Cold in Maharashtra : कशी असेल महाराष्ट्रातील थंडी?
1 min read🔆 कमाल किमान तापमानांच्या नोंदी काय श्रेणीच्या असतील?
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान साधारणत: 12 ते 14 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास तर दुपारचे कमाल तापमान 26 ते 28 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास जाणवेल. ही दोन्हीही तापमाने सरासरी तापमानापेक्षा एखाद्या डिग्री सेंटिग्रेडने खालावलेली आहेत. विदर्भातील पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास जाणवेल. एकंदरीत डिसेंबरच्या थंडीच्या मासिक भाकितापेक्षा अधिक चांगली थंडी मुंबईसह महाराष्ट्राला उपभोगण्यास एकंदरीत मिळू शकते.
🔆 पावसाची स्थिती काय असेल?
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.
🔆 महाराष्ट्रात कशामुळे थंडीची शक्यता निर्माण झाली?
उत्तर भारतात वायव्येकडून पूर्वेकडे मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंजावातांच्या साखळीतून सध्या तेथे थंडी व बर्फ पडत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांच्या वहनानुकूलतेसाठी कमी दाब क्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रावर अस्तित्वात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाबरोबर जोरदार ईशान्यई थंड वारे महाराष्ट्राच्या भू-भागावर ओढले जाण्याची शक्यतेमुळे कडाक्याच्या थंडीचा प्रभाव या भागात जाणवणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात पारा अधिक घसरणीमुळे होणारे महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्याखालची पातळी गाठू शकते.
🔆 थंडीचा उत्तर भारतावर होणारा परिणाम कसा असेल?
उत्तर भारताचा संपूर्ण पट्टा सध्या धुक्याच्या (Fog) चादरीत लपेटलेला आहे. तेथील किमान तापमान सध्या 4 ते 8 डिग्री सेंटिग्रेड पर्यंत घसरले असून, दृश्यमानता (Visibility) भागपरत्वे 500 ते 200 मीटरच्या आत खालावली आहे. रेल्वे व विमान वाहतुकीवर याचा परिणाम जाणवत आहे. पाऊस (Rain), बर्फ (Snow), थंडी (Cold), धुके (Fog) काहीसे जाणवत असले तरी उत्तर भारतातील हिवाळी पर्यटनास वातावरण ठीकच समजावे.
🔆 रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रात या थंडीची उपयोगिता काय?
या वर्षीच्या ‘एल-निनो’मुळे (El Nino) ईशान्य मान्सून दक्षिण भारतातच 15 डिग्री अक्षवृत्तीय सीमारेषेदरम्यानच्या क्षेत्र मर्यादेतच कार्यरत राहिला. त्यामुळे महाराष्ट्रात आकाश ढगाळ वातावरण विरहित निरभ्र राहिले. शिवाय, यावर्षी हिवाळी हंगामात शीत-लहरींची (Cold waves)संख्याही दरवर्षीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. म्हणून एकत्रित या सर्व पार्श्वभूमीवर सध्या डिसेंबर महिन्यात आपणास जी काही मिळत असलेली थंडी ही रब्बी हंगामासाठी नक्कीच पूरक व जमेचीच बाजू समजावी. कारण मागील वर्षी 2022 मध्ये याच दिवसात महाराष्ट्रातील डिसेंबरातील थंडी ‘मॅन-दौंस’ चक्री वादळामुळे हिरावली गेली होती. परंतु ‘ला-निना’ (La Nina) होता म्हणून चांगल्या पर्जन्यातून रब्बी हंगाम तरला हाेता. केरळ, तामिळनाडू या राज्यात येते 2 ते 3 दिवस ईशान्य मान्सूनच्या हंगामातील शेवटच्या टप्प्यातील पावसाची शक्यता अजूनही कायम आहे, असेही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.