krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain in the July : पाऊस जुलै महिन्यातला

1 min read
Rain in the July : जुलै (July) महिन्यात संपूर्ण देशामध्ये लेह लडाख, पूर्वोत्तर सात राज्ये व पूर्व तामिळनाडू वगळता वगळता जेवढा पाऊस पडतो म्हणजे जुलैमध्ये सरासरी पडणाऱ्या पावसाच्या 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. सांख्यिकीच्या टरसाईल (Tarsile) वर्गीकृत श्रेणीनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यात खालीलप्रमाणे पाऊस जाणवतो. यात दोनच श्रेणी पात्र ठरल्या आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही.

महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात जुलैमध्ये त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता जाणवते.

दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण माण, खटाव, माळशिरस व पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलैमध्ये त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खूपच अधिक जाणवते.

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा व यवतमाळ या जिल्ह्यात व या जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात जुलैमध्ये त्या महिन्यातील सरासरी इतका म्हणजे 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

🔆 कमाल तापमान
जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारी 3 वाजताचे कमाल तापमान (Temperature) हे जुलैमधील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळेच जुलै महिन्यात पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे.

🔆 किमान तापमान
संपूर्ण महाराष्ट्रात जुलैमध्ये पहाटे 5 वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.

🔆 ला-निना
सध्या एन्सो जुलै महिन्यात तटस्थ अवस्थेत असून ऑगस्टमध्ये ला-निना (La Nina) डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी.

🔆 आयओडी (भारत महासागरीय द्वि-ध्रुविता)
आतापर्यंत आयओडी (IOD-Indian Ocean Dipole) धन होता. परंतु, पुन्हा तटस्थेकडे झुकत आहे. त्यामुळे जुलैतल्या पावसासाठी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाणी तापमान समान असणे ही वातावरणीय स्थिती पावसास अटकाव करणारी नाही. ही सुद्धा जुलै महिन्यासाठी जमेचीच बाजू समजावी.

🔆 मान्सूनची स्थिती
मान्सूनने मंगळवारी (दि. 2 जुलै) संपूर्ण देश वेळेआधी म्हणजे सहा दिवस अगोदर काबीज केला. मान्सून (Monsoon) ट्रफ स्थापित झाला असून, सरासरी जागेपासून अधिक उत्तरेला आहे. अरबी समुद्रात किनारपट्टीसमोर दक्षिणोत्तर आस असून, गुजरात भूभाग व दक्षिण किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भात जोरदार, मध्य महाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

🌐 मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा
मराठवाड्यात धूळ व पुरेशा ओलीवरील पेरणी केलेल्या पिकांना जूनच्या शेवट आठवड्यातील किरकोळ ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा वाटत असला तरी शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षाकायम आहे. पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 4 जुलै)पर्यंत पावसाच्या सध्य:स्थितीत विशेष काही बदल जाणवत नाही. मराठवाड्यात अजूनही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते.

🔆 उत्तर व मध्य महाराष्ट्र
खान्देशपासून सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात भाग बदलत मध्यम पावसाने हजेरी लावली. परंतु, खरीप पेर हंगाम स्थिती येथेही समाधानकारक नसून, जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 4 जुलै)पर्यंत येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खान्देशातील तीन जिल्हे व पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

🔆 कोकण व विदर्भ
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात जोरदार तर विदर्भात पूर्वानुमानानुसार मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील पेर पिकांना जीवदान तर नापेर क्षेत्रात पेरीसाठी या पावसाने मदत होऊ शकते.पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 4 जुलै)पर्यंत पावसाची स्थिती अशीच म्हणजे कोकणात अति-जोरदार तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!