krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cloudy weather, Rain possibility : महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तर विदर्भात पावसाची शक्यता

1 min read
Cloudy weather, Rain possibility : काेकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात रविवार (दि. 11 फेब्रुवारी)पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असून ढगाळ वातावरणामुळे (Cloudy weather) थंडी (Cold) काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी असली तरी रात्री व पहाटे थंडी जाणवतच आहे.

✴️ मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 10 जिल्ह्यात शनिवार (दि. 10) व रविवार (दि. 11) ला ढगाळ वातावरणसह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता (Rain possibility) जाणवते. खान्देशातील नंदुरबार, धुळे व जळगाव या तीन जिल्ह्यात ही शक्यता अधिक जाणवते.

✴️ मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यात शुक्रवार (दि. 9), शनिवार (दि. 10) व रविवार (दि. 11) ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्ह्यात ही शक्यता अधिक जाणवते.

✴️ विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात शनिवार (दि. 10) ते बुधवार (दि. 14)पर्यंत ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची जाणवते. विशेषतः अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया व गडचिरोली या आठ जिल्ह्यात शनिवार (दि. 10) व रविवारी (दि. 11) या पावसाची शक्यता अधिकच जाणवते.

✴️ मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात मात्र आकाश निरभ्रच राहील. तिथे केवळ सध्या जी काही थंडी जाणवत आहे, ती तशीच कायम राहणार असून, पावसाची शक्यता मात्र जाणवत नाही.

🎯 पावसाची शक्यता का निर्माण झाली?
कोणत्या वातावरणीय परिणामातून या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे? हे बघणे गरजेचे आहे. सध्या उत्तर-अर्धभारतात अगोदरच मार्गस्थ होवून गेलेल्या पश्चिमी झंजावातातून तिथे पाऊस, बर्फवृष्टी व काही ठिकाणी गारपीट झाली आहे व होत आहे. तेथील ओलसर वातावरणातून तेथे जोरदार थंडीची नोंद गेल्या दिवसात आपण पाहिली आहे.

नवीन पश्चिमी झंजावाताही तिथे येण्याच्या तयारीत आहे. उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून 10 ते 12 किमी उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 270 ते 300 किमी वेगाने प्रवाही झोताचे पश्चिमी वारे अजूनही वाहत आहे. त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत कायम आहे. त्यातच उत्तरी थंड वारे, दक्षिण अर्ध-भारतात सध्या लोटले जात आहेत. म्हणून सध्या मध्य भारतात मध्यम थंडीचा अनुभव येत आहोत.

याच दरम्यान मध्य भारतात थंडीबरोबर विदर्भालगतच्या छत्तीसगड व ओडिशामध्ये हवेचे उच्च दाब क्षेत्रही तयार झालेले आहे. त्यामुळे घड्याळ काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्च दाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे (अँटीसायक्लोनिक विंड) क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत असते. या (क्लॉकवाईज) वाऱ्यांचा वर्तुळाचा परीघ एवढा विस्तारतो की, अति बाहेरील क्षेत्र परिघातील हे वारे बंगालच्या उपसागरातही प्रवेशतात. बंगालच्या उपसागराततून हे वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी प्रचंड आर्द्रता उचलून विदर्भ व परिसरात ओतणार आहे.

आता ओतलेल्या या आर्द्रतेचा उत्तर भारतातून आपल्याकडे सध्या लोटल्या जात असलेल्या उत्तरी थंड वाऱ्यांशी संगम व सरमिसळता होवून विदर्भात दाेन-तीन दिवस गडगडाटीसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही सुद्धा एक अस्वस्थ वातावरणाची (इनस्टेबल) अवस्था आहे. ज्यामुळे गारपीट घडून येत असते. अर्थात सध्या महाराष्ट्रात गारपीटीचे वातावरण नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!