Soybean Production cost & CACP : साेयाबीनचा उत्पादन खर्च व सीएसीपीच्या शिफारशीतील घाेळ
1 min readप्रति,
माननीय श्री शिवराजसिंह चव्हाण,
कृषी व शेतकरी कल्याण मंत्री,
भारत सरकार.
द्वारा
माननीय जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय,
परभणी.
विषय : –
✳️ कृषी मूल्य आयोगाच्या सर्व समावेशक योजनेनुसार सोयाबीन उत्पादक राज्यांकडून उत्पादन खर्चावर आधारित एमएसपी निश्चित करण्यासाठी आलेल्या शिफारशींमध्ये त्रुटी आहेत व त्यात सुधारणा करण्यात यावी.
✳️ खरीप हंगाम 2024 मध्ये उत्पादित सोयाबीन पिकास एमएसपी पेक्षा अधिक बाजार भाव मिळण्यासाठी,
🔅 खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्यात यावे.
🔅 शेतकऱ्यांकडून उत्पादित संपूर्ण सोयाबीनची एमएसपी दरानुसार खरेदी करण्यात यावी.
🔅 सोयाबीन निर्यात वाढावी याकरिता प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.
✳️ मागील त्रैवार्षिक वर्ष 2022-23 मध्ये 45.7 टक्के उत्पादनात वाटा असणाऱ्या राष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रतिक्विंटल सोयाबीन उत्पादन खर्च 4,500 ते 4,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, हे वास्तव लक्षात घेण्याबाबत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, ही चिंतेची बाब आहे, त्याअनुषंगाने तात्काळ उपाययोजना करणेबाबत.
🎯 माननीय केंद्रीय कृषिमंत्री महाेदय श्री शिवराजसिंहजी चव्हाण, सन 2014 ते 2024 या कालखंडात देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी वेगवेगळे नारे देत शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. जसे की, शेतकऱ्यांसाठी डाॅ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू. अर्थात C2+50 टक्के नफा या सूत्रानुसार शेतमालाला भाव देऊ. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. अच्छे दिन येतील आणि मोदीची गॅरंटी. यापैकी कोणताही नारा पूर्णत्वास गेला नाही, हे मी शेतकरी म्हणून गॅरंटीने सांगतो. मी हेमचंद्र रामराव शिंदे, गाव रावराजूर, तालुका पालम, जिल्हा परभणी, येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. आपल्याकडून कही प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.
शेतमालाची एमएसपी (Minimum Support Price) निश्चित करण्याची सीएसीपी (Commission for Agricultural Costs and Prices)च्या सर्वसमावेशक योजनेत अनेक उणिवा आहेत. चालू वर्षासाठी उत्पादनाचा अंदाजित खर्च गाठण्यासाठी, नंतर, CACP सर्वात अलीकडील तीन वर्षांसाठी उपलब्ध ‘वास्तविक अंदाज’ वापरते. अशाप्रकारे, 2024-25 च्या पीक हंगामासाठी लागवडीचा अंदाजित खर्च (CoC) (रु. प्रति हेक्टर) 2020-21, 2021-22 आणि 2022-23 च्या पीक हंगामांच्या ‘वास्तविक अंदाजांवर’ आधारित आहे.
मागील तीन वर्षाच्या तुलनेत सुरू वर्षात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च (Production cost) वाढलेला असतो. त्यामुळे सर्व समावेशक योजनेनुसार सुरू वर्षासाठी येणारा उत्पादन खर्च हा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादन खर्चापेक्षा कमी असतो. तो सुरू वर्षाच्या खर्चाशी सलग्न नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने ठरवण्यात आलेली एमएसपी शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असणार नाही. याचबरोबर सर्व समावेशक योजनेनुसार वेगवेगळ्या राज्यात उत्पादन खर्च काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजनेत अनेक त्रुटी आढळून येतात. जसे की, खरीप पिकांच्या विपणन हंगाम 2024-25 साठी किंमत धोरण ठरविताना एक हेक्टर सोयाबीन (Soybean) पिकाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी विविध बाबींवर दर्शविण्यात आलेला खर्च हा वादग्रस्त आहे.
🔶 मानवी श्रमावरील खर्च
मध्य प्रदेश राज्यात एक हेक्टर सोयाबीन उत्पादन खर्च काढताना मानवी श्रमावर होणारा खर्च हा सन 2020-21 साठी 8,151 रुपये प्रति हेक्टर, सन 2021-22 साठी 8,167 रुपये प्रतिहेक्टर तर सन 2022-23 साठी 8,472 रुपये प्रतिहेक्टर असा दर्शविण्यात आला आहे. मानवी श्रमावरील एवढ्या कमी खर्चात एक हेक्टर सोयाबीनची शेती करणे शक्य नाही. सीएसीपी द्वारा दर्शविण्यात आलेला हा खर्च संशयास्पद आहे.
सन 2021 व 2022 या कालावधीत महाराष्ट्रात एक हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन कापणे आणि ढीग रचणे यासाठीचा खर्च 11,000 ते 12,000 रुपये होता. सोयाबीन पेरणे, फवारणे, तण नियंत्रण, कायमस्वरुपी कामगार, कौटुंबिक श्रम यासाठी एक हेक्टर क्षेत्राचा खर्च आणि कापणे व ढीग रचणे यासाठीचा सर्व खर्च एकत्रित केल्यास हा खर्च हेक्टरी 30,000 रुपयांपेक्षा अधिक आहे. मध्य प्रदेश राज्याचा सन 2022 चा एकूण खर्च केवळ 8,472 रुपये असा दर्शविण्यात आला आहे. मध्य प्रदेश सह इतर राज्यांबाबत एकत्रित खर्च अत्यंत कमी दर्शवण्यात आला आहे.
🔶 बैलांच्या श्रमावरील खर्च
गुजरात राज्यात एक हेक्टर सोयाबीन उत्पादन खर्च काढताना बैलजोडीवर होणारा खर्च हा सन 2020-21 साठी 3,580 रुपये प्रतिहेक्टर, सन 2021-22 साठी 1,698 रुपये प्रतिहेक्टर तर सन 2022-23 साठी 1,628 रुपये प्रतिहेक्टर, मध्य प्रदेश राज्यात एक हेक्टर सोयाबीन उत्पादन खर्च काढताना बैलजोडीवर होणारा खर्च हा सन 2020-21 साठी 298 रुपये प्रति हेक्टर, 2021-22 साठी 345 रुपये प्रतिहेक्टर तर 2022-23 साठी 350 रुपये प्रतिहेक्टर, राजस्थान राज्यात एक हेक्टर सोयाबीन उत्पादन खर्च काढताना बैलजोडीवर होणारा खर्च हा सन 2020-21 साठी 154 रुपये प्रतिहेक्टर, 2021-22 साठी 179 रुपये प्रतिहेक्टर तर 2022-23 साठी 176 रुपये प्रति हेक्टर, तेलंगणा राज्यात एक हेक्टर सोयाबीन उत्पादन खर्च काढताना बैलजोडीवर होणारा खर्च हा सन 2020-21 साठी 1,324 रुपये प्रतिहेक्टर, 2021-22 साठी 1,393 रुपये प्रतिहेक्टर तर 2022-23 साठी 512 रुपये प्रतिहेक्टर, असा दाखवण्यात आला आहे. प्रश्न हा आहे की, एवढ्या कमी खर्चात एका बैलजोडीवर एक हेक्टर क्षेत्राची मशागत होईल का? महाराष्ट्रात बैलजोडीसाठी (सुका आणि हिरवा) चारा, पेंड इत्यादी पशू आहारासाठी प्रतिदिन खर्च सुमारे 275 ते 325 रुपये आहे. वैद्यकीय खर्च आणि बैलजोडी किंमत व घसारा प्रतिदिन सुमारे 50 रुपये आहे. महाराष्ट्रात बैलजोडीवर दररोजचा खर्च 375 रुपयांच्या वर आहे. जिथे इतर राज्यांनी संपूर्ण खरीप हंगामासाठी 375 रुपयांपेक्षा कमी दाखवला आहे, ते कसे शक्य आहे?
🔶 यंत्राद्वारे कामावर होणारा खर्च
मध्य प्रदेश राज्यात एकूण मानवी श्रमावर होणारा खर्च कमी दर्शवण्यात आला आहे आणि यंत्राद्वारे होणारा खर्चही कमी दाखवण्यात आला आहे. मध्य प्रदेश राज्यांमध्ये सन 2020-21, 2021-22 व 2022-23 मध्ये अनुक्रमे मानवी श्रमावर होणारा खर्च 8,151 रुपये, 8,167 रुपये व 8,472 रुपये प्रति हेक्टर तर यंत्राद्वारे होणाऱ्या खर्च 6,950 रुपये, 7,680 रुपये व 7,956 रुपये असा दर्शविण्यात आला आहे. मानवी श्रमावरील खर्च कमी झाल्यास यंत्राद्वारे होणाऱ्या शेतीवरील खर्च वाढणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेश राज्यांमध्ये मानवी श्रम व यंत्राद्वारा होणारी शेती या दोन्हीवरील खर्च इतर राज्यांच्या तुलनेत एवढा कमी असणे शक्य नाही.
🔶 बियाणे खर्च
जानेवारी 2021 ते जून 2022 या कालावधीत देशातील सोयाबीनच्या प्रमुख बाजारपेठ लातूर व इंदूर मधील सोयाबीन बाजार भाव सरासरी 8,000 रुपये असे होते. त्यानुसार सोयाबीन बियाण्याचा कमीत कमी दर 10,000 रुपये प्रतिक्विंटल होता. प्रतीहेक्टर 75 किलो बियाणे व प्रति किलो 100 रुपये भाव यानुसार प्रति हेक्टर कमीत कमी 7,500 रुपये बियाण्यावर खर्च होणार होते. खरीप हंगाम 2021-22 व 2022-23 मध्ये एक हेक्टर बियाण्याचा खर्च गुजरात राज्यामध्ये अनुक्रमे 5,544 रुपये व 5,955 रुपये, कर्नाटक राज्यामध्ये 3,694 रुपये व 4,174 रुपये, मध्य प्रदेश राज्यांमध्ये 5,670 रुपये व 5,918 रुपये, तेलंगणा राज्यांमध्ये 3,822 रुपये व 4,936 रुपये याप्रमाणे दाखवण्यात आला आहे. सन 2021 व 2022 कालावधीमध्ये सोयाबीनचे सरासरी बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटल असतील, त्या कालावधीमध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये प्रतिहेक्टर बियाण्याचे दर 3,600 ते 5,900 रुपये एवढे कमी कसे काय? याबाबत सीएसीपीने स्पष्टीकरण द्यावे.
ईगल सीड (इंदोर, मध्य प्रदेश) कंपनीच्या सोयाबीन बियाण्याचा महाराष्ट्रात प्रति 30 किलो बियाण्यास 3,360 रुपये असा दर होता. एक हेक्टरसाठी 75 किलो बियाणे याप्रमाणे एक हेक्टरसाठी बियाण्याचा खर्च 8,400 रुपये एवढा येतो. सन 2021 मध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव सरासरी 8,000 रुपये प्रतिक्विंटल तर सोयाबीन बियाण्याचा भाव 11,200 प्रतिक्विंटल नुसार मध्य प्रदेश मध्ये एक हेक्टर बियाण्याचा खर्च 5,670 रुपये (75.60 रुपये प्रति किलो), कर्नाटक मध्ये एक हेक्टर बियाण्याचा खर्च 3,694 रुपये (49.25 रुपये प्रति किलो), तेलंगणा राज्यांमध्ये एक हेक्टर बियाण्याचा खर्च 3,822 रुपये (50.96 रुपये प्रति किलो) कसा शक्य आहे? याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये बुस्टर कंपनीचे सोयाबीन बियाणे 3,500 रुपये प्रति बॅग अर्थात 8,750 रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे उपलब्ध होते. या बियाणे दराची तुलना इतर राज्यातील बियाणे दराशी होणे गरजेचे आहे.
🔶 रासायनिक खत खर्च
सीएसीपी द्वारे विविध राज्यात रासायनिक खतावर होणारा खर्च हा वास्तविक खर्चापेक्षा कमी दर्शविण्यात आला आहे. गुजरात राज्यामध्ये सन 2020-21, 2021-22, 2022-23 या कालावधीत रासायनिक खतावर होणारा खर्च अनुक्रमे 2,435 रुपये प्रतिहेक्टर, 1,600 रुपये प्रतिहेक्टर , 2,437 रुपये प्रतिहेक्टर, मध्य प्रदेश राज्यामध्ये सन 2020-21, 2021-22, 2022-23 या कालावधीत रासायनिक खतावर होणारा खर्च अनुक्रमे 1,956 रुपये प्रतिहेक्टर, 2,128 रुपये प्रतिहेक्टर , 2,325 रुपये प्रतिहेक्टर असा दर्शविण्यात आला आहे. राजस्थान राज्यांमध्ये एक हेक्टर सोयाबीनची शेती करण्यासाठी रासायनिक खतावर होणारा खर्च हास्यास्पद आहे. राजस्थान राज्यामध्ये सन 2020-21, 2021-22, 2022-23 या कालावधीत रासायनिक खतावर होणारा खर्च अनुक्रमे 423 रुपये प्रतिहेक्टर, 575 रुपये प्रतिहेक्टर, 849 रुपये प्रतिहेक्टर असा दर्शविण्यात आला आहे. एक हेक्टर सोयाबीन शेतीसाठी लागणारे रासायनिक खत 400 ते 800 रुपयांत कसे काय उपलब्ध होतील, हे सीएसीपीने सांगावे. तेलंगणा राज्यांमध्ये एक हेक्टर सोयाबीन शेतीसाठी रासायनिक खतावर होणारा खर्च सन 2021-22, मध्ये 2,625 रुपये तर 2022-23 मध्ये त्यापेक्षा कमी 2,137 रुपये दर्शविण्यात आला आहे. सन 2021-22 पेक्षा 2022-23 मध्ये तेलंगणा राज्यात रासायनिक खत स्वस्त झाले होते का? या प्रश्नाचे सीएसीपीने उत्तर देणे अपेक्षित आहे.
सोयाबीन पिकासाठी शेतकरी डीएपी खत वापरतो. महाराष्ट्रात सन 2021 मध्ये डीएपी खताची बॅग 1,200 रुपयांत उपलब्ध होती. त्यानुसार एक हेक्टरसाठी 3,000 रुपये खर्च येतो. सन 2021 मध्ये राजस्थानमध्ये एक हेक्टर सोयाबीनसाठी रासायनिक खतावर होणारा खर्च 575 रुपये दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्रात सन 2022 मध्ये 20:20:00:13 खताची बॅग 1,470 रुपयांत उपलब्ध होती. त्यानुसार एक हेक्टरसाठी 3,675 रुपये खर्च येतो. सन 2022 मध्ये राजस्थानमध्ये एक हेक्टर सोयाबीनसाठी रासायनिक खतावर होणारा खर्च 849 रुपये दाखवण्यात आला आहे. हा चमत्कार कसा शक्य आहे, याचे सीएसीपीने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने सोयाबीन पिकासाठी प्रतिहेक्टर 10 ते 15 किलो सल्फर वापरण्याची शिफारस केली आहे. जर सल्फर खत वापरण्याचा खर्च एकूण खत वापराच्या खर्चात समावेश केल्यास, खत वापरावीत खर्च सन 2024-25 च्या खरीप अहवालात नमूद केलेल्या खर्चापेक्षा पेक्षा जास्त असेल.
🔶 कीटकनाशक खर्च
कीटकनाशकावरील खर्च सन 2020-21, 2021-22, 2022-23 मध्ये अनुक्रमे गुजरात राज्यांमध्ये 1,257 रुपये, 901 रुपये, 1,993 रुपये प्रतिहेक्टर, कर्नाटक राज्यामध्ये 1,536 रुपये, 1,698 रुपये, 1,872 रुपये प्रतिहेक्टर, मध्य प्रदेश राज्यांमध्ये 2,338 रुपये, 2,519 रुपये 2,639 रुपये प्रतिहेक्टर, महाराष्ट्र राज्यात 2,692 रुपये, 3,026 रुपये, 3,552 रुपये प्रतिहेक्टर, राजस्थान राज्यांमध्ये 1,852 रुपये, 2,306 रुपये, 2,328 रुपये प्रतिहेक्टर, तेलंगणा राज्यांमध्ये 1,686 रुपये, 1,782 रुपये, 2,258 रुपये प्रतिहेक्टर असा दाखवण्यात आला आहे. वास्तविक शेतकऱ्यांचा प्रतिहेक्टर सोयाबीन कीटकनाशक फवारणीचा खर्च अधिक आहे.
सहसा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकरी ओडिसी हे तणनाशक, कोराजन आणि फेम हे कीटकनाशक तर शमीर हे बुरशीनाशक फवारणीसाठी वापरतात. एक हेक्टर फवारणीसाठी 100 ग्राम ओडिसी, 150 एमएल कोराजन, 1 लिटर शमीर, 250 एमएल फेम वापरतात. 100 ग्राम ओडिसीची किंमत 1,600 रुपये, 150 एमएल कोराजनची किंमत 1,740 रुपये, 1 लिटर शमीरची किंमत 900 रुपये, 250 ml फेमची किंमत 3,620 रुपये अशी सर्व मिळून एकत्रित 7,860 प्रतिहेक्टर फवारणीसाठी खर्च येतो. हा कमीत कमी खर्च आहे. यामध्ये कोणत्याही पीजीआर अथवा पीजीपी, मायक्रो न्यूट्रिएंट्सचा समावेश नाही. सन 2021 मध्ये महाराष्ट्रात कमीत कमी एक हेक्टर सोयाबीन फवारणीचा खर्च 7,860 रुपये येत असताना सीएसीपीने गुजरात राज्यात एक हेक्टर सोयाबीन फवारणीचा एकूण खर्च 901 रुपये दाखवला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणा या सर्व राज्याचा एक हेक्टर सोयाबीन फवारणीचा खर्च सीएसीपीने अतिशय कमी दाखवला आहे, याची नोंद घेणे गरजेचे आहे.
🔶 पीक विमा शेतकरी हप्ता
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सन 2020-21 व 2021-22 मध्ये एक हेक्टर सोयाबीनचा शेतकऱ्यांसाठी पीक विमा हप्ता हा 900 रुपये तर 2022-23 मध्ये 1,100 रुपये असा आहे. सीएसीपीने महाराष्ट्रातील पीक विमा शेतकरी हप्ता 2020-21, 2021-22, 2022-23 मध्ये अनुक्रमे 107 रुपये, 252 रुपये, 331 रुपये प्रतिहेक्टर कशाच्या आधारे दर्शविला आहे हा प्रश्न आहे.
सोयाबीन उत्पादन घेणारी सहा राज्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा यांचा सीएसीपी द्वारा प्रस्तावित प्रतिक्विंटल सोयाबीन उत्पादन खर्चाची, शेतकऱ्यांच्या प्रतिक्विंटल उत्पादन खर्चाशी तुलना केल्यास अनेक बाबतीत विवादास्पद ठरेल. महाराष्ट्र वगळता गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा इत्यादी राज्यांचा A2+FL नुसार उत्पादन खर्च 30,000 ते 45,000 रुपये प्रति हेक्टर आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा A2+FL नुसार प्रत्यक्ष प्रति हेक्टर उत्पादन खर्च 80,000 रुपये आहे. सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या सर्व राज्यातील शेतकरी शेतकऱ्यांसमोर सीएसीपीने प्रस्तावित केलेला उत्पादन खर्च मांडल्यास कोणत्याही राज्याचा शेतकरी हा खर्च मान्य करणे शक्य नाही. सीएसीपीने मानवी श्रम, बैलांचे श्रम, बियाणे, खत व औषध इत्यादी सर्व बाबीवर होणारा खर्च अन्यायकारकरित्या कमी दाखवला आहे. कमी दाखवलेल्या खर्चाला शेतकरी अभ्यासपूर्णरित्या निश्चितच आव्हान देईल.
🎯 माननीय कृषिमंत्री आपण संवेदनशील व्यक्ती आहात. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण समजून घ्याल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावा यासाठी वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून आपण लवकरच शेतकऱ्यांसाठी हिताचा निर्णय घ्याल, अशी अपेक्षा. परभणी जिल्ह्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी देशाच्या विविध राज्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना आपण लवकरच दिलासा द्याल, अशी अपेक्षा!
🔅 आपला नम्र शेतकरी
हेमचंद्र शिंदे
(रावराजूर), जिल्हा परभणी.