krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Soybean yellow mosaic : सोयाबीनवरील येल्लाे मोझॅकचे व्यवस्थापन

1 min read
Soybean yellow mosaic : सध्या परिस्थितीत सोयाबीनचे पीक (Soybean crop) फुलरा अवस्थेत असून, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पिकावर येल्लाे मोझॅक (yellow mosaic) रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या रोगाचे संक्रमण पीक फुलरा येण्याअगोदर झाले असल्यास 90 टक्के उत्पादनात घट होवू शकते. पेरणीनंतर 75 दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. परंतु, 75 दिवसानंतर संक्रमण झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही.

🌐 लक्षणे
सोयाबीन झाडाची हिरवे, पिवळे पाने असलेले रोगट झाड दुरून ओळखता येते. या विषाणूजन्य रोगामुळे (Viral diseases) पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर होतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. तसेच शेंगाचा आकार लहान होऊन दाणे सुद्धा कमी राहतात. पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते.

🌐 राेगाचा प्रसार
हा रोग मुंगबीन येल्लो माेझॅक विषाणू (Mungbean yellow mosaic virus) व मुंगबीन येल्लो मोझॅक इंडिया विषाणू (Mungbean Yellow Mosaic India Virus) या प्रजातीमुळे होतो. विशेष महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव पसरविण्यासाठी पांढरी माशी (white fly) वाहक म्हणून कारणीभूत असते. उष्ण तापमान व दमट वातावरणात विषाणू वाहक पांढऱ्या माशीची अधिक संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच शेतातील पिकाची दाट पेरणी, नत्राची अधिक मात्रा व तणे या बाबीमुळे रोग वाढण्यास व पसरविण्यास मदत होते.

🌐 अनुकूल वातावरण
मागील दोन आठवड्यात पाऊस नसल्यामुळे तसेच प्रखर सूर्यप्रकाश व वाढलेल्या तापमानामुळे या रोगाचा वाहक पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव अधिक व्यापक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी प्रादुर्भाव चालू झालेला आहे. त्यामुळे वेळीच याेग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मध्यंतरी सोयाबीन बियाण्याची कमी पडल्यामुळे रबी किंवा उन्हाळी सोयाबीन पिकाचे बियाणे घरीच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आघाडी घेऊन चांगले उत्पादन मिळविले. परंतु, उन्हाळी सोयाबीन पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी शक्यतो उन्हाळी सोयाबीन पिक घेणे टाळावे.

🌐 येल्लाे मोझॅकचे व्यवस्थापन
✴️ शेतात येल्लाे मोझॅकचा प्रादुर्भाव कमी असून, 3-4 झाडे दिसत असेल तर सतत निरक्षण करणे जरुरीचे आहे.
✴️ येल्लाे मोझॅकचा प्रादुर्भावग्रस्त झाडे उपडून गाडणे गरजेचे आहे.
✴️ जैविक नियंत्रणासाठी 64 पिवळे चिकट सापळे प्रती एकर याप्रमाणे लावावेत.
✴️ शेतकऱ्यांनी शक्यतो उन्हाळी सोयाबीन पिक घेणे टाळावे.
✴️ पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी निंबोळी अर्काची (५ टक्के) फवारणी करावी.
✴️ प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती यांचेकडून प्राप्त माहितीनुसार रस शोषक किडींच्या व्यावस्थानाकरिता अंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. बीटा सायफ्लूथ्रीन 8.49 टक्के प्रवाही अधिक इमिडाक्लोप्रिड 19.81 टक्के प्रवाही 7 मिली किंवा थायोमेथोक्झाम अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन 2.5 मिली किंवा क्लोरॅनट्रीनिलीप्रोल 9.30 टक्के अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.60 झेडसी प्रवाही 4 मिलि यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डॉ. विनोद अ. खडसे
विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!