Cyclonic Storm : चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता अत्यल्प
1 min readबंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रह्मदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर बुधवारी (दि. 18 ऑक्टाेबर) तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या (Cyclic winds) स्थितीचे रुपांतर 21 ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात रुपांतर होईल. नंतर पुढील पायऱ्यांमध्ये ते विकसित होवून दक्षिण बांगलादेशाच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर पावसासाठी या चक्रीय वाऱ्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. वायव्येकडून भूवनेश्वर मार्गे देशाच्या भू-भागावर प्रवेशित होण्याची शक्यताही कमी जाणवते, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
25 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा परिणाम कायम राहू शकतो. परंतु त्यानंतर होणाऱ्या बदलाच्या निरीक्षणावरून पुढील ऑक्टोबर हिटचा परिणामाच्या भाकीत कळवले जाईल. पुढील वर्षी सुपर एल-निनोची शक्यता व देशाच्या मान्सूनवर नकारात्मक परिणामाच्या शक्यतेबाबत ‘नोआ’ची बातमी सध्या वायरल होताना दिसत आहे. परंतु अजून याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. या वर्षीही त्यांनी फेब्रुवारी 2023 ला ‘एल निनो’ जूनपासूनच कार्यरत होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु, त्याचा परिणाम किंवा उगम आता सप्टेंबरमध्ये आपण पाहत आहोत. याबाबत सध्या लक्ष ठेवून वाट बघावी लागेल, असेही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.