World builder : जग निर्मा’ती’…!
1 min read
World builder : तुमच्या, माझ्या व सर्वांच्याच निर्मितीचं श्रेय जातं ते महिलेला. आपण सारे मिळून हे जग जरी तयार झालं असलं तरी त्याच्या निर्मितीचं श्रेय महिलेचं आहे, मातृशक्तीचं आहे. महिला शिकून सवरून प्रत्येक क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करू लागल्या आहेत. सीमेवर गस्त घालणारे सैनिक असो की शत्रूला सळो की पळो करून सोडण्यासाठी उडवावे लागणारे विमान, महिला प्रत्येक कामाची जबाबदारी उचलू लागल्या आहेत. ‘चूल आणि मुल’ एवढंच काम करणाऱ्या आम्ही नाहीत तर, घरातला केर काढण्यापासून जगातील सर्वोच्च शिखर चढून जाण्याची कामगिरी करण्यात आम्ही कुठेही मागे नाहीत, हे महिलांनी सिद्ध केलंय.
महिलांच्या या कामगिरीसाठी शासनानेही सारी दारं खुली केली असून, महिलांकडे मोठमोठ्या पदांची जबाबदारी सहजपणे देण्याची मानसिकता समाजाने तयार केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 21 आदिवासी मुलींना एसटी ड्रायव्हर होण्याची संधी मिळाली आहे. तर चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी अंतराळ योजनेच्या कार्यान्वयनात दोन महिला संशोधक महत्त्वाच्या जबादाऱ्या सांभाळत होत्या. अंतराळात पुरुषांबरोबर संशोधनाचं अत्यंत जिकिरीचं आणि जोखमीचं कामही महिला अत्यंत कौशल्याने यशस्वी करीत आहेत.
पण जेव्हा ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी … हृदयी अमृत, नयनी पाणी’ असे भाव आम्ही गाणी आणि इतर माध्यमातून ऐकतो, वाचतो किंवा समाजात प्रत्यक्ष पाहतो तेव्हा जगनिर्मात्या महिलेची आम्ही काय गत करून ठेवली आहे? याचे भानही ठेवणे आवश्यक आहे. पुरुषांच्या पाशवी अत्याचाराच्या मुली आणि महिला मोठ्या संख्येत बळी पडत आहेत. अवस्क मुली, एकट्या, निराधार असाह्य स्त्रिया हेरून पुरुष त्यांना आपले आवाज समजून त्यांच्या इभ्रतीची शिकार करीत आहेत. इतक्यात अशा घटना मोठ्या संख्येत समोर येत असून, अशा सर्व घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांना कडक शिक्षा होणे आवश्यक झाले आहे.
आज मुलींची, महिलांची संख्या कमी आहे. मुक्या अनामिक कळ्या उमलण्याआधीच खुडल्या जात आहेत. शिक्षणापासून वंचित असणारा प्रमुख घटक या किशोरवयीन मुली आणि महिलाच असतात. काळी, जाडी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मुलीच अन पुरुषांच्या पाशवी अत्याचाराला बळी पडणाऱ्याही मुलीच. लग्नाला हुंडा लागतो म्हणून आत्महत्या करणाऱ्या महिलाच आणि लग्नानंतरही नवऱ्याची हुंड्याची हौस पुरी केली नाही म्हणून सासरच्या जाचानं जीव संपवणाऱ्याही महिलाच. एकीकडे, संसाराच्या दोन चाकापैकी एक चाक म्हणून आपण महिलेकडे पाहतो. अन् दुसरीकडे, तिला आपल्या अत्याचाराला बळी पाडतो. हा पुरुषप्रधान समाजाचा दुटप्पीपणा आतातरी थांबावयास हवा. महिलांना आजही समाजातील सर्वप्रवृत्ती आणि व्यवस्थांशी मोठ्या ताकदीने लढावं लागत आहे. त्या लढतातही! पण या लढणाऱ्या महिलांना समाजातून खूप कमी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळतं. शिवाय, अशा लढवय्या स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणेही आवश्यक आहे.
महिलांना अनेक अधिकार शासनाने दिले असले तरी समाज मात्र अजूनही या बाबत थोडा संकोची आहे. तेव्हा महिलांनी जागृत राहून आपले अधिकार मिळवायला हवेत. एसटी बसमध्ये महिलांसाठी काही आसने आरक्षित असूनही अनेक महिला गाडीत उभ्याने प्रवास करतात. त्याच वेळी महिलांच्या आरक्षित जागेवर पुरुष खुशाल बसलेले असतात. पुरुष वाहक तर सोडाच महिला वाहकही अशा वेळी पुढाकार घेवून उभ्या प्रवासी महिलांना जागा मिळवून देत नाही. एस.टी.तील हक्काची जागा आपण अजून मिळवू शकलो नाही. मग इतर अधिकारांबाबत न बोललेले बरे? शासनाने अनेक क्षेत्रात महिलांसाठी खास आरक्षण दिलं असून, महिला त्याचा मोठा उपयोग करीत असल्याचेही दिसते. आता महिलांनी आपलं ‘स्व’त्व अधिक गतीनं सिद्ध करून पुरुषी कुबड्या टाकायला हव्यात. मिळालेल्या आरक्षणाला ‘स्व’कर्तृत्वाची जोड देवून दिलेल्या संधीच सोनं कसं करता येईल, असा प्रयत्न करायला हवा.
महिला दिनानिमित्त स्री शक्तीचा जागर सुरू झालाय. तो स्री शक्ती एवढा मर्यादित न राहता निसर्गातील अखिल मातृशक्तीचा जागर व्हावा. महिलांच्या अनेक समस्यांना व्यक्त होता यावं, यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यावर समाजाने चिंतन करून उपाय योजावयास हवेत. महिला दिनाच्या निमित्ताने अशा संधी मिळव्यात आणि प्रयत्नांना वावही!
चित्रांच्या चौकटीत आणि भौतिक आकृत्यांमधील स्त्री शक्तीचा आदर करणारा आपला समाज, समाजात प्रत्यक्ष वावरणाऱ्या महिलांचा आदरकर्ता समाज व्हावयास हवा. प्रत्येकाच्या आयुष्यात आणि कुटुंबात असणाऱ्या महिलांचा असलेला आदर वाढायला हवा.
‘सगळीकडे जय माता दीचा जयघोष आहे,
मग वृध्दाश्रमात ही कोणाची आई आहे?’
प्रत्येकाच्या घरी असणारी आई, बहीण आणि बायको, मुलगी व मावशी, वहिनी, आत्या आणि आजी ही नाती अधिक घट्ट व्हावीत. प्रेम, सहकार्य आणि सहानुभुतीचं कोंदण या नात्यांना लाभावं.