krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Moringa : दुष्काळग्रस्तांसाठी वरदान… शेवगा!

1 min read
Moringa : शेवगा ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा (Moringa) प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून, उष्ण कटिबंधीय व समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारा हा वृक्ष १० मीटर उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

🎯 झाडाची रचना
हे झाड बियांपासून तयार होत असते. झाड एकाच खोडासह सात फूट वाढत जाते. त्यानंतर त्याचा वरचा कोंब हलका खुडला जातो. त्यामुळे त्याला फांद्या फुटतात. फांद्याही सरळ वरच्या बाजूला वाढू लागतात. मात्र, त्या कशा वाढत जातील, हे निश्चित सांगता येत नाही. फांद्याला फांद्या कोठे फुटतील, हे नेमके सांगता येत नाही. फांद्या पुढे बऱ्यापैकी वाढल्यानंतर खाली झुकतात. पसरट पाने असणारा शेंडा वाऱ्याबरोबर झुलत राहतो. शेवग्याच्या झाडाच्या फांद्या विरळ असतात. त्यामुळे शेवग्याच्या झाडापासून गर्द सावली मिळत नाही. झाडाचे खोड जसे वाढत जाते, तसा त्याचा बाह्यरंग पांढरा व्हायला सुरुवात होते. बुंध्याचा व्यास दोन फुटांपर्यंत वाढतो. शेवग्याची साल मऊ असते. त्यावर बारीक ठिपके असतात. खूपच जुन्या झाडाची साल करड्या रंगाची बनते. शेवग्याची साल दोन सेंटिमीटरपर्यंत जाड असते. सालीच्या आत असणारे लाकूड पांढरट पिवळे असते. लाकूड वजनाला अतिशय हलके असते. तसेच ते ठिसूळ असते. या झाडाला प्रचंड फुलोरा येत असतो, यामुळे याला शेंगाही प्रचंड येतात. शेंगांमध्ये याचे बी तयार होते.

🎯 पर्यावरणीय उपयोग
पर्यावरणात या झाडाला खूप महत्त्व आहे. या झाडाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, यामुळे हे झाडं कधीही जळत नाही. हे झाड अनंत काळापर्यंत जिवंत राहू शकते. या झाडाला प्रचंड फुलोरा येत असल्यामुळे याच्या भोवती मधमाश्या व इतर कीटक मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे निसर्गात परागीभवन करण्याचे महत्त्वाचे कार्य शेवगा करतो. यामुळे शेतीतील पिकांचे उत्पादन वाढते. शेवगा हवा शुद्ध करण्याचे कार्य करतो. भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देण्याचे कामही शेवगा करतो. या झाडाची पाने व फुले मोठा प्रमणात गळून जमिनीवर पडतात, यापासून शेतीला उपयोगी खत बनते. जमिनीतील पाण्याचा साठाही वाढविण्यास हे झाड मदत करते. अनेक पक्षी व प्राण्यांना आश्रय हे झाड देते तसेच अन्नही देते.

🎯 आयुर्वेदिक उपयोग
हे झाड विविध औषधी गुणधर्म असलेले आहे. याची पाने, फुले, शेंगा, साल, खोड हे सर्वच औषधी आहेत. धन्वंतरी निघंटूमधील ‘शिग्रुस्तिक्त: कटुष्चोष्ण: कफशोफ समीरजित् l कृम्यामविषमेदोघ्नो विद्रधिप्लीहगुल्मनुत् ll’ या एका श्लोकामध्ये शेवगा महात्म्य दिलेले आहे. शेवगा हा 300 रोगांवर गुणकारी आहे. केस गळती थांबविणे, सांधे दुखी, पोटाचे आजार, पित्त, कफ, वात या विकारांवर, मधुमेह, रक्तदाब कमी करणे, मूत्र विकार, पाळीचे आजार, जखमा भरून काढण्यासाठी, मानसिक तणाव कमी करण्यासाठी अशा विविध रोगांवर हे झाड रामबाण उपाय करते.

🎯 आर्थिक उपयोग
शेवगा हे आर्थिक समृद्धी देणारे झाड आहे. शेवग्यापासून शेंगा मिळतात. या शेंगा मानवी आहारात मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जातात. त्यामुळे याला मोठी बाजारपेठ आहे. त्यापासून पावडर बनविली जाते. ही पावडर चपाती, भाकरी, विविध भाज्यांमध्ये घालून वापरली जाते. अनेक उत्पादने शेवग्यापासून तयार होतात. आयुर्वेदात अनेक औषधे यापासून बनवतात. त्यामुळे याचाही आर्थिक फायदा होतो. याची पाने, फुले यापासून नैसर्गिक खते बनतात, याचा शेतीला फायदा होतो.

🎯 शेवग्याची शेती
शेवगा शेती ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायद्याची आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी मजुरीत, कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारी ही शेती आहे. सर्व प्रकारचा जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. दुष्काळी भागात हे झाड वरदान आहे. कारण, कमी पावसात जास्त उत्पादन हे झाड देते. जमिनीचा कस वाढविण्याचे कामही हे झाड करते. एकदा लावले की अनेक वर्षे याचे उत्पादन व उत्पन्न सुरू राहते. दरवर्षी याची छाटणी करावी लागते. औषध फवारणीची आवश्यकता नसते. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी शेवगा शेती वरदान आहे. शेतकऱ्यांनी शेवगा शेती मोठ्या प्रमाणात करावी, असे नागर फाऊंडेशन आवाहन करत आहे.

🎯 शेवगा संगोपन
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या नाहीत, असा माणूस मिळणे दुर्मिळ! शेवगा हे महाराष्ट्रातील अनेकांच्या परसात फुलणारे झाड. कसेही वाढणारे. मनमौजी. त्याच्या सौंदर्यात अनेकांना फारसे काही दिसत नाही. कशाही वाढणाऱ्या फांद्या. अतिशय हलके आणि कमजोर लाकूड. संयुक्त पान असूनही कडुनिंब, चिंचेसारखी नियमितता न जपणारे. असे सारे काही असूनही, बावनकशी सोन्यासारखे, सर्वप्रिय, सर्वगुणसंपन्न. त्याच्या औषधी गुणधर्मांची जसजशी माहिती लोकांना समजू लागली आहे, तसतसे हे झाड आणखी लोकप्रिय बनत आहे. सहज बांधावर वाढणाऱ्या या झाडाची आज खास शेती करण्यात येते. बेशिस्तपणातही त्याचे सौंदर्य खुलून दिसते. फुललेला, मंद गंध प्रसवणारा शेवगा तर अनेकांना मोहीत करतो. अनेक कुटुंबाचा शेवग्याची भाजी खाल्ली जात नाही, असा आठवडा जात नाही. यामुळे प्रत्येक घरासमोर किंवा शेताच्या बांधावर हे झाड असलेच पाहिजे. शहरी भागातही परसबागेत या झाडाची लागवड करता येते, मोठ्या कुंडीत लावले तर अनेक दिवस हे झाड जिवंत राहते व आपल्याला नियमित शेंगा खाण्यास मिळतात. यामुळे सर्वांना आवाहन आहे की शहर असो वा गाव येथे जागा मिळेल तेथे एक शेवग्याचे झाड लावावे.

1 thought on “Moringa : दुष्काळग्रस्तांसाठी वरदान… शेवगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!