संत्रा ‘वायनरी’उद्योगाला वाव
1 min readवाईन’मध्ये फळांचा १०० टक्के ज्यूस वापरला जातो. कडपटपणा हा संत्रा ज्यूसमधील दोष असला तरी, या ज्यूसला ‘डी बिटरिंग प्लांट’मध्ये प्रक्रिया केल्यास त्याचा कडवटपणा कमी अथवा नाहीसा करता येतो. ‘डी बिटरिंग’मुळे संत्र्याची मूळ चव कायम राहते. या ज्यूसमध्ये ‘इस्ट’मिसळल्यास नैसर्गिक प्रक्रिया होऊन ५ ते ७ टक्के अल्कोहोल अर्थात वाईन तयार होते. त्यात अल्कोहोल अथवा इतर पदार्थ मिसळवले जात नाहीत. ही वाईन म्हणजे संत्र्याचा ‘फरमेंडेट ज्यूस’होय. स्पेनसह इतर युरोपियन राष्ट्रांमध्ये प्रत्येक जण संत्र्याची वाईन जेवणापूर्वी पितात. वाईन जेवढी जुनी तेवढी त्याला अधिक किंमत मिळते. संत्र्याच्या ज्यूसपासून ‘लिक्युअर’ नामक पेय तयार केले जात असून, ते युरोपियन राष्ट्रांमध्ये जेवणानंतर प्यायले जाते.
‘वायनरी’वर कार्यशाळा
संत्रा वायनरी उद्योगाला चालना मिळावी म्हणून ‘वेद’ (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) व महाऑरेंजने नऊ वर्षांपूर्वी नागपूर शहरात कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत देशभरातील १० नामवंत वाईन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संत्र्यापासून तयार केलेली वाईन सादर केली होती. या उद्योगाला विदर्भात मोठी अनुकूलता असल्याने शेतकऱ्यांसह उद्योजकांनी यात उतरावे, असे त्या कार्यशाळेत सर्वांनीच सांगितले होते. त्यावर कुणीही अंमलबजावणी केली नाही.
संत्र्यापासून तयार होणारी उत्पादने
संत्र्यापासून ज्यूस, ज्यूस कॉन्सेंट्रेट, पल्प, मामार्लेड, स्कॉश, वाईन, लिक्युअर, पशुखाद्य, खत तयार होतात. संत्र्याच्या सालीचा वापर कॉस्मेटिक उत्पादने, शाम्पू, इसेन्शीएल ऑईल तयार करण्यासाठी तसेच औषधांमध्ये केला जातो. संत्र्याच्या सालीपासून तयार केलेल्या ऑईल व ज्यूसपासून तयार केलेल्या लिक्युअर परदेशात महागडे विकले जाते. संत्र्यापासून वाईन तयार करण्याच्या हार्वेस्टिंग, क्रशिंग, प्रेसिंग तसेच फरमेंडिंग व क्लेअरिफिकेशन आणि अगेइंग व बॉटलिंग या तीन टप्प्यात केली जाते.
संत्र्यातील न्यूट्रिशियन फॅक्ट
मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये कॅलोरीजचे प्रमाण 47 असून, फॅट 0.9 ग्राम, पोटॅशियम 181 ग्राम (5 टक्के), कार्बोहायड्रेट 12 ग्राम (4 टक्के), फायबर 2.4 ग्राम (9 टक्के), शुगर 9 ग्राम, प्रोटीन 0.9 ग्राम (1 टक्का), व्हिटॅमिन ए 14 मिलिग्राम (4 टक्के), कॅल्शियम 4 टक्के, व्हिटॅमिन सी 70 मिलिग्राम (88 टक्के), व्हिटॅमिन बी-6 5 टक्के व मॅग्नेशियमचे प्रमाण 2 टक्के असते. यारून नागपुरी संत्रा आरोग्यवर्धक असल्याचे स्पष्ट होत असून, त्यापासून तयार केलेली ‘वाईन’ मानवी आरोग्यास पोषक ठरू शकते.
निर्यातीला हवे शासकीय पाठबळ
नागपुरी संत्र्याला जगात मागणी असली तरी, पूर्वी तो बांगलादेश व नेपाळमध्ये तर २०१५ पासून या दोन्ही देशांसह श्रीलंका, दुबई, बहरीन व कतारमध्ये निर्यात केला जातो. चीन व युरोपियन राष्ट्रांमध्ये संत्र्यांची निर्यात करणे शक्य असतानाही त्या राष्ट्रांमध्ये संत्रा निर्यात होत नाही. निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविणे व मार्गदर्शन आवश्यक असून, उत्पादकता दर्जा वाढविण्यासाठी संत्र्यांच्या नवीन जाती विकसित करणे अत्यावश्यक आहे. ‘अरोमा’ (सुगंध), ‘इझी पिलिंग’ (सोलायला सोपा) व आंबट-गोड चव ही नागपुरी संत्र्याची जमेची बाजू असून, अधिक बिया व कमी उत्पादकता हे ‘ड्रॉ बॅक’ आहेत. नागपुरी संत्र्यातील गोडवा ९ ते १० ब्रिक असून, परदेशातील संत्र्यात गोडव्याचे प्रमाण १२ ते १८ ब्रिक आहे. त्यामुळे नागपुरी संत्र्यातील गोडवा वाढविणे गरजेचे आहे. परदेशात पल्प व ज्यूससाठी संत्र्याच्या वेगवेगळ्या जाती असून, ‘सीडलेस’ संत्रा ‘टेबल फ्रूट’ म्हणून वापरला जातो. जगात संत्र्याच्या १० ते १५ वेगवेगळ्या जाती असून, विदर्भात एकमेव जात वर्षानुवर्षे वापरली जात आहे. नागपुरी संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर सात टन असून, किन्नोची २५ टन आणि स्पेनमधील संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर ७० टन आहे. निर्यातक्षम संत्र्याच्या उत्पादनासाठी संत्र्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित करणे, त्यावरील प्रक्रिया उद्योग उभारणे व त्यासाठी शासनाने आवश्यक तंत्रज्ञान पुरविणे अत्यावश्यक आहे.
प्रोटोकॉल लिस्ट’
निर्यातीसाठी संत्र्याचा भारतासह इतर देशांच्या ‘प्रोटोकॉल लिस्ट’मध्ये समावेश असणे आवश्यक आहे. ही ‘प्रोटोकॉल लिस्ट’ संबंधित देशांचे वाणिज्यिक प्रतिनिधी तयार करतात. चीनमध्ये संत्र्याचे पाच ते सहा हजार कोटी रुपयांचे मार्केट आहे. परंतु, संत्रा दोन्ही देशांच्या ‘प्रोटोकॉल लिस्ट’मध्ये नसल्याने तो चीनमध्ये निर्यात करणे शक्य होत नाही. संत्र्याचा ‘प्रोटोकॉल लिस्ट’मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया जानेवारी २०२० पासून सुरू झाली. कोरोना संक्रमणामुळे ही प्रक्रिया मंदावली.
‘अॅपेडा’ व ‘ऑरेंज क्लस्टर’
निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करून त्याच्या नियार्तीची जबाबदारी अॅपेडा (अॅग्रिकल्चर अॅण्ड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी)वर सोपविली आहे. ‘अॅपेडा’ने निर्यातक्षम संत्र्याच्या उत्पादनासाठी ‘ऑरेंज क्लस्टर’ तयार करण्याच्या कामाला २०१९ पासून सुरुवात केली आहे. त्यांनी ‘सिट्रस नेट’लाही मंजुरी दिली आहे. नागपुरी संत्र्याला ‘जीआय इंडिकेशन’ (भौगोलिक सांकेतांक) मिळाला असल्याने संत्रा निर्यातीचे दार उघडले गेले आहे.
शासनाने संत्रा उत्पादकांना योग्यरीतीने मदत व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले असते, प्रक्रिया प्रकल्प सक्षमपणे चालविले असते, तर आज संत्रा उत्पादक सक्षम झाले असते. संत्र्यावरील संपूर्ण संशोधन स्थानिक शेतकऱ्यांनीच केले आहे. संत्र्याचा दर्जा व उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने मदत करायला हवी. कारण, या सर्व बाबी शासनाच्या अखत्यारीत येतात.