Giant African Snail : शंखी गोगलगाय व्यवस्थापन एक आव्हान
1 min read✴️ जीवनक्रम
शंखी गोगलगाय साधारणपणे पाच ते सहा वर्षे जिवंत राहते. जीवनक्रम अंडी (एक शंखी गाेगलगाय एकावेळी किमान 80 ते 90 अंडी देते), पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमध्ये पूर्ण होतो.
✴️ सुप्तावस्था
शंखी गोगलगाय हिवाळा हंगामात सुप्तावस्थेमध्ये जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
✴️ प्रसार
शंखी गोगलगायींचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी औजारे, यंत्रसामग्री, वाहने (ट्रॅक्टर, बैलगाडी इत्यादी), शेणखत, विटा, माती, वाळू, रोपे, बेणे, कुंड्या इत्यादी मार्फत होतो.
✴️ नुकसानीचा प्रकार
रात्रीच्या वेळी झाडांच्या पाने व फुलांना अनियमित व मोठ्या आकाराची छिद्र पाडून पानांच्या कडा खातात. काही प्रमाणात झाडांच्या शेंगा, फळे, कोवळ्या सालीवर देखील उपजीविका करून नुकसान करतात. गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेत असते, या अवस्थेत रोपांची शेंडे कुरतडून खातात. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
✴️ एकात्मिक व्यवस्थापन
✳️ गोगलगायीची अंडी हाताने गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून जीवनक्रम नष्ट होईल.
✳️ उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
✳️ फळझाडांच्या खोडाला 10 टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडांवर चढत नाहीत.
✳️ शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने 1 ते 2 फुटाचे चर काढावेत.
✳️ संध्याकाळी व सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात आणि खड्ड्यात पुरून टाकाव्यात किंवा रॅकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.
✳️ गोगलगायी आकर्षित होण्यासाठी गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी ठेवावे. सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा होतील त्या जमा करून नष्ट कराव्यात.
✳️ गोगलगायींना शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी किंवा कॉफीची पूड यांचा 4 इंच लांबीचा पट्टा किंवा राखेचा सुमारे 2 मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी पसरून टाकावा.
✳️ गोगलगायींचे नैसर्गिक शत्रू असलेल्या कोंबडी, बदक इत्यादी भक्षकांचे संवर्धन करावे.
✳️ निंबोळी पावडर, निंबोळी पेंड, 5 टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायी शेतात येण्यापासून परावृत होतात.
✳️ मेटाल्डिहाईड ला पर्याय म्हणून आयर्न (फेरिक) फॉस्फेटचा वापर 2 किलो प्रती एकर या प्रमाणात अमिष म्हणून करता येतो. आयर्न (फेरिक) फास्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित असल्याने त्याचा गोगलगायीच्या व्यवस्थापनाासाठी उपयोग करावा.