krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Crop Insurance : पीक विम्याची रक्कम द्या, अन्यथा पुढाऱ्यांना जाब विचारा!

1 min read

Crop Insurance : महाराष्ट्रातील लाखाे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे (Crop Insurance) केंद्र व राज्य सरकारकडे काेट्यवधी रुपये थकीत आहेत. सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांना वेळीच परत न दिल्यास गावात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना याबाबत जाब विचारण्याचे आंदोलन करण्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पुणे येथील कृषी आयुक्त (Commissioner of Agriculture) कार्यालयावर नेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात (Farmers morcha) दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना सन 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. शेतकरी दीड वर्षांपासून मंजूर झालेल्या पीक विम्याच्या रकमेची वाट पाहत आहेत. ही रक्कम मिळावी म्हणून आंदोलने करत आहेत. मात्र, विमा कंपन्या व सरकारी अधिकारी फक्त खोटी आश्वासने व तारखा देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या दिरंगाईला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. शासनाकडून विमा कंपन्यांना पैसे प्राप्त न झाल्यामुळे पीक विमा रक्कम थकीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने साेमवारी (दि. 9 सप्टेंबर) पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. अलंकार टॉकीज, साधू वासवानी चौक मार्गे सेंट्रल बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी मोर्चाने गेले. त्यानंतर पाेलिसांनी मोर्चा अडविला आणि तिथेच मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

दीड वर्षापासून शेतकरी पीक विम्याच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सरकार विम्याचे पैसे देण्यास तयार नाही. सत्ताधारी पक्ष हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाही व विरोधी पक्ष या विषयावर शब्दही बाेलायला तयार नाही. सरकारने पीक विम्याची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक तो निधी तातडीने विमा कंपन्यांकडे वर्ग करावा आणि विमा कंपन्यांनी हा निधी तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. तसे न केल्यास गावात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिल घनवट यांनी दिला.

हे आंदोलन पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे नाही. मात्र, गावात सभा घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणाच्या वेळी शेतकरी पीक विम्याबाबत जाब विचारतील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना कृषी आयुक्त रवींद्र बिनवाडे यांच्याद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे. रवींद्र बिनवाडे यांच्या अनुपस्थितीत कृषी उपायुक्त वैभव तांबे यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.

या आंदाेलनात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, राजाभाऊ पुसदेकर, रुपेश शंके, शशिकांत भदाने, देवीप्रसाद ढोबळे, नीलेश शेडगे, विश्वंभर भानुसे, विष्णू शिंदे, विक्रम शेळके, नवनाथ जाधवर आदी नेते व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. संचालन सुहास काटे यांनी केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात पाेलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला हाेता. यापूर्वी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्यावतीने पुणे शहरातील कृषी आयुक्त कार्यालयाला ठाळे ठाेकण्याचे आंदाेलन केले हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!