरू केले होते. यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी ते दुसऱ्यांना चालवायला दिले आहेत. यातील एमएआयडीसीचा काटोल येथील ‘मल्टी-लाईन प्लांट’ बंद असून, तो ‘अलायन्स अॅग्रो’ने तर मोर्शी, जिल्हा अमरावती तसेच पणन महासंघाचा कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा येथील प्लांट ‘महाऑरेंज’ (महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक सहकारी संस्था)ने चालवायला घेतले आहेत. या तिन्ही प्रकल्पांची निर्मिती 30 वर्षांपूर्वी करण्यात आली असून, ते 20 वर्षे बंदच होते. एमएआयडीसी व ‘अलायन्स अॅग्रो’मधील वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्लांटमध्ये संत्रा व इतर फळांचा ज्यूस व त्यापासून इतर उत्पादने तयार केली जायची. 30 कोटी रुपये किमतीचा व 500 टन क्षमतेचे शीतगृह असलेला हा प्लांट 1995 साली उभारण्यात आला. तो आता अवसायनात निघाला आहे.
पतंजलीच्या आधुनिक ‘फूड पार्क’ व काटोल येथील संत्रा प्रक्रिया कारखान्यामुळे संत्र्यासोबतच टोमॅटो इतर फळांचा ज्यूस तयार करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य झाले असते. मोर्शी व कारंजा (घाडगे) येथील प्लांटमध्ये चार वर्षांपासून संत्र्याचे ‘ग्रेडिंग’ व ‘व्हॅक्स कोटिंग’ केले जाते. ‘ग्रेडिंग व व्हॅक्स कोटिंग’मुळे संत्र्याचे आयुष्य अर्थात टिकाऊपणा वाढण्यास मदत होते. या दोन्ही प्लांटची ‘ग्रेडिंग व व्हॅक्स कोटिंग’ क्षमता अनुक्रमे तीन व दीड टन प्रति तास आहे. हीच अवस्था नागपूर शहरातील ‘नोगा’ची आहे. नोगाची संत्रा प्रक्रिया क्षमता दोन टन प्रति दिवस आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्यात चार वर्षांमध्ये 12 खासगी प्लांट तयार झाले असून, त्यात संत्र्याचे ‘ग्रेडिंग व व्हॅक्स कोटिंग’ केले जाते. त्या सर्व प्लांटची सरासरी क्षमता 500 ते 2,000 टन प्रति दिवस आहे. नागपूर जिल्ह्यात एकमेव खासगी प्लांट असून, त्याची क्षमता फार कमी आहे.
नांदेड येथे ‘पेप्सीको’चा तर जळगाव येथे ‘जैन फूड’चा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सध्या यशस्वीपणे सुरू आहे. नांदेड येथील ‘पेप्सीको’चा प्रकल्प नांदगाव पेठ, जिल्हा अमरावती येथे उभारण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तो प्रकल्प नांदेडला नेला. वास्तविक पाहता, नांदेड जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन होत नाही. त्यामुळे त्या प्रकल्पाला लागणारा संत्रा हा नागपूर व अमरावती जिल्ह्यातून नेला जातो. त्यासाठी येणारा वाहतूक खर्च वेगळा आहे. या प्रकल्पात ‘डी बिटरिंग प्लांट’ युनिट असल्याने तिथे तिथे संत्र्याच्या ज्यूसवर प्रक्रिया करून त्यातील कडवटपणा नाहीसा केला जातो.
प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे दरवर्षी संत्र्याचे भाव कोसळतात. संत्र्याला प्रसंगी उत्पादनखर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडतात. प्रक्रिया उद्योगामुळे ही समस्या सहज सुटू शकते. (पूर्वार्ध)