krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Open End Spinning Mills strike : तामिळनाडूतील सूतगिरण्या तीन आठवड्याच्या संपावर

1 min read
Open End Spinning Mills strike : केंद्र सरकारचे चुकीचे धाेरण, कापड उद्याेगाला (Textile industry) कमी दरात हवा असलेला कापूस (Cotton) आणि सूत (Yarn), जीएसटीचा (Goods and Services Tax) परतावा देण्यात केली जात असलेली दीर्घ दिरंगाई, मध्यंतरी आयात (Import) केलेले कमी दरातील सूत आणि कापूस यासह अन्य तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण भारतातील सूतगिरण्या (Spinning Mills) वर्षभरापासून आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. मागणी करूनही केंद्र सरकारने सूतगिरणी मालकांना आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे तामिळनाडूमधील सूतगिरणी मालकांनी तीन आठवड्याचा संप (Strike) पुकारला आहे. परिणामी, तामिळनाडूमधील सूतगिरण्या मंगळवार, दिनांक 7 नाेव्हेंबरपासून गुरुवार, दिनांक 30 नाेव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. साेबतच तामिळनाडूमधील तिरुपूर आणि कोईम्बतूर जिल्ह्यातील मास्टर विणकरांनी रविवार, दिनांक 5 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे.

कापड गिरण्यांमधील टाकाऊ कापूस (Waste cotton) व कापडाचे (Waste cloth) वाढते दर, वीजदरवाढ आणि मजुरीचा वाढता खर्च विचारात घेता सूतगिरण्या चालविणे कठीण जात आहे. याच कारणांमुळे जुलै 2023 मध्ये सूतगिरण्यांनी सुताचे उत्पादन करणे थांबविले हाेते, अशी माहिती तामिळनाडूमधील ओपन एंड स्पिनिंग मिल्स असोसिएशनचे (Open End Spinning Mills Association) अध्यक्ष जी. अरुलमोझी यांनी दिली.

तामिळनाडूतील ओपन एंड स्पिनिंग मिल्स फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणारे माॅप्स (Mops), मॅट्स (Mats), किचन टॉवेल्स (Kitchen towels), लुंगी इत्यादींचे उत्पादक करणाऱ्या गिरण्यांना सूत पुरवतात. तामिळनाडूमध्ये सुमारे 600 ओपन एंड स्पिनिंग मिल्स दररोज 60 कोटी रुपये किमतीचे धागे (Yarn) तयार करतात. गेल्या सहा महिन्यांपासून या गिरण्या त्यांच्या क्षमतेच्या फक्त 50 टक्के सुताचे उत्पादन करीत आहेत. गिरण्या चालवल्यास आमचे आर्थिक नुकसान होत असल्याने आम्ही उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जी. अरुलमोझी यांनी स्पष्ट केले.

ओपन एंड स्पिनिंग मिल्समध्ये ज्या सुताचे उत्पादन करण्यासाठी कापड गिरण्यांमधील टाकाऊ कापूस व सूत वापरले जाते. पूर्वी हा टाकाऊ कापूस सरासरी 97 रुपये प्रति किलाे दराने मिळायचा. मध्यंतरी या टाकाऊ कापसाचे दर 160 रुपये प्रति किलाेपर्यंत वधारले हाेते. आता ओपन एंड स्पिनिंग मिल्सला का टाकाऊ कापूस 115 रुपये प्रति किलाे दराने खरेदी करावा लागत आहे. या टाकाऊ कापसापासून तयार केलेले सूत 140 ते 150 रुपये प्रति किलाे दराने विकावे लागत असल्याने ओपन एंड स्पिनिंग मिल्सला सातत्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. साेबतच मागील पाच वर्षात वीज, मजुरी आणि कच्च्या मालाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने या गिरण्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

हरियाणातील पानिपतमधील ओपन एंड स्पिनिंग मिल्स तामिळनाडूच्या तुलनेत 30 टक्के कमी किमतीत सुताची विक्री करीत आहेत. राज्य सरकारने तामिळनाडूतील विजेचे दर कमी न केल्यास हा वस्त्रोद्योग बंद पडण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, भारतातून कापसाची निर्यात कमी केली जात असली तरी टाकाऊ कापसाची निर्यात मात्र माेठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे केंद्र सरकारने या टाकाऊ कापसाच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवावे किंवा निर्यात थांबवावी. कापसावरील आयात शुल्क हटवावे. सिंथेटिक फायबरसाठी गुणवत्ता नियंत्रण नियम शिथिल करावेत. राज्य सरकारने LT CT वीज ग्राहकांसाठी पीक अवर शुल्क काढून टाकावे आणि निश्चित शुल्कात सुधारणा करावी. तमिळनाडूमधील कापड उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी वस्त्रोद्योगाला विशेष दर्जा देऊन आर्थिक मदत करावी, आदी मागण्या ओपन एंड स्पिनिंग मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष जी. अरुलमोझी यांनी केल्या आहेत.

ओपन एंड स्पिनिंग मिल्स असोसिएशनद्वारे केल्या जात असलेल्या टाकाऊ कापसाच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवावे किंवा निर्यात थांबवावी तसेच कापसावरील आयात शुल्क हटवावे. या मागण्यांमुळे कापसाचे दर नियंत्रित केल्याचा कापूस उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे. त्याचा फायदा कापड उद्याेगांना हाेणार असल्याने केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क हटविणे किंवा टाकाऊ कापसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याऐवजी ओपन एंड स्पिनिंग मिल्स कच्चा माल खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने सबसिडी द्यायला हवी. कापसाचा बाजार दबावात येणार नाही, असा काेणताही शेतकरी विराेधी निर्णय केंद्र सरकारने घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!