krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Demand for oranges in Bangladesh : बांगलादेशात नागपुरी संत्र्याला प्रचंड मागणी; पण सामान्यांना दर परवडेना!

1 min read
Demand for oranges in Bangladesh : आंबट-गाेड चव, व्हिटॅमिन ए, बी, सी व सिट्रस ॲसिडमुळे बांगलादेशात (Bangladesh) नागपुरी संत्र्याला (Nagpuri Orange) प्रचंड मागणी आहे. बांगलादेशी नागरिक सहसा मध्यम आकाराची संत्री खातात. बांगलादेश सरकारने संत्र्यावर प्रति किलाे 88 रुपये आयात शुल्क (Import duty) लावल्याने संत्र्याचे दर तब्बल अडीच पटीने वाढले आहेत. हा वाढीव दर (Increased rates) सर्वसामान्य बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi citizen) परवडणारा नसल्याने तेथील बाजारपेठेत संत्र्याला भरीव मागणी असताना विक्री मात्र फारच संथ आहे, अशी माहिती भारतातील संत्रा निर्यातदारांनी दिली. याचा फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसला आहे. केंद्र सरकार संत्र्याची निर्यात वाढविण्यासाठी तर साेडाच ती टिकून ठेवण्यासाठी काहीही उपाययाेजना करायला तयार नाही.

🌎 संत्र्याचे दर प्रति किलाे 237 टका
बांगलादेशात संत्रा कंटेनरऐवजी (container) प्लास्टिक क्रेटमध्ये (Plastic crate) भरून ट्रकद्वारे पाठविला जाताे. सध्या बांगलादेशात 20 किलाे संत्रा असलेली क्रेट सरासरी 3,600 रुपयांना विकली जात आहे. हा संत्रा बांगलादेशी ग्राहकांना 180 रुपये किलाे म्हणजेच 237 टका (बांगलादेशी चलन – Bangladeshi currency)ला (विनिमय दर :- 1 टका = 0.76 रुपये) खरेदी करावे लागत आहे. बांगलादेशातील सामान्य ग्राहकांची ऐपत 80 ते 110 टका प्रति किलाे संत्रा खरेदी करण्याची आहे. 237 टका प्रति किलाे दराने संत्रा खरेदी करणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने इच्छा असूनही ते संत्रा खरेदी करीत नाही. त्यामुळे भरीव मागणी असूनही संत्र्याची विक्री संथ आहे, अशी माहिती संत्रा निर्यातदार जावेदभाई यांनी दिली. याला भारतातील इतर संत्रा निर्यातदारांनी दुजाेरा दिला आहे.

🌎 सबसिडी दिल्यास संत्र्याचे दर प्रति किलाे 121 टका
केंद्र सरकारने संत्रा निर्यातीला (Export) 100 टक्के म्हणजेच प्रति किलाे 88 रुपये सबसिडी (Subsidy) दिल्यास बांगलादेशातील संत्र्याचे दर 92 रुपये म्हणजेच प्रति किलाे 121 टका हाेतील. हा दर तेथील सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने सामान्य बांगलादेशी नागरिक संत्र्याची माेठ्या प्रमाणात खरेदी करतील. तेथील बाजारपेठेत नागपुरी संत्र्याची विक्री वाढल्यास विदर्भातील संत्र्याचे दर प्रति टन किमान 10,000 रुपयांनी वाढतील. यात संत्रा उत्पादकांना आर्थिक फायदा हाेईल, असेही संत्रा निर्यातदारांनी सांगितले. परिणामी, ही समस्या साेडविण्यासाठी केंद्र सरकारने ठाेस निर्णय घेणे व कायमस्वरुपी उपाययाेजना करणे गरजेचे आहे.

🌎 वाहतूक खर्च 2.45 लाख तर आयात शुल्क 22 लाख रुपये
विदर्भातून बांगलादेशात ट्रकद्वारे संत्रा नेला जाताे. विदर्भातील ट्रक बांगलादेशच्या सीमेपर्यंत जातात. तिथे हा संत्रा बांगलादेशच्या ट्रकमध्ये लाेड केला जाताे. ते ट्रक सीमेपासून बांगलादेशातील बाजारपेठांमध्ये संत्रा पाेहाेचवितात. एका ट्रकमध्ये सरासरी 25 टन संत्रा असताे. या 25 टन संत्र्याच्या वाहतुकीसाठी किमान 2 लाख 45 हजार रुपये वाहतूक खर्च येताे. बांगलादेशच्या सीमेपर्यंतचा वाहतूक खर्च 1 लाख 75 हजार रुपये असून, सीमेपासून बांगलादेशच्या बाजारपेठेत जाण्याचे भाडे सरासरी 70 हजार रुपये द्यावे लागते. प्रति किलाे 88 रुपयांप्रमाणे 25 टन संत्र्यासाठी 22 लाख रुपये आयात शुल्क द्यावा लागताे, अशी माहिती संत्रा निर्यातदार जावेदभाई यांनी दिली.

🌎 प्रबळ दबावगटाची आवश्यकता
आजवरच्या केंद्र सरकारांनी नागपुरी संत्र्यावर एक पैसाही खर्च केला नाही. संत्र्याचे दर्जेदार उत्पादनासाेबत संत्र्याच्या निर्यातीसाठी प्रभावी प्रयत्नही केले जात नाही. आज विदर्भातील संत्रा उत्पादक आर्थिक संकटात असताना केंद्र सरकार काही करायला तयार नाही. ही समस्या साेडविण्यासाठी केंद्र सरकारने संत्र्याच्या निर्यातीलला प्राेत्साहन देऊन 100 टक्के निर्यात सबसिडी द्यायला हवी. एवढेच नव्हे तर, संत्रा उत्पादकांनी अंतर्गत मतभेद विसरून एकत्र येणे तसेच एक प्रबळ दबागट निर्माण करून संत्र्याच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच निर्यात वाढवून ती टिकविण्यासाठी शांततेने आंदाेलन करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्री श्रीधर ठाकरे यांनी व्यक्त केली. राजकीय नेते विराेधात असताना त्यांना संत्रा आठवताे आणि सत्तेत येताच हे सर्व नेते संत्र्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सत्ताधारी सोडा, विरोधी पक्षातील नेतेही लक्ष द्यायला तयार नाही. राज्य सरकारने अलीकडच्या काळात विदर्भात दाेन संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन केले तर एका प्रकल्पाची घाेषणा केली. याचा गाजावाजाही करण्यात आला. हे प्रकल्प गेले कुठे? कळायला मार्ग नाही. याबाबत सरकारकडे शेकडाे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, सरकारने प्रत्येक तक्रार व मागणीकडे मुद्दाम दुर्लक्ष केले आहे. नागपूरचे नेते देश आणि राज्याच्या विकासाबाबत वारंवार भाष्य करतात. स्वत: ऑरेंज सिटी (Orange City) संबाेधल्या जाणाऱ्या नागपूर शहरात राहतात. पण, विदर्भातील प्रमुख नगदी पीक असलेल्या संत्र्याकडे लक्ष द्यायला, संत्रा उत्पादकांच्या समस्या साेडवायला त्यांच्याकडे वेळ नाही. नेत्यांच्या या अनास्थेमुळे नागपुरी संत्रा उद्ध्वस्त हाेत आहे, अशी खंत संत्रा उत्पादक व व्यावसायिक श्री नीलेश राेडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!