Rain and cold : पाच दिवस पाऊस व नंतर थंडी
1 min read✳️ थंडी
ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर म्हणजे गुरुवार (दि. 11 जानेवारी) अमावस्येपासून उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे (Cool dry winds) घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची (Cold) शक्यता जाणवते. शनिवार (दि. 6 जानेवारी) ते बुधवार (दि. 10 जानेवारी) पर्यंतच्या पाच दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान 16 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरीपेक्षा 4 डिग्रीने अधिक) व दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरी इतके) असू शकते, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
✳️ भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार,
🔆 6 जानेवारी 2024 रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची, 7 जानेवारीला हवामान कोरडे राहण्याची आणि 8 जानेवारीला तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
🔆 6 व 8 जानेवारीला तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता कापणी केलेला धान, तूर तसेच वेचणी केलेला कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा. धान, तूर व इतर पिकाची मळणी शक्य नसल्यास शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.
🔆 कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढे ढकलावी.
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर बांधवांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी. विजेपासून संरक्षणासाठी झाडाखाली आश्रय घेणे कटाक्षाने टाळावे तसेच पशुधनाचा झाडाखाली आश्रय टाळावा.
🔆 विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.
🔆 पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्येच साठवावा.