krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Ashok Kharat, Onion Growers : भाेंदू खरातने कांदा उत्पादकांना लुटले

1 min read

Ashok Kharat, Onion Growers : भाेंदू अशाेक खरात (Ashok Kharat) याने बाेगस फार्मर प्राेड्युसर्स कंपनी (Farmer Producers Company) स्थापन केली. त्याने या कंपनीच्या माध्यामातून कांदा उत्पादक (Onion Growers) शेतकऱ्यांना काेट्यवधी रुपयांनी लुटले आहे. त्याच्या इतर प्रकारासाेबत या प्रकाराची व आर्थिक व्यवहारांसह संपत्तीची चाैकशी करावी तसेच शेतकऱ्यांच्या लुटीत त्याच्यासाेबत सहभागी असणाऱ्या दाेषींवर कायदेशीर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर शाखेने केली आहे. या संदर्भात त्यांनी श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांना निवेदन दिले असून, नाशिक एसआयटीकडे (SIT – Special Investigation Team) तक्रार केली आहे.

सिन्नर, जिल्हा नाशिक येथील भाेंदू अशाेक खरात याने महिलांसाेबत दुष्कृत्य केले असून, त्याने श्री वेंकटेश्वर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी व ईशान्यश्वर फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी अशा दाेन कंपन्या स्थापन केल्या हाेत्या. त्याने या दाेन्ही कंपन्यांसाठी नाफेड (NAFED – National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.) आणि एनसीसीएफ (NCCF – National Cooperative Consumers’ Federation of India Limited.) या केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या संस्थांकडून कांदा खरेदीचे कंत्राट मिळविले हाेते. त्याला कांदा खरेदीचे कंत्राटे मिळवून देण्यासाठी काेणकाेणत्या राजकीय पक्षांच्या मंत्री व नेत्यांनी मदत केली, याची निष्पक्ष चाैकशी करून त्यांनी नावे जाहीर करावी तसेच त्यांच्यावरही कठाेर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

श्री वेंकटेश्वर फार्मर्स प्राेड्युसर कंपनी ही भाेंदू अशाेक खरातची कंपनी आहे. या कंपनीची उलाढाल 70 कोटी रुपयांची दाखविण्यात आली असून, नफा केवळ 8 हजार रुपये दाखविण्यात आला आहे. श्री वेंकटेश्वर व ईशान्यश्वर फार्मर्स कंपन्यांव्यतिरिक्त 8 ते 9 कंपन्या त्याच्या नावे रजिस्टर आहेत. इतरही 15 ते 16 फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांचा हा भोंदू अशाेक खरात संचालक आहे, त्याचेही पुरावे देखील तक्रारीसोबत जोडले आहेत.

भाेंदू अशोक खरातच्या अनेक फार्मर्स कंपन्या या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, देवळा तालुक्यातील आहेत. या फार्मर प्राेड्युसर कंपन्या कांदा खरेदीशी संबंधित असून, या कंपन्यांचे मागील तीन वर्षांचे ऑडिट सादर केलेले नाही. तसेच काहींकडे पुरेसे भांडवल नसल्याने त्यांना पणन मंडळाने कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी नाकारले होते. अशाेक खरात संचालक असलेल्या कंपन्यांनी यंदा नाफेडसाठी कांदा खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. श्री व्यंकटेश फार्मर्स प्रॉड्युसर्स कंपनी लिमिटेडने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा व गट क्रमांक देण्याऐवजी केवळ ७/१२ इतकीच नोंद केली असल्याचे आढळले आहे. या कंपनीने कांदा खरेदी कंत्राट घेतेवेळी त्यांचा सलग तीन वर्षांचा ऑडिट रिपोर्ट नाफेडकडे सादर केलेले नाही.

नाशिकच्या भोंदू अशाेक खरातने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो कोटींचा गंडा घातला आहे. या घोटाळ्याची निष्पक्ष चाैकशी करून यात सहभागी असलेल्या अशोक खरातसह त्याला मदत करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेते, नाफेड व एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या तक्रारीत केली आहे. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडीच्या सुनीताताई वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखेडे, मधू काकड मयूर भनगडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!