krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer suicides : सावध! ऐका पुढल्या हाका…..

1 min read

Farmer suicides : कवी केशवसुतांच्या तुतारी या कवितेतील एका कडव्यातील ही ओळ आज आठवण्याचं कारण आहे दोन घटना. त्यातील पहिली काल-परवा घडलेली तर दुसरी काही महिन्यापूर्वी घडलेली. तसं तर या देशात सरकार नामक यंत्रणेने राबविलेली स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांना लुटणारी अधिकृत व्यवस्था देशातील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेऊनही ढेकर देत आहे. होय भावांनो एखादा राक्षस जसा अधाशीपणे खाऊन ढेकर देतो, तशीच ढेकर स्वातंत्र्यानंतर 5 लाखांच्या वर शेतकऱ्यांचा बळी (Farmer suicides) घेणारी सरकारी व्यवस्था (government system) आम्हीच शेतकऱ्यांचे खरे तारणहार म्हणून देत आहे हेच दुर्देव.

असो, मूळ विषय असा की सावध! ऐका पुढल्या हाका ही ओळ आज उध्रुत करायची काय गरज? तर मित्रांनो काल परवा नांदेड जिल्हातील कोंढा गावच्या निवृत्ती कदम यांनी ओला दुष्काळाने पीक नेस्तनाबूत झाल्याने कर्जाच्या चिंतेपायी आपली जीवनयात्रा संपविली तर हा धक्का सहन करू न शकल्याने त्यांच्या वडिलांचीही प्राणज्योत मालवली. घरचा कर्ता पुरुष आणि घरचा आधार असे दोन जीव गेल्याने त्या कुटुंबातील लोकांना काय वाटत असेल?

दुसरी घटना काही महिन्यापूर्वी घडलेली बुलढाणा जिल्हातील भरोसा या गावची याही गावातील शेतकऱ्यानी कर्जापायी आत्महत्या केल्याची बातमी काही दिवसापूर्वी आली होती. देशातील 5 लाख शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला हे खरं तर अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक या घटनेने सरकारी व्यवस्था हादरून जायला हवी होती सोबतच सुसंस्कृत समाजाने सुद्धा याची तीव्र दखल घ्यायला हवी होती, परंतु सरकारने थातुरमातूर उपाययोजना आणि सुसंस्कृत समाजाने हळहळ व्यक्त करण्यापलीकडे फारसे काही केले नाही, ही शोकांतिका आहे.

पण आज ज्या दोन घटनाबद्दल बोलतोय आणि ह्या आत्महत्या ज्या गावात घडल्या ते कोंढा आणि भरोसा ही गावे शेतकरी संघटनेच्या आंदोलनात अग्रेसर असलेली गावे, या गावातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या जुलमी कारभाराच्या विरोधात स्वतःच बंड उभारलं नाही तर आपल्या परिसरातील 5-50 गावातील शेतकऱ्यांना सरकारच्या बेबंदशाही विरोधात लढायला शिकवलं. नुसतं आंदोलनाचं पुढारपण करून या गावातील शेतकरी थांबले नाहीत तर कोंढा सारख्या गावातील शेतकऱ्यांनी सरकारच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांच्या झुंडशाहीला प्रतिकार करण्याची अभिनव कल्पना महाराष्ट्रातील कर्जवसुलीच्या धाकाने भेदरलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिली.

त्याकाळी कर्जमुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध पाहता कर्जवसुली अधिकारी दुपारी पुरुष मंडळी शेतात गेले असताना गावात येऊन शेतकऱ्यांच्या घरातील सामानाची जप्ती करत याचा प्रतिकार करण्यासाठी कोंढा गावच्या शेतकऱ्यांनी गावातील मंदिराच्या पारावर एवढा मोठा घंटा लावला की कर्जवसुली अधिकाऱ्यांची फौज गावात येताच गावातील कोणी तो घंटा वाजवला तरी त्याचा आवाज अख्ख्या पंचक्रोशीत घुमत होता आणि लुटारूंच्या फौजा गावात आल्या, हा संदेश पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मिळत होता, त्यामुळे अख्खं गाव जमा होऊन वसुली अधिकाऱ्यांना पिटाळून लावत.

भरोसा गावही त्याच पठडीतले. या गावाने शेतकऱ्यांना बळ दिलं नव्हे तर शेतकरी संघटनेचे विचार अमलात आणले, ते जोपासले. अशा गावातील शेतकरी जर आत्महत्या करायला लागले असतील तर ही शेतकरी जमातीसाठी सभ्य म्हणवल्या जाणाऱ्या समाजासाठी धोक्याची घंटा आहे. या घटना द्योतक आहेत की सततच्या लु्टीमुळे शेतकरी हा कोलमडून पडला आहे, हे सगळं सहन करण्याची सहनशीलता आता शेतकऱ्यांत राहिली नाही. ही लुटीची व्यवस्था जर अशीच चालू राहिली, वेळीच सुसंस्कृत समाजाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर कदाचित तो दिवस दूर नाही, जेव्हा शेतकरी गावच्या गावे सामूहिकपणे आपली जीवनयात्रा संपवतील आणि आपण हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकणार नाही.
म्हणून या घटनांचा अन्वयार्थ एवढाच की….. सावध! ऐका पुढल्या हाका…….

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!