Rain forecast : पावसाचा जोर काहीसा कमी होणार अन् नंतर वाढणार!
1 min readया काळात मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र जोरदार पावसाची (Heavy rain) तसेच नाशिक ते कोल्हापूरपर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर या चार जिल्ह्यातील धरणसमूहात जलसंवर्धन होवून धरणसाठा टक्केवारीतही वाढ होवू शकते, असा अंदाज (forecast) माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा नवीन चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकतात. त्यातून कदाचित दोन्ही वेळा त्याचे रुपांतर कमी दाब क्षेत्रात होवू शकते. त्यांच्या वायव्ये दिशेकडील भू-भागावर होणाऱ्या मार्गक्रमणामुळे श्रावणी पोळ्यानंतर म्हणजे शुक्रवार (दि. 15 सप्टेंबर)पासून आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. 23 सप्टेंबर)पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही रविवार (दि. 17 सप्टेंबर) ते शनिवार (दि. 23 सप्टेंबर) दरम्यान ही शक्यता अधिक तीव्र असू शकते.
पहिली चक्रीय वाऱ्याची स्थिती मंगळवार (दि. 12 सप्टेंबर)ला तयार होण्याची शक्यता जाणवते. हे सर्व असले तरी चालू वर्ष हे एल-निनो (El Nino)चे आणि महाराष्ट्रासाठी सप्टेंबर महिन्यातील पाऊस हा सरासरीपेक्षा कमी, या पूर्वानुमानाचाही विसर पडू नये, असेही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे. मूळ जागेवर व जमिनीपासून दिड किमी उंचीपर्यंतच्या जाडीत असलेला मान्सूनचा आस व तोही देशाच्या मध्यावर पूर्व-पश्चिम दिशेत मूळ जागेवर असल्याने दक्षिण छत्तीसगडमधील काही भागात जमिनीपासून साडेसात किमी उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली हाेती, असेही त्यांनी सांगितले.