Indian, Myanmar, African Tur : भारतीय तुरीपेक्षा म्यानमारची ‘लेमन’ महाग तर आफ्रिकन स्वस्त
1 min read
Indian, Myanmar, African Tur : जागतिक बाजारात म्यानमारच्या (Myanmar) ‘लेमन’ (Lemon) तुरीचे (Tur – Pigeon Pea) दर भारतीय (Indian) तुरीच्या तुलनेत अधिक असले तरी दर्जा आणि चवीमुळे भारतीय व्यापारी या तुरीच्या आयातीला प्रथम पसंती देत आहे. भारत आफ्रिकन (African) देशांमधून तूर आयात (Import) करीत असून, आफ्रिकन तुरीचे दर भारतीय तुरीच्या तुलनेत स्वस्त आहेत. म्यानमारच्या लेमन तुरीचे दर भारतात येईपर्यंत प्रतिक्विंटल 8,400 ते 8,600 रुपयांपर्यंत पाेहाेचतात. तुलनेत आफ्रिकन देशातील तुरीचा वाहतूक खर्च अधिक असल्याने त्या तुरीचे दर भारतात येईपर्यंत प्रतिक्विंटल 6,500 ते 6,900 रुपयांपर्यंत जातात. आयातीमुळे भारतीय बाजारात सध्या तुरीचे दर पुन्हा दबावात आले असून, हे दर सध्या एमएसपीपेक्षा कमी म्हणजेच प्रतिक्विंटल 7,500 ते 7,900 रुपये आहेत.
♻️ म्यानमारच्या लेमन तुरीचे दर
यावर्षी (सन 2025-26) म्यानमारमध्ये तीन लाख टन लेमन तुरीचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, यातील किमान दाेन लाख टन तूर भारतात आयात केली जाणार आहे. म्यानमारच्या बाजारात त्यांच्या लेमप तुरीचे दर सध्या 900 ते 915 डाॅलर म्हणजेच 84,176 ते 85,576 रुपये प्रतिटन अर्थात 8,417 ते 8,557 रुपये प्रतिक्विंटल आहे. मुंबई किंवा चेन्नईच्या बंदरापर्यंत ही तूर आणायची झाल्यास प्रतिटन 30 ते 35 डाॅलर वाहतूक खर्च येताे. त्यामुळे भारतात येईपर्यंत या तुरीचे दर 930 ते 950 डाॅलर म्हणजेच 86,978 ते 88,853 रुपये प्रतिटन अर्थात 8,698 ते 8,885 रुपये प्रतिक्विंटल हाेतात.
♻️ आफ्रिकन देशांमधील तुरीचे दर
आफ्रिकन देशांमध्ये सध्या तुरीचे दर 730 ते 780 डाॅलर म्हणजेच 66,400 ते 71,000 रुपये प्रतिटन म्हणजे 6,640 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल आहेत. ही तूर भारतात येईपर्यंत प्रतिटन 70 ते 80 डाॅलर म्हणजे 6,546 ते 7,483 रुपयांचा खर्च येत असल्याने भारतात आल्यावर या तुरीचे दर 810 ते 850 डाॅलर म्हणजेच 75,781 ते 79,513 रुपये प्रतिटन म्हणजेच 7,578 ते 7,951 रुपये प्रतिक्विंटल हाेतात. ऐन हंगामात तुरीची आयात केली जात असल्याने देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर प्रतिक्विंटल 7,100 ते 7,800 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
चलन विनिमय दर – 1 अमेरिकन डॉलर ($) = 93.53 भारतीय रुपये (₹)
♻️ तूर आयातीचा द्वि-राष्ट्र करार
तुरीच्या आयातीसाठी 2016 मध्ये भारताने मोझांबिकसाेबत पाच वर्षांचा पहिला सामंजस्य करार (MoU – Memorandum of Understanding) केला होता. त्या कराराचे मे 2021 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. या करारानुसार मोझांबिकमधून भारतात दरवर्षी 2 लाख टन तूर आयात केली जाते. भारताने म्यानमार, मलावी व टांझानियासाेबत मे 2021 मध्ये तूर आयातीने करार केले असून, म्यानमारमधून दरवर्षी किमान 1 लाख तर मलावीमधून 50 हजार टन तूर आयात केली जाते. हे सर्व करार 31 मार्च 2026 पर्यंत वैध असून, ही आयात शुल्कमुक्त करण्यात आली आहे.
♻️ तुरीची आयात हाेते कुठून?
📍 मोझांबिक
🔆 मोझांबिक (Mozambique) भारतासाठी तुरीचा सर्वात मोठा स्रोत आहे.
🔆 2023-24 मध्ये एकूण आयातीपैकी 1/3 भाग म्हणजेच 2.64 लाख टन तूर एकट्या मोझांबिकमधून आयात केली हाेती.
🔆 2024–25 मध्ये भारताने मोझांबिकमधून एकूण 3.49 लाख टन तूर आयात केली हाेती.
🔆 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या काळात मोझांबिकमधून 3 लाख टनतूर आयात करण्यात आली.
📍 म्यानमार
🔆 म्यानमारमधून (Myanmar) भारत दरवर्षी किमान 1 लाख टन तूर आयात करतो.
🔆 म्यानमारने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या 12 महिन्यांमध्ये एकूण 3.13 लाख टन तूर निर्यात केली. नोव्हेंबर 2025 मध्ये म्यानमारमधून भारताची कडधान्य आयात ही 7.98 काेटी डाॅलर्स किमतीची होती.
🔆 एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या 10 महिन्यांत कालावधीत भारताने म्यानमारमधून 3.32 लाख टन तूर आयात केली आहे. ही आयात मागील वर्षीच्या याच कालावधीतील (2.24 लाख टन) तुलनेत 44 टक्के अधिक जास्त आहे.
📍 मलावी
🔆 मलावीमधील (Malawi) तूर ‘नांदोलो’ (Nandolo) या नावाने ओळखले जाते.
🔆 भारताचा मलावीसोबत दरवर्षी 50 हजार टन तूर आयातीचा करार आहे.
🔆 भारताने 2024–25 मध्ये मलावीमधून 60,000 टन तूर आयात केली हाेती.
📍 टांझानिया
🔆 टांझानिया (Tanzania) व केनियामधील (Kenya) तूर ‘बाझी’ (Mbaazi) नावाने ओळखली जाते.
🔆 टांझानियामधून भारतात नियमितपणे तुरीची आयात केली जाते. मात्र, या आयातीचे प्रमाण मोझांबिकपेक्षा कमी आहे.
🔆 2024–25 मध्ये भारताने टांझानियामधून एकूण 3.18 लाख टन तूर आयात केली हाेती.
🔆 2025-26 मध्ये टांझानियामधून 1.5 लाख टन तुरीची आयात करण्यात आली. ऑगस्ट-सप्टेंबर या काळात टांझानियामधून भारतात तुरीची आवक अधिक असते.
📍 सुदान व इतर आफ्रिकन देश
🔆 सुदानमधील (Sudan) तूर ‘अदासेया’ किंवा ‘अदासी’ (Adaseya) या नावाने ओळखली जाते.
🔆 सुदान व इतर आफ्रिकन देशांमधून भारतात दरवर्षी सरासरी 30,000 ते 50,000 टन तूर आयात केेली जाते.
📌 2024–25 या आर्थिक वर्षात भारताने विविध देशांमधून 12.23 लाख टन तूर आयात केली हाेती.
📌 2025–26 या आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) एकूण कडधान्य आयातीत 23 टक्के घट झाली असली, तरी एप्रिल-जुलै 2025 या चार महिन्यांत तुरीची आयात मागील वर्षाच्या तुलनेत 16 हजार टनांनी वाढून ती 2.91 लाख टनांवर पोहोचली होती.
🔆 पश्चिम व मध्य आफ्रिकेत काँगो पी (Congo Pea) आणि अंगोला पी (Angola Pea) नावाने तूर ओळखली जाते.
🔆 नायजेरियामध्ये फिओफिओ (इग्बो), अदुवा (हाउसा) व ओतिली (योरुबा) या नावांनी तुरी ओळखल्या जातात.
🔆 बेनिनमध्ये तुरीला ‘क्लुएकून’ (Klouékoun) आणि केप वर्डेमध्ये ‘फिक्सन कोंगू’ (Fixon Kongu) म्हटले जाते.
♻️ म्यानमार व आफ्रिकन तुरीचे वैशिष्ट्य
🔆 आफ्रिकन देशांतील हवामान भारतासारखेच असल्याने तेथील तूर चव व शिजायला भारतीय तुरीसारखीच असते. आफ्रिकन देशांमधील तूर साधारणपणे ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये बाजारात येते.
🔆 म्यानमारमधील लेमन तूर जानेवारी ते मार्चमध्ये बाजारात येते. लेमल तुरीची चव भारतीय तुरीच्या चवीशी मिळतीजुळती आहे.
🔆 भारतीय व्यापारी तुरीची आयात करतात व भारतात त्या तुरीची डाळ करतात. म्यानमार व आफ्रिकन देशांमधील तुरीची डाळ भारतीय तुरीच्या डाळीत मिसळून ती बाजारात विकायला काढतात.
©️ मातीतलं अर्थकारण