krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain Possibility : आणखी काही दिवस पावसाचा जाेर कायम

1 min read

Rain Possibility : हिंद महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात असलेली एम.जे.ओ. (Madden-Julian Oscillation)ची उपस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रविवार (दि. 25 ऑगस्ट)पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची (Rain) शक्यता (Possibility) कायम आहे. विशेषतः शनिवार (दि.24 ऑगस्ट)ला नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, रायगड, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 16 जिल्ह्यात तर रविवारी (दि. 25 ऑगस्ट) संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

☢️ उन्हाचा ताप
अक्षवृत्तास समांतर दक्षिणोत्तर उतराईकडे जाणारा हवेच्या दाबाच्या ढाळा (Pressure gradient)ची गैरहजेरीतून व आर्द्रतायुक्त पश्चिमी वाऱ्यांचा अभावातून आणि वाढणाऱ्या 1006 हेक्टपास्कलपर्यंतचा एकजिनसी हवेचा दाबातून सोमवार (दि. 26 ऑगस्ट) ते शुक्रवार (दि. 30 ऑगस्ट) दरम्यानच्या पाच दिवसांत कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाची ताप उसळण्याची शक्यता जाणवते. तरीही दुपारनंतर पावसाची शक्यता ही आहेच.

☢️ पुन्हा पाऊस
शनिवार (दि. 31 ऑगस्ट) ते गुरुवार (दि. 5 सप्टेंबर)च्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रात पुन्हा मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबईत अशा 16 जिल्ह्यात कदाचित एखाद्या दुसऱ्या दिवशी तर जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

☢️ सप्टेंबरमधील पावसांची आवर्तने
सप्टेंबर महिना हा अधिक प्रकाशमान दिवसाचा व उष्णतेचा महिना असतो. मुंबईसह कोकणात 15, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात 10 ते 12, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात 5 ते 7 अशा सरासरी पावसाळी दिवसाचा हा महिना असतो. यावर्षी 1 ते 5 व 12 ते 16 आणि 25 ते 29 सप्टेंबर अशा प्रत्येकी पाच दिवसांच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात अंदाजे 10 ते 12 पावसाळी दिवसांतून पावसाची तसेच
धरणे ओसंडून नद्या खळखळण्याची व विहिरी व जमीन पाणीपातळीत वाढीची अपेक्षा करू या!

☢️ सध्याचा पाऊस कशामुळे?
मान्सूनचा मुख्य आसाचे पश्चिमी टोक सरासरी जागेच्या दक्षिणेला तर पुरवी टोक सरासरी जागेवर व मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन (एम.जे.ओ)ची चांगलीच साथ मिळत आहे. शिवाय सध्याच्या उष्णतेच्या तापीची साथ होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्मितीची शक्यता, या सर्वांच्या एकत्रित परिणामातून आजपासून (दि. 23 ऑगस्ट) रविवार (दि. 25 ऑगस्ट)पर्यंत महाराष्ट्रात दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाच्या
भाकिताला अधिकची पूरकता वाढून मिळत आहे.

☢️ भयंकर उकाडा कशामुळे?
गेल्या आठवड्यात भयंकर उकाडा जाणवत हाेताे, याचे शास्त्रीय कारण जाणून घेणे गरजेचे आहे. पावसाळी हंगामात अरबी समुद्रावरून वाहणारे वारे पश्चिमी वाऱ्यांची दिशा बदलून वाऱ्यांचा वहन पॅटर्न 3 किमी उंचीपर्यंत पूर्णपणे 90 अंशांत बदलून महाराष्ट्रावर वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत हाेते. शिवाय हंगामाप्रमाणे भाग बदलत प्रत्येक काही अंतरावर अपेक्षित असलेला हवेच्या दाबातील फरक सध्या नामशेष होऊन केवळ एकसमान जाणवत असलेला 1006 मिलिबार (हेक्टपासकल) इतका हवेचा दाब जाणवत हाेता. वाऱ्याचा वेग मंदावला हाेता. हवेला वहन नव्हते. हवेचे पार्सल एकजिनसी बंधित होऊन उष्णतेचे संचयन त्यात घडून येत हाेते. याचाच अर्थ महाराष्ट्रावर प्रेशर ग्रेडीएन्ट-हवेच्या दाबाची चढ-उताराची क्रमिकता किंवा हवेच्या दाबाचा ढाळ किंवा चढ पूर्णपणे नामशेष झाली हाेती. ढगाळ वातावरणामुळे रात्रीची जमिनीतून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला अटकाव होत हाेता. या परिणामातून गेल्या आठवड्यात भयंकर उष्णतेतून महाराष्ट्रात उकाडा जाणवत हाेता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!