krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Unseasonal Rain harmful to Soil : मातीसाठी घातक हा पाऊस ‘अवकाळी’

1 min read

Unseasonal Rain harmful to Soil : शेतातील मातीचे (Soil) आराेग्य सुदृढ ठेवून ते जपण्यासाठी मातीला उन्हाळ्यात विश्रांती देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) या विश्रांतीत अडसर निर्माण हाेताे. पिकांची मुळे सडण्यासह मातीत पाण्याचा निचरा मंदावणे, पिकांवर राेग व किडींचा प्रादुर्भाव वाढणे, उत्पादन घटणे व इतर काही घातक परिणाम पुढील काही वर्षे त्या शेतात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकावर दिसून येतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचे झाले ती, माती तापणे ही एक नैसर्गिक निर्जंतुकीकरण प्रक्रिया आहे. अवकाळी पाऊस या प्रक्रियेत अडथळा निर्माण करताे व मातीचे आरोग्य बिघडवतो. त्यामुळे खरीप हंगामातील कृषी निविष्ठा व मशागतीचा खर्च वाढतो आणि उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. खरं तर, अवकाळी पाऊस, गारपीट हा बदलत्या हवामान व वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम आहे. या बदलांचा सर्वाधिक फटका शेतीक्षेत्र आणि अन्नसुरक्षेला बसत असला तरी आपल्या देशात ही बाब राज्यकर्ते तर साेडाच पण शेतकरीदेखील गांभीर्याने घेत नाही.

♻️ मातीच्या सुपीकता व संरचनेवरील परिणाम
उन्हाळ्यातील कडक ऊन हे केवळ उष्णता नसून, ती निसर्गाची जमिनीला स्वच्छ करण्याची व सुपीक बनवण्याची एक प्रक्रिया आहे. शास्त्रीय भाषेत याला सॉइल सोलरायझेशन (Soil Solarization) असे म्हणतात. जेव्हा अवकाळी पाऊस पडतो, तेव्हा ही प्रक्रिया खंडित होते. त्याचे मातीचे आराेग्य आणि खरीप पिकांवर होणारे वाईट परिणाम हाेतात.

♻️ तापमानाचा अभाव
उन्हाळ्यात माती किमान 45°C ते 50°C पर्यंत तापणे आवश्यक असते. पावसामुळे माती थंड राहत असल्याने जमिनीतील हानिकारक बुरशी, जीवाणू व सुत्रकृमी (Nematodes) नष्ट होत नाहीत.

♻️ सेंद्रिय कर्बाचे विघटन
माती तापल्यामुळे त्यातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यास मदत होते. अवकाळी पावसामुळे माती चोपण किंवा घट्ट होऊ शकते, ज्यामुळे मातीतील हवा खेळती (Aeration) राहण्याचे प्रमाण कमी होते.

♻️ क्षारांचे प्रमाण
सततच्या अवकाळी पावसामुळे जमिनीच्या खालच्या थरातील क्षार वरच्या थरावर येऊ शकतात, ज्यामुळे जमिनीची आम्लधर्मीयता (Acidity) किंवा विम्लधर्मीयता (Alkalinity) बदलू शकते.

♻️ कीड, रोग, तणांचा प्रादुर्भाव
अनेक किडींचे कोश (Pupae) जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असतात. कडक उन्हात हे कोश मरतात. पावसामुळे मातीत ओलावा राहिल्याने ते कोश जिवंत राहतात आणि खरीप हंगाम सुरू होताच कीड व राेग पिकावर मोठ्या प्रमाणात हल्ला करतात. जमिनीतील ‘फ्युसेरियम’ किंवा ‘पिथियम’ सारख्या बुरशी उन्हाअभावी नष्ट होत नाहीत. त्यामुळे खरीपातील कोवळी रोपे सडणे (Damping off) किंवा मूळकुज यासारखे रोग उद्भवतात. उन्हाळ्यात जमीन तापली की, तणांच्या बियांची उगवणशक्ती नष्ट होते. अवकाळी पावसामुळे तणांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे खरीपाचे मुख्य पीक घेण्यापूर्वीच शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढते. ते पिकाच्या अन्नद्रव्य फस्त करते. माती पुरेशी न तापल्यामुळे ‘नायट्रिफिकेशन’ (Nitrification) प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पिकांना सुरुवातीच्या काळात मिळणारा नत्र (Nitrogen) पुरेसे मिळत नाही. घट्ट झालेल्या मातीमुळे पिकांच्या मुळांना खोलवर जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने पिकाची जोमदार वाढ होत नाही.या कीड, राेग व तणांच्या व्यवस्थापनासाठी खर्च करावा लागत असल्याने एकीकडे पिकाचे उत्पादन घटत असून, उत्पादन खर्च मात्र वाढत जाताे.

♻️ मातीला विश्रांती का द्यावी?
शेतातील मातीचे आरोग्य, सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मातीचा उन्हाळ्यातील ‘विश्रांती काळ’ अत्यंत महत्त्वाचा आहे. मातीला मार्च ते मे या काळात किमान 60 ते 75 दिवसांची विश्रांती देणे अत्यावश्यक असते. मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला शेताची नांगरणी अथवा वखरणी करून माती उघडी करणे व ती प्रखर उन्हात 45 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवणे आवश्यक असते. हे ऊन मातीतील हानिकारक जीव नष्ट करण्यासाठी पुरेसे असते. त्यामुळे सॉइल सोलरायझेशन, वायू विनिमय व अन्नद्रव्यांचे संवर्धन हाेते. या काळात मातीत पाण्यामुळे निर्माण हाेणारा ओलावा राहू नये.

♻️ सॉइल सोलरायझेशन (Soil Solarization)
जेव्हा माती सतत 40 ते 50 दिवस प्रखर उन्हाच्या संपर्कात येते, तेव्हा जमिनीच्या वरच्या 8 ते 10 इंच थरातील हानिकारक बुरशी, जीवाणू व किडींचे कोश नैसर्गिकरित्या नष्ट होतात.

♻️ वायू विनिमय (Gas Exchange)
सततच्या पिकांमुळे मातीतील हवेचे प्रमाण कमी झालेले असते. विश्रांती काळात माती ‘श्वास’ घेत असल्याने कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide) बाहेर पडतो आणि ऑक्सिजन (Oxygen) आत शोषला जातो.

♻️ अन्नद्रव्यांची उपलब्धता व संवर्धन
माती पुरेशी न तापल्यामुळे नायट्रिफिकेशन (Nitrification) प्रक्रिया मंदावत असल्याने पिकांना सुरुवातीच्या काळात मिळणारा नायट्रोजन (नत्र) पुरेसा मिळत नाही. घट्ट झालेल्या मातीमुळे पिकांच्या मुळांना खोलवर जाण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पिकाची जोमदार वाढ होत नाही. जमीन याेग्य प्रमाणात तापल्याने मातीतील सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून ते पिकाला उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात (Nutrient Mineralization) आणतात. ही प्रक्रिया विश्रांतीच्या काळात वेगाने घडते.

♻️ विश्रांती कशी द्यावी?
केवळ शेत रिकामे सोडणे म्हणजे विश्रांती नव्हे. त्यासाठी आधी शेताची चांगली नांगरट (Ploughing) किंवा वखरणी करणे गरजेचे आहे. नांगरणीनंतर मातीचे ढेकळू फोडू नयेत. मोठी ढेकळे राहिल्याने हवा खोलवर जाते आणि जमीन अधिक चांगली तापते. शिवाय, उन्हाच्या तीव्रतेमुळे ओलावा नष्ट हाेताे आणि ती ढेकळे आपाेआप फुटतात. या काळात जमिनीला पाणी देणे टाळावे. कारण जमीन जेवढी जास्त तापेल व वाळेल, तेवढे निर्जंतुकीकरण प्रभावी होईल. मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मान्सूनचा पहिला पाऊस पडेपर्यंत जमीन तापू देणे हे सोन्यासारखे आहे. जेवढी जमीन जास्त तापेल, तेवढा तुमचा खरीप हंगामातील औषधांचा आणि खतांचा खर्च कमी होईल.

♻️ विश्रांती न दिल्यास काय होते?
जर उन्हाळी पिके घेऊन लगेच खरीपाची पेरणी केली तर, जमिनीत सततचा ओलावा राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. मातीची उत्पादक शक्ती कमी होते. मातीला स्वतःची नैसर्गिक झीज भरून काढायला वेळ मिळत नाही. माती नैसर्गिकरित्या अन्नद्रव्ये मुक्त करू शकत नसल्याने खतांचा खर्च वाढतो.

♻️ अवकाळी पावसाचा परिणाम
अवकाळी पावसामुळे माती ओली हाेत असल्याने तिला पुरेशी विश्रांती मिळत नाही. ओलाव्यामुळे मातीत फ्युसेरियम, पिथियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा या पिकांसाठी हानिकारक बुरशी (Fungal Pathogens) ठरणाऱ्या बुरशी तसेच राल्स्टोनिया सोलेनेसिएरम, झँथोमोनास, रूट नॉट निमॅटोड यासह इतर जीवाणू तयार त्यांचा झपाट्याने प्रसार हाेताे. मातीत पाण्याचा निचरा हाेण्याची प्रक्रिया मंदावते.

♻️ फ्युसेरियम (Fusarium)
या बुरशीमुळे प्रामुख्याने मर (Wilt) रोगाचा प्रादुर्भाव हाेताे. ही बुरशी झाडांच्या मुळांवाटे आत शिरते व झाडांच्या जलवाहिन्या (Xylem) ब्लॉक करते. त्यामुळे झाडांना पाणी मिळत नसल्याने ते उभे वाळून जाते. या बुरशी व राेगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक तूर, हरभरा, कापूस व केळी पिकावर दिसून येताे.

♻️ पिथियम (Pythium)
या बुरशीमुळे कोळशी किंवा रोप सडणे (Damping off) अशी लक्षणे दिसून येतात. ही बुरशी बियाणे उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच जमिनीलगतच्या भागावर हल्ला करते. त्यामुळे कोवळी रोपे जमिनीवर लोळतात. या बुरशीचा सर्वाधिक प्रादुर्भाव टोमॅटो, मिरची, कोबी यासह अन्य भाजीपाला पिकांवर अधिक दिसून येताे.

♻️ रायझोक्टोनिया (Rhizoctonia)
ही बुरशी पिकांवर हाेणाऱ्या मूळकुज किंवा खोडकुज या रोगासाठी कारणीभूत ठरते. मातीत जास्त ओलावा व मध्यम तापमानात ही बुरशी पिकांच्या मुळांना काळी करत असल्याने पिकांचे अन्नद्रव्यांचे शोषण थांबते.

♻️ फायटोप्थोरा (Phytophthora)
या बुरशीला जमिनीची बुरशी म्हणतात. या बुरशीमुळे फळझाडांवर डिंक्या किंवा सड रोगाचा प्रादुर्भाव हाेताे.

♻️ हानिकारक जिवाणू (Bacterial Pathogens)
जिवाणू हे बुरशीपेक्षा लहान असतात व ते जखमेवाटे किंवा नैसर्गिक छिद्रांवाटे झाडात प्रवेश करतात.

♻️ राल्स्टोनिया सोलेनेसिएरम (Ralstonia solanacearum)
हा जिवाणू पिकांवर ‘बॅक्टेरियल विल्ट’ (Bacterial wilt) म्हणजेच जिवाणूजन्य मर निर्माण करतो. या जिवाणूचा प्रदुर्भाव झालेल्या झाडाचे खोड कापून पाण्यात धरले, तर दोऱ्यासारखा पांढरा पदार्थ (Bacterial Ooze) बाहेर येतो. वांगी, बटाटा, टोमॅटो व इतर भाजीपाल्याच्या पिकांवर या जिवाणूचा प्रादुर्भाव हाेताे.

♻️ झँथोमोनास (Xanthomonas)
या जिवाणूमुळे कॅन्कर (Canker) राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. त्यामुळे झाडांच्या पानांवर ठिपके तयार हाेतात. लिंबूवर्गीय फळपिके, डाळिंब व कापूस यावर या जिवाणूचा अधिक प्रादुर्भाव हाेताे.

♻️ सुत्रकृमी (Nematodes)
सुत्रकृमी हा एक छुपा शत्रू आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सुत्रकृमी जिवाणू नसले तरी जमिनीतील अत्यंत हानिकारक सूक्ष्म जीव आहेत. रूट नॉट निमॅटोड (Meloidogyne species) हे जमिनीतील डोळ्यांना न दिसणारे कृमी मुळांमध्ये शिरतात आणि तिथे गाठी तयार करतात. मुळांवर गाठी आल्याने झाडाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात.

♻️ पाण्याचा निचरा न होण्याचे परिणाम
🔆 अवकाळी व सततच्या पावसामुळे मातीत पाण्याचा निचरा न होणे (Poor Drainage) ही समस्या हळूहळू गंभीर रूप धारण करीत आहे. जेव्हा जमिनीतील पाणी झिरपण्याचा वेग मंदावतो, तेव्हा मातीतील हवेची जागा पाणी घेते, ज्याला ‘वॉटरलॉगिंग’ (Waterlogging) असे म्हणतात.
🔆 ज्या जमिनींमध्ये चिकणमातीचे (Clay) प्रमाण जास्त असते, त्यातील अत्यंत सूक्ष्म कण एकमेकांना चिकटून असतात. अशा मातीत पाणी शोषून घेण्याची व झिरपण्याची क्षमता कमी असते.
🔆 सततच्या एकाच खोलीवरील नांगरणीमुळे किंवा जड यंत्रांच्या वापरामुळे जमिनीच्या पृष्ठभागाखाली 30 ते 40 सें.मी.वर मातीचा अत्यंत कडक थर (Hard Pan) तयार होतो. हा थर पाणी खालच्या थरात जाण्यापासून रोखतो.
🔆 मातीत सेंद्रिय खतांचा (शेणखत, कंपोस्ट) वापर कमी असल्यास मातीची सेंद्रिय रचना बिघडते आणि मातीची सध्रता (Porosity) कमी होते.
शेत सपाट असल्यास किंवा सखल भागात असल्यास पावसाचे पाणी वाहून न जाता तिथेच साचून राहते.
🔆 चुनखडीयुक्त किंवा क्षारपड जमिनींमध्ये मातीचे कण एकमेकांपासून विखुरले जात असल्याने मातीची पाणी निचरा करण्याची नैसर्गिक छिद्रे बंद होतात.
🔆 मातीच्या कणांमधील पोकळीत हवा असणे आवश्यक असते. हवेच्या अभावामुळे (Lack of Aeration) मातीवर होणारे परिणाम (Impact on Soil) हाेतात. मातीवर पाणी साचल्यामुळे ऑक्सिजन बाहेर फेकला जातो आणि जमीन अनाराेबिक (Anaerobic) स्थितीत जाते.
🔆 ऑक्सिजनच्या अभावामुळे जमिनीमध्ये मिथेन (Methane) व हायड्रोजन सल्फाइड (Hydrogen sulfide) सारखे विषारी वायू तयार हाेत असल्याने ते मातीच्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
🔆 जमिनीत नायट्रोजन (Nitrogen) स्थिरीकरण करणारे रायझोबियम (Rhizobium) सारखे उपयुक्त जिवाणू हवेअभावी मरतात किंवा अकार्यक्षम होतात.
🔆 पिकांच्या मुळांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. पाण्याचा निचरा न झाल्याने मुळे गुदमरतात व झाडाची वाढ खुंटते.
🔆 झाडांची मुळे कमकुवत झाल्यामुळे जमीन सुपीक असूनही झाड नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्ये शोषू शकत नाही. त्यामुळे त्यांची पाने पिवळी पडतात.
🔆 साचलेल्या पाण्यात फायटोप्थोरा व पिथियम सारख्या बुरशी अत्यंत वेगाने वाढत असल्याने पिकांची मुळे सडतात आणि मुळकुज राेगाचा प्रादुर्भाव हाेताे.
🔆 जास्त ओलाव्यामुळे जमिनीची पकड सैल होत असल्याने वाऱ्याचा थोडा जरी वेग वाढला तरी पिके जमिनीवर लोळतात.

♻️ यावरील उपाय
🔆 उन्हाळी नांगरट किंवा व्यवस्थित वखरणी केल्यानंतर जमीन कडक उन्हात तापल्यामुळे या सुप्तावस्थेतील शत्रू जिवाणू व बुरशीचे बिजाणू (Spores) नष्ट होतात.
🔆 शेणखतासोबत ट्रायकोडर्मा विरिडी (Trichoderma viridi) या मित्र बुरशीचा वापर केल्यास ती हानिकारक बुरशींना खाऊन टाकते. साेबतच मायकोरायझा, मेटारायझिम, बिव्हेरिया, पायसिलोमायसिस या मित्र बुरशी व रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, स्युडोमोनास, बॅसिलस या मित्र जिवाणूंचा वापर केल्याने मातीतील शत्रू जिवाणू व बुरशीचे व्यवस्थापन करणे साेपे जात असून, मातीचा पाेत सुधारण्यास मदत हाेते.
🔆 एकाच जमिनीत वारंवार एकच पीक न घेता पिकांची अदलाबदल केल्यास या जिवाणूंचे जीवनचक्र तुटते.
🔆 जमिनीचा सामू (pH) योग्य राखल्यास हानिकारक जिवाणूंची वाढ मर्यादित राहते.
🔆 पाण्याचा निचरा सुधारण्यासाठी नांगणी करणे गरजेचे असून, त्यामुळे जमिनीखालील कडक थर फुटतो आणि पाणी खोलवर जाते.
🔆 सेंद्रिय खते मातीचा पोत सुधारून पाणी धरून ठेवण्याची व निचरा करण्याची क्षमता वाढते.
🔆 शेताच्या कडेने किंवा उताराच्या दिशेने चर काढल्यास साचलेले पाणी बाहेर काढता येते.
क्षारपड जमिनीत जिप्सम टाकल्याने मातीचे कण सुटसुटीत होऊन निचरा सुधारतो.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!