Modi Guarantee Bonus : महाराष्ट्रात कापूस, साेयाबीन, धानाला ‘माेदी गॅरंटी बाेनस जाहीर करा!
1 min readमा. श्री अजितजी पवार,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
विधानसभा भवन, नागपूर.
विषय :- नरेंद्र माेदीजींची गहू-धानाला बाेनस देण्याची गॅरंटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना देण्याची घाेषणा करावी, ही विनंती.
सस्नेह नमस्कार,
चार राज्यातील निवडणूक निकालावरची आपली प्रतिक्रिया दूरदर्शनवर ऐकली. आपण छत्तीसगड – तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली आहे. पण अत्यंत नम्रपणे आपल्या लक्षात आणून देताे की, या मुख्यमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या धाेरणामुळेच माेदीजींना धानाला (Paddy) व गव्हाला (Wheat) बाेनस (Bonus) जाहीर करून धान 3,100 रुपये व गहू 2,700 रुपये प्रति क्विंटलने विकत घेण्याची माेदी गॅरंटी जाहीर करावी लागली. विशेष म्हणजे, मा. माेदीजी (Modiji) पंतप्रधान हाेण्यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंगजी धानाला प्रति क्विंटल 300 रुपये तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण गव्हाला प्रति क्विंटल 160 रुपये बाेनस देत हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ताे बाेनस बंद करायला लावला व दाेन्ही मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला हाेता.
सन 2018 नंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशजी बघेेल यांनी 2,500 रुपये व नंतर 2,700 रुपये प्रति क्विंटल दराने धान विकत घेण्याचे धाेरण राबविले हाेते. या धाेरणाला पण मा. माेदीजींनी विराेध केला हाेता. मा. श्री. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये तेलगू रयत बंधू याेजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये प्रति एकर (जमिनीची मर्यादा नाही) देण्याचे धाेरण राबविले हाेते. यामुळेच मा. अमितजी शहा यांनी तर तेलंगणाच्या शेतकऱ्यांसाठी 3,100 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदीची गॅरंटी (Guarantee), 12,000 रुपये पी. एम. सन्मान निधी, 18,000 रुपये रासायनिक खत सबसिडी, 3,500 रुपये प्रति एकर अनुदान अशा अनेक घाेषणा केल्या आहेत.
आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना धान, साेयाबीन, कापसाला एमएसपी (Minimum Support Price) एवढा दर बाजारात मिळत नाही. आजूबाजूच्या राज्यात धानाला एमएसपी (2,175 रुपये)पेक्षा 40 टक्के जास्त म्हणजे 3,100 रुपये व गव्हाला एमएसपी (2,275 रुपये)पेक्षा 20 टक्के जास्त म्हणजेच 2,700 रुपये दर मिळत आहेत. माेदी गॅरंटी (Modi Guarantee) म्हणून तर हा न्याय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही?
याच पार्श्वभूमीवर आम्ही आपणास विनंती करताे की, नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात धानाला प्रति क्विंटल 3,100 रुपये कापसाला 9,100 रुपये (एमएसपी-7,020 रुपये अधिक 30 टक्के बाेनस) व साेयाबीनला 6,000 रुपये (एमएसपी-4,600 रुपये अधिक 30 टक्के बाेनस) भाव जाहीर करून या शेतमालाच्या खरेदीची व्यवस्था करावी. अशी गॅरंटी देणारा पंतप्रधान नेहमीसाठी राहावा, हीच प्रभू राम चरणी प्रार्थना.
धन्यवाद
आपला विनम्र
विजय जावंधिया
शेतकरी संघटना पाईक.