MJO and Monsoon : एमजेओची लाट अन् मान्सूनची साथ!
1 min readएमजेओची ही वारी सध्या बंगालच्या उपसागरात प्रवेशली आहे. मान्सूनच्या बंगालच्या उपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले आहे. त्यामुळे मराठवाड्यात येत्या दोन दिवसानंतर (6 जुलैपासून) तर विदर्भात गुरुवार (दि. 4 जुलै)पासून पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व आसामकडील सात राज्यात 10 जुलैपर्यंत अतिजोरदार ते अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे.
🌐 महाराष्ट्रात कोणत्या प्रणाल्यामुळे पावसाची शक्यता?
मान्सूनने देश काबिज केल्यामुळे देश मध्यावरचा पूर्वो-पश्चिमी मुख्य मान्सुनी आस सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस स्थापित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा वगळता शुक्रवार (दि. 5 जुलै)पासून पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत एमजेओ व मान्सुनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
🌐 महाराष्ट्रात विभागवार पावसाची तीव्रता
🔆 मध्य महाराष्ट्र
गेल्या 10 दिवसांपासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्हा तसेच पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे. रविवार (दि. 7 जुलै)पासून या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणाल्यातून तेथे मध्यम पावसाची शक्यता टिकून आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव व चांदवड तालुक्यात शुक्रवार (दि. 5 जुलै)पासून पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.
🔆 मराठवाडा
मराठवाड्यात शुक्रवार (दि. 5 जुलै)पासून 10 जुलैपर्यंतच्या पाच दिवसात जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव व लातूर जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
🔆 कोकण व विदर्भ
कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्यांच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तेथे जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसात या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा करू या! रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रीयता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरुवातही होऊ शकते.
🔆 चांगल्या पावसाची प्रतीक्षा
विभागवार प्रणाल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असताना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस 27 जूनपासून होत आहे. काही जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. उतार आलेल्या पिकाबाबत जिरायत शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण जाणवत आहे. परंतु, आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मानुसूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही. अर्थात ही शक्यता या जुलै महिन्यात घडून येऊ शकते.