krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rabbi dryland crops : रब्बी हंगामातील कोरडवाहू पिकांची आंतरमशागत

1 min read
Rabbi dryland crops : रब्बी (Rabbi) हंगामात बहुतेक पिके ही उपलब्ध असलेल्या जमिनीतील ओल्याव्यावरच येतात. अर्थात थोडे फार विहिरीचे पाणी दिले जाते. परंतु ते अपुरेच असते.अशा परिस्थितीत उपलब्ध जमिनीतील ओलावा, पीक पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल, याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकांच्या आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून रब्बी हंगामामध्ये अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पिकांच्या आंतरमशागतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी (Sorghum), हरभरा (Gram), करडई (Kardai) आणि सूर्यफुल (Sunflower) ही पिके (Crops) घेतली जातात. या पिकात आंतरमशागत कशी करावी, याचा उहापोह येथे केला आहे.

🟢 रब्बी ज्वारी
🔆 पेरणीनंतर 10 दिवसांनी पहिली व 12 ते 15 दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत. जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी ज्वारीच्या पिकाला तीन कोळपण्या द्याव्यात. त्यासाठी पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली, पाचव्या आठवड्यात दुसरी तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी. त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व तिसरी विशेषतः शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास रान फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात व जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन थांबते. ही कोळपणी अत्यंत महत्त्वाची आहे.
🔆 तणांच्या उपद्रवानुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्टरी पाच टन काडीकचरा/धसकटे, सरमाड पिकाच्या दोन ओळीत पसरवावा. या आच्छादनामुळे जमिनीत ओल चांगली टिकून राहण्यास मदत होते. अनियमित हवामान, अवर्षण पडल्यास ज्वारीच्या पिकामधील प्रत्येक तिसरी ओळ काढून आंतरमशागत करावी.
🔆 ज्वारीमधील टारफुला व इतर द्विदल तणांचा नाश करण्यासाठी 2-4 डी तणनाशक हेक्टरी 1 किलो 680 ते 1,000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सिमेझीन व अॅटा्झीन प्रत्येकी हेक्टरी 1 किलो वापरून ज्वारीतील द्विदल व तृणवर्गीय तणांचे व्यवस्थापन करावे. हे तणनाशक सर्वत्र फवारण्यापेक्षा ते पट्टयात देणे परिणामकारक ठरते. या तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी ज्वारी उगवून येण्यापूर्वी करावी.

🟢 हरभरा
🔆 पेरणीनंतर 15 दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत आणि विरळणी करून दोन रोपातील अंतर 10 सें.मी ठेवावे.पेरणीपासून चार आठवड्याच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी देणे आवश्यक आहे. परिणामी तणांचा नायनाट होऊन उत्पादनात 25 टक्के वाढ होते.
🔆 हरभरा पिकातील तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी पीक पेरल्यानंतर परंतु पीक उगवणी पूर्वी सिमॅझीन तणनाशक 0.5 ते 1 किलो क्रियाशील फवारावीत. बागायती हरभर्‍यातील तणांच्या व्यवस्थापनासाठी फ्लूकॅसोरसीन हेक्टरी 0.75 ते 1 किलो क्रियाशील फारच परिणामकारक असून, पीक पेरणीपूर्वी 600 ते 800 लिटर पाण्यात मिसळून करावी. पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तणविरहीत ठेवावे.
🔆 पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीवर पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते.

🟢 करडई
🔆 या पिकाची विरळणी उगवणीनंतर 10 दिवसांनी किंवा पेरणीपासून 20 दिवसांनी करावी. मध्यम जमिनीत दोन रोपात साधारणतः 20 सें.मी. तर भारी जमिनीत 30 सें.मी. ठेवावे. जरुरीप्रमाणे एखादी निंदणी शक्य न झाल्यास अलकसोर हेक्टरी 3 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.
🔆 पीक उगवणीनंतर 10 ते 12 दिवसांनी या पिकाची विरळणी करणे आवश्यक आहे. विरळणी करताना चांगले जोमदार रोपे ठेवावी. दोन रोपामधील अंतर 20 सें.मी. ठेवावे. रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी. दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी पाचव्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी आठव्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

🟢 सूर्यफुल
🔆 पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. विरळणी करताना मध्यम जमिनीत 20 सें.मी. तर भारी जमिनीत 30 सें.मी अंतर ठेवावे.
🔆 पिकास 15 दिवसाच्या अंतराने एक–दोन कोळपण्या तसेच एक खुरपणी देऊन शेत तणविरहित ठेवावे. दोन ओळीमध्ये गव्हाचे भुसकट अथवा उसाचा पाचटाचे तुकडे करून आच्छादन केल्यास हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
🔆 वर उल्लेख केल्याप्रमाणे रब्बी पिकांमध्ये योग्य वेळी आंतरमशागत केल्यास तणांचा नायनाट करून जमिनीतील हवा खेळती राहते आणि उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो. परिणामी, उत्पादनात भरीव वाढ होते.

©️ डॉ. आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जिल्हा अहमदनगर.
संपर्क :- 9404032389
मेल :- aditakate@gmail.com

©️ ऐश्वर्या राठोड,
आचार्य पदवी विद्यार्थिनी, कृषिविद्या विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
संपर्क :- 8411852164
मेल :- aishwaryarathod01@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!