Soybean price promise : साेयाबीनच्या सहा हजार रुपये भावाच्या वचनाचे काय झाले?
1 min read
Soybean price promise : मा. पंतप्रधान श्री नरेंद्र माेदीजी,
आपले नागपूर नगरी आणि विदर्भाच्या भूमीवर स्वागत आहे. आम्ही आपणास अनेक प्रश्न विचारू शकताे. पण, येथे फक्त एकच प्रश्न विचारताे आहाेत. या प्रश्नाचे उत्तर देऊन आपण आमचे समाधान कराल, अशी आम्ही आशा करताे.
तुम्ही महाराष्ट्र विधानसभा (Assembly) निवडणुकीच्या (Elections) वेळी आमचे सरकार साेयाबीनला (Soybean) 6,000 रुपये प्रतिक्विंटल भाव (Price) देणार असल्याचे वचन (Promise) साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिले हाेते. यावर्षी तुमच्या सरकारने साेयाबीनची एमएसपी (Minimum support price) 4,892 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे. पण, हा दर बाजारात मिळत नाही. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 3,800 ते 4,000 रुपये दराने साेयाबीन विकावे लागले आणि आजही याच दराने विकत आहे. अर्थात शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल किमान 1,000 रुपये कमी भाव मिळला व मिळत आहे.
महाराष्ट्रात 50 लाख हेक्टरमध्ये म्हणजेच जवळपास 1 काेटी 25 लाख एकरमध्ये साेयाबीनचे पीक घेतले जाते. राज्यात एकरी सरासरी 4 क्विंटल साेयाबीनचे उत्पादन हाेते, असे ग्राह्य धरल्यास राज्यात 5 काेटी क्विंटल साेयाबीनचे उत्पादन हाेते. साेयाबीनची एमएसपी 4,892 रुपये आहे. साेयाबीनला एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल 1,000 रुपये कमी भाव मिळला व मिळत आहे.
साेयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे 5 हजार काेटी रुपयांचे नुकसान झाले. तुमच्या वचनानुसार 6,000 रुपयांप्रमाणे हिशेब केल्यास शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 2,000 रुपये कमी मिळाले. म्हणजेच कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे 10 हजार काेटी रुपयांचे नुकसान झाले. साेयाबीनची उत्पादन खर्च तर कमी झाला नाही, मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे हाेईल?
केंद्र सरकारने कापसाची (Cotton) एमएसपी 7,520 रुपये, तूर (Tur) 7,550 रुपये आणि हरभऱ्याची (Gram) एमएसपी प्रतिक्विंटल 5,650 रुपये जाहीर केली आहे. महाराष्ट्रात आज साेयाबीन साेबतचे हे तिन्ही शेतमाल शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने विकावे लागत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
तुम्ही निवडणूक काळात दिलेले वचन पूर्ण कराल, या आशेने हा प्रश्न उपस्थित करीत आहाे.
रघुकूल रीत सदा चली आई!
प्राण जाई पर वचन न जाई!
खूप खूप धन्यवाद!
आपला विनम्र
विजय जावंधिया,
शेतकरी संघटना पाईक.