Developed India a dream : विकसित भारत एक दिवास्वप्न
1 min read🔆 विकसित भारत संकल्प यात्रेचा हेतू
नोव्हेंबर 15 पासून, बिरसा मुंडा या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या झारखंडमधील खुंटी या जन्मगावातून विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला भारत सरकारने हाती घेतलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी, एलईडी स्क्रीन व वायफायने सज्ज असलेल्या अशा 2,500 गाड्या ग्रामीण भागात फिरणार आहेत व आणखी 200 गाड्या शहरी भागासाठी मोहिमेत सामील केल्या जाणार आहेत. केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांबरोबरच गेल्या 10 वर्षात भारताने कमविलेले यश, जसे चांद्रयान, जी-20 परिषद याबाबतही माहिती जनतेला देणे हा हेतू आहे.
🔆 सरकारी अधिकारी व कृषी विभागावर धुरा
भारतातील 2 लाख 50 हजार ग्रामपंचायती, 3,700 नगरपालिकांमध्ये या गाड्या फिरतील. 14,000 ठिकाणांवर या गाड्या माहिती देतील. सरकारी योजनांमुळे झालेला फायदा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काही यशोगाथा, वैयक्तिक अनुभव व पथनाट्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रचाराच्या गाड्यांबरोबर सरकारी अधिकारी असणार आहेत. त्यांना ‘रथ प्रभारी’ असे संबोधले जाणार होते. मात्र, त्याला आक्षेप घेण्यात आल्यामुळे आता या अधिकाऱ्यांना ‘नोडल ऑफिसर’ असे संबोधले जात आहे. या प्रचारात प्रामुख्याने 20 योजनांची माहिती देण्यात येईल व ग्रामीण भागातील प्रचाराची जबाबदारी कृषी विभागावर असेल. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात येतील. दोन महिन्यात 20 योजनांची माहिती देत 25 जानेवारी 2024 रोजी या यात्रेची सांगता होईल.
🔆 विकासाचे मापदंड
एखाद्या देशाला विकसित होण्यासाठी काही मापदंड असतात, निकष असतात. त्यातील प्रमुख आर्थिक निकष आहेत, दरडोई उत्पन्न, औद्योगीकरणाचा स्थर, सर्वसाधारण राहणीमानाचा दर्जा व तांत्रिक संरचना. आर्थिक निकषाशिवाय मानवी विकास निर्देशांक, साक्षरता, आरोग्य, जीवनमान इत्यादींचा विचार केला जातो. या सर्व निर्देशांकाचा अभ्यास केला तर भारत ‘विकसित देश’ होण्याच्या जवळपास ही जाऊ शकत नाही. विकसित देशांचे दरडोई उत्पन्न 22,000 डॉलरच्या वर असायला हवे. अमेरिकेचे दरडाेई उत्पन्न 80 हजार डाॅलर आहे, चीनचे दरडाई उत्पन्न 12 हजार 700 डाॅलर आहे. अंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या माहितीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न फक्त 2,621 डॉलर इतकेच आहे.
🔆 जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक
जागतिक क्रमवारीत 192 देशांमध्ये भारत 139 व्या क्रमांकावर आहे. मानवी विकास निर्देशांकात 139 व्या क्रमांकावर, भूक निर्देशांकात 125 देशांमध्ये भारत 111 व्या क्रमांकावर, महिला सुरक्षेमध्ये 170 देशांमध्ये भारत 148 व्या क्रमांकावर, साक्षरतेत 204 देशांमध्से 169 व्या क्रमांकावर, आयुष्यमान मध्ये 201 देशांमध्ये 126 व्या क्रमांकावर, व्यवसाय करण्याची सुलभतामध्ये 190 देशांमध्ये 63 व्या क्रमांकावर, भ्रष्टाचारात 180 देशांमध्ये 85 व्या क्रमांकावर असून, निवडणूक लोकशाहीमध्ये भारताचा 108 वा क्रमांक लागतो. अशी सद्यस्थिती असताना आहे तीच धोरणे ठेऊन भारताला विकसित देश म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता असंभव आहे. मग हा विकसित भारताचा संकल्प घेऊन हे रथ का फिरत आहेत? याचे उत्तर मिळाले पश्चिम महाराष्ट्रातील एका गावात.
🔆 नोडल ऑफिसरचे निवेदन व प्रश्नांचा भडिमार
त्या गावात हा रथ आला व नोडल ऑफिसरने त्याचे निवेदन सुरू केले. तेथे काही तरुणांनी त्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. या योजना भारत सरकारच्या आहेत की, मोदींची आहे? भारताच्या आहेत तर मोदी की गारंटी का? इथे कुठे तिरंगा दिसतो का? सगळ्या पोस्टरचे रंग भाजपाच्या झेंड्याशी मिळते जुळते का? कोणाच्या पैशाने हा प्रचार सुरू आहे? आमच्या पैशाने ना? मोदींचे गुणगान का? अधिकारी उज्ज्वला योजनेचे कौतुक सांगू लागला तर त्या कार्यकर्त्यावराेबर ग्रामस्थही म्हणू लागले 10 कोटी गॅस कनेक्शन दिले अन् 400 रुपयांचे ग्रॅस सिलिंडर हजारला केला. कुठे जातात हे पैसे? घरकुल, हर घर जल, विमा अशा अनेक योजनांतला फोलपणा लोक दाखवून देत आहेत. अधिकारी बिचारे हतबल झाले, निरुत्तर झाले होते. ग्रामस्थांनी हा प्रचार बंद करण्याचा आग्रह धरला.
🔆 सरकारी पैशातून पक्षाचा प्रचार
भारतीय जनता पार्टीचा हा प्रचार सरकारी पैशातून सुरू आहे यात काही शंका नाही. जनतेच्या मनात मोदी व भाजपाबद्दल चीड आहे, हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. मोदींची गारंटी कुठे राहिली? कोणते आश्वासने त्यांनी पूर्ण केले? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक 50 टक्के हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करू, न खाऊंगा न खाने दुंगा, ही आश्वासने जाहीर सभेतून दिली होती. जनता विसरलेली नाही.
🔆 महासत्ता, विश्वगुरूच्या गाेष्टी हास्यास्पद
सर्व पातळीवर पिछाडीवर असलेला देश महासत्ता व विश्व गुरू होण्याच्या गोष्टी करणे हास्यास्पद आहे. 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी काय प्रयत्न आहेत? कृषिप्रधान असलेल्या देशातील सर्व शेतीमालाची निर्यात बंद करून विकास होणार का? शेतमालाचे उत्पादन वाढीसाठी नवे तंत्रज्ञान स्वीकारायला बंदी घालून विकास होतो का? लाखो हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपदे देऊन देश विकसित होईल का? भ्रष्टाचार, प्रचंड कर आकारणी व असुक्षिततेला कंटाळून देशातील उद्योजक देश सोडून जात आहेत. श्रीमंत अब्जाधीश नागरिक, सुशिक्षित युवक देश सोडून जात आहेत, ही काय विकासाची लक्षणे आहेत काय?
🔆 खुली अर्थव्यवस्था
भारताला खरच विकसित करायचे असेल तर भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारायला हवी. ज्या व्यवस्थेत सरकारचा किमान हस्तक्षेप असेल व भ्रष्टाचार करण्याची किमान संधी असेल, अशी व्यवस्था आली तर 10 वर्षात देश पहिल्या 20 देशात गणला जाईल, असे शेतकरी नेते व अर्थतज्ज्ञ शरद जोशी म्हणत असत. त्या विचाराचे सरकार सत्तेत पाठवणे ही जनतेची जबाबदारी आहे. बाकी विकसित भारत संकल्प यात्रा ही भारताच्या भोळ्या जनतेला दाखवलेले एक दिवास्वप्न (Dream) आहे, बाकी काही नाही.