Orange fruit dropping management : नागपुरी संत्रा, मोसंबी फळगळीचे व्यवस्थापन
1 min read
Orange fruit dropping management : नागपूर आणि अमरावती विभागातील काही भागात नागपुरी संत्रा (Orange) व मोसंबी फळबागांमध्ये सध्या खराब हवामानामुळे (Bad weather) फळगळ (Fruit dropping) दिसून आली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय लिंबूवर्गीय फळ पिके संशोधन संस्था, नागपूर (ICAR-CCRI – Indian Council of Agricultural Research – Central Citrus Research Institute) यांनी एक व्यापक एकत्रित फळगळ व्यवस्थापन (fruit dropping management) सल्ला जारी केला आहे.
🍊 पावसामध्ये तीन-चार दिवसांचा सलग खंड/उघाड पडल्यास जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्रॅम + कॅल्शिअम नायट्रेट 1.5 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून सप्टेंबर महिन्यात फवारणी करावी.
🍊 15 दिवसांनी 2, 4-डी किंवा एनएए 1.5 ग्रॅम + मोनोपोटॅशिअम फॉस्फेट (00:52:34) 1.5 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात फवारणी करावी.
🍊 वाढ होणाऱ्या आंबिया बहाराच्या संत्रा व मोसंबी फळझाडांसाठी प्रत्येक झाडाला 50 ग्रॅम फेरस सल्फेट (FeSO₄) आणि 50 ग्रॅम झिंक सल्फेट (ZnSO4) व 5 किलो शेणखत किंवा गांडूळ खत यासह शिफारशीत मुख्य अन्नद्रव्य खतांच्या उर्वरित मात्रा झाडांच्या आळ्यात द्याव्यात.
🍊 ज्या बागीच्यात ग्रीनींग जीवाणू (वायवार) संक्रमणाची लक्षणे (फळांवर निस्तेज हिरवा पिवळा रंग किंवा हिरव्याकंच फळांवर फळांच्या बटणाच्या ऊतींचे लालसर होणे) दिसून आली आहेत, अशा झाडांवर टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 600 पीपीएम (60 ग्रॅम/100 लिटर पाण्यात) आणि त्यानंतर 21 दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा के-सायक्लिन 150 पीपीएम (1.5 ग्रॅम/10 लिटर पाणी) या फवारण्या कराव्यात.
🍊 फळांवरची फायटोप्थोराची तपकिरी कूजसाठी फॉसेटिल ए. ल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात (ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दोनदा 40 दिवसांच्या अंतराने) पानांवर फवारणी करावी.
🍊 मूळकूज होत असलेल्या बगीच्यात मेफेनॉक्सॅम एमझेड 2.5 ग्रॅम/5-10 लिटर (झाडाच्या आकारमानावर अवलंबून) प्रति झाड किंवा फोसेटिल अॅल्युमिनियम 2.5 ग्रॅम/लिटर (40 दिवसांच्या अंतराने दोनदा) आळवणी व फवारणी करावी. अतिग्रस्त झाडांवरील सर्व फळे काढून टाकावीत आणि नंतर मेफेनॉक्सॅम एमझेड (2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) + कार्बेन्डाझिम (1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) द्रावणाने फवारणी करावी.
🍊 बागेत फळे तडकणे आढळून आल्यास 50 ग्रॅम बाेराॅन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🍊 कलेटोट्रीकम आणि बोट्रीयोडिप्लोडिया बुरशी प्रभावित झाडांवर 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात कार्बेन्डाझिम किंवा थायोफनेट मिथाइलची दोनदा फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी दुसरी फवारणी पुन्हा करावी. अझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनॉजोल बुरशीनाशक 0.5 मिली/लीटर फवारणी पर्याय म्हणून करता येते.
🍊 फळ माशीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 20-25 मिथाइल युजोनॉलचे कामगंध सापळे लावावे. प्रत्येक 15-20 दिवसांच्या अंतराने आमिश (मिथाइल युजोनॉल) बदलावे.
🍊 फळांच्या परिपक्वतेच्या अवस्थेत फळांचा रंग बदलाच्या वेळी फळ रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या व्यवस्थापनासाठी कडूलिंबाचे तेल 10 मि.लि./लिटर किंवा पेट्रोलियम फवारणी तेल (खनिज तेल) 20 मि.लि./लिटर याची 10-15 दिवसांच्या अंतराने फळांची तोडणी होईपर्यंत करावी.
🍊 बगीच्यात झाडाखाली पडलेली फळे एकत्र करून कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.
🍊 सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 35 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानासह आठवड्यापेक्षा जास्त काळ कोरडे हवामान राहिल्यास 40 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून केओलिनची फवारणी करावी.