krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Edible oil imports & Soybean Price : खाद्यतेलाची वाढती आयात; साेयाबीनचे दर दबावात

1 min read

Edible oil imports & Soybean Price : या वर्षी महाराष्ट्रासह देशात साेयाबीनचे (Soybean) पेरणीक्षेत्र (Sowing area) वाढले आहे. साेयाबीनची सरासरी उत्पादकता (Productivity) विचारात घेता उत्पादन वाढण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात काेसळलेल्या अतिजाेरदार तर राज्यातील इतर भागात काेसळत असलेल्या सततच्या पावसामुळे ही शक्यता उत्पादन वाढीची शक्यता धुसर झाली आहे. शेतकऱ्यांकडील साेयाबीन बाजारात यायला दाेन महिने शिल्लक असताना साेयाबीनचे दर ‘एमएसपी’पेक्षा 700 ते 1,000 रुपयांनी खाली आले आहेत. खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे यावर्षी साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता मावळली आहे.

♻️ साेयाबीनचे पेरणीक्षेत्र
मागील वर्षीच्या (सन 2023-24) तुलनेत या वर्षी (सन 2024-25) देशात साेयाबीनचे पेरणीक्षेत्र 1.26 लाख हेक्टरने तर महाराष्ट्रात 59,336 हेक्टरने वाढले आहे. देशात मागील वर्षी 123.85 लाख हेक्टरमध्ये तर यावर्षी 125.11 लाख हेक्टरमध्ये तसेच महाराष्ट्रात मागील वर्षी 50,68,154 हेक्टर तर यावर्षी 51,27,490 हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली.

♻️ साेयाबीनचे उत्पादन
🔆 सन 2019-20 :- 132.70 लाख टन
🔆 सन 2020-21 :- 112.20 लाख टन
🔆 सन 2021-22 :- 126.10 लाख टन
🔆 सन 2022-23 :- 129.90 लाख टन
🔆 सन 2023-24 :- 139.80 लाख टन

♻️ साेयाबीन उत्पादनातील वाटा
सन 2023-24 मध्ये महाराष्ट्र साेयाबीन उत्पादनात देशात क्रमांक-1 चे राज्य बनले असून, मध्य प्रदेश दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण साेयाबीन उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा 45.35 टक्के तर, मध्य प्रदेशचा 45 टक्के आहे. महाराष्ट्रातील साेयाबीन उत्पादनाची भिस्त ही मराठवाड्यावर आहे. जागतिक साेयाबीन उत्पादनात भारताचा वाटा केवळ 3 टक्के आहे. शिवाय, भारतातील साेयाबीनची सरासरी उत्पादकता जगात सर्वात कमी म्हणजे प्रतिहेक्टरी 10 क्विंटल अर्थात प्रतिएकर 4 क्विंटल एवढी आहे.

♻️ दर कायम दबावात
सन 2023-24 च्या संपूर्ण विपणन हंगामात साेयाबीनचे दर ‘एमएसपी’च्या (Minimum Support Price) म्हणजेच प्रतिक्विंटल 4,600 रुपयांच्या खाली राहिले. दरवाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी याच हंगामातील साेयाबीन आजवर विकले नाही. केंद्र सरकारने सन 2024-25 या वर्षासाठी साेयाबीनची एमएसपी प्रतिक्विंटल 4,892 रुपये ताहीर केली असली तरी साेयाबीनचे सध्याचे दर प्रतिक्विंटल 3,800 ते 4,300 रुपयांच्या दरम्यान आहेत. दुसरीकडे उत्पादकता कमी असल्याने साेयाबीनचा उत्पादन खर्च प्रतिएकर 45 हजार रुपयांवर पाेहाेचला आहे. हा खर्च कमी करणे व उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच उपाययाेजना करायला तयार नाही. उलट, दरवेळी खाद्यतेलाची (Edible oil) भरमसाट आयात (Import) करून साेयाबीनसह इतर तेलबियांचे (Oilseeds) भाव पाडत जात आहेत.

♻️ साेयाबीन तेलाचा वापर
🔆 सन 2019-20 :- 47.50 लाख टन
🔆 सन 2020-21 :- 51.30 लाख टन
🔆 सन 2021-22 :- 49.50 लाख टन
🔆 सन 2022-23 :- 58.30 लाख टन
🔆 सन 2023-24 :- 54.00 लाख टन

♻️ आयात शुल्कात कपात
केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवर सेससह 5.5 टक्के आणि शुद्ध खाद्यतेलांवर 13.75 टक्के आयात शुल्क (Import duty) लावले आहे. केंद्र सरकारने 14 जून 2023 राेजी रिफाइंड सोयाबीन तेल आणि परिष्कृत सूर्यफूल तेलावरील मूलभूत आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केला हाेता. हा निर्णय 31 मार्च 2024 पर्यंत लागू हाेता. त्यानंतर 14 जून 2024 राेजी पुन्हा हाच निर्णय घेत रिफाइंड सोयाबीन व शुद्ध सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क 17.50 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले. ऑक्टोबर 2021 मध्ये परिष्कृत सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 32.5 टक्क्यांवरून 17.5 टक्के करण्यात आले होते. त्यापूर्वी 42 ते 47 टक्के आणि सन 2004 ते 2013 पर्यंत 70 ते 90 टक्के हाेते.

♻️ खाद्यतेल आयातीमुळे काेसळले दर
नाेव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या नऊ महिन्यांत 15 लाख 18 हजार 671 टन शुद्ध व 1 काेटी 4 लाख 16 हजार 556 टन कच्च्या खाद्यतेलाची तसेच 68 लाख 45 हजार 97 टन पामतेलाची आयात करण्यात आली. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA – Solvent Extractor’s Association of India) च्या आकडेवारीनुसार, अखाद्य तेलांची आयात 1,32,242 टनांवरून 1,88,955 टनांपर्यंत वाढली आहे. चालू तेल वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत वनस्पती तेलांची (खाद्य आणि अखाद्य तेले) एकूण आयात 121.24 लाख टन होती, जी मागील वर्षी 122.55 लाख टन एवढी हाेती. सन 2023-24 तेल वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (नोव्हेंबर 2023-जुलै 2024) भारताने 15,18,671 टन शुद्ध खाद्यतेल आयात केले. मागील वर्षी याच काळात ही आयात केलेल्या 16,40,960 टन हाेती. यावर्ष कच्च्या खाद्यतेलाची आयात 1,04,81,751 टनांवरून 1 टक्क्याने घसरून 1,04,16,556 टनांवर आली. 2023-24 तेल वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत पाम तेलाची एकूण आयात 4 टक्क्यांनी घटून 68,45,097 टन झाली. जी मागील वर्षी 71,17,834 टन होती. याउलट मऊ तेलाची आयात 50,04,877 टनांवरून वाढून 50,90,131 टन झाली. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला RBD पामोलिन आणि क्रूड पाम तेल निर्यात करतात तर कच्चे सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. कच्चे सूर्यफूल तेल रशिया, युक्रेन, रोमानिया व अर्जेंटिना येथून आयात केले जाते. अर्जेंटिना हा सोयाबीन तेलाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आणि भारत हा सर्वात मोठा आयातदार देश आहे. या वाढत्या आयातीमुळे मागील वर्षासह आगामी हंगामातील साेयाबीन व इतर तेलबियांचे दर काेसळले आहेत. यावर्षी साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. तेलबियांच्या दरवाढीसाठी खाद्यतेलाची आयात कमी करणे, त्यावरील आयात शुल्क वाढविणे, खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!