Narendra Modi & Onion export ban : अन्यथा… पंतप्रधान माेदी यांनी नाशकात पाय ठेऊ नये!
1 min readराष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने श्री नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिकमध्ये येणार आहेत. सन 2019 च्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अनेकदा निर्यातबंदी (Export ban), साठ्यावर मर्यादा (Stock Limits), निर्यात शुल्क (Export duty), किमान निर्यात मूल्य (Minimum export price) वाढ, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे भाव पडले आहेत. परिणामी, कांदा उत्पादक कंगाल व कर्जबाजारी झाला आहे. आता सध्या कांद्यावर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यातंबंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. तरीही नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची हिंमत करतात, म्हणजे कांदा उत्पादक अन्याय सहन करतात, असा त्यांना विश्वास आहे.
ऊस आणि भात (धान) ही नाशिक जिल्ह्यातील इतर महत्त्वाची पिके आहेत. या पिकांपासून तयार होणारी साखर व तांदूळ यावर सुद्धा नरेंद्र माेदी सरकारने निर्यातबंदी लावली आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण लुटण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने लावलेला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने 12 तारखेपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी हटविली नाही तर नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला व सभेला विरोध करणे आवश्यक आहे. निषेधाचे फलक घेऊन उभे राहणे, काळे झेंडे दाखवणे, निर्यातबंदी उठविण्याची मागणी करणारे बॅनर घेऊन उभे रहाणे, घोषणा देणे असे अहिंसक व लोकशाही मार्ग अवलंबून शेतकऱ्यांनी आपली नाराजी जाहीर करावी. तसे न केल्यास निर्यातबंदी विरोधात अजिबात असंतोष नाही व शेतकऱ्यांना मिळणारे कांद्याचे दर मान्य आहेत, असे समजले जाईल.
हा निषेध सामान्य कांदा उत्पादकांनी करावा लागेल. कारण शेतकरी संघटनेच्या व स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस आगोदर ताब्यात घेऊन स्थानबद्ध करतील. त्यामुळे आतापासूनच समाज माध्यमांवर निर्यातबंदी उठविण्याची मागणी करणारे संदेश व्हायरल होत राहिले तर भाजप नेते व सरकारपर्यंत आपला निरोप पोहोचेल व निर्यातबंदी उठविण्यास मदत हाेईल. शेतकऱ्यांनी हिंमत दाखवली नाही तर पुढे तोट्यात कांद्याची शेती करण्याशिवाय पर्याय नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जसे विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिले, तसे निर्यातबंदी नाही उठली तर ‘मोदी गो बॅक’, ‘मोदी चले जाओ’ अशा घोषणा देत नरेंद्र मोदी यांचा निषेध करावा, असे आवाहन अनिल घनवट यांनी केले आहे.