krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Revolution : आता गरज पुन्हा एका क्रांतीची!

1 min read
Revolution : अनेक दशके देशाच्या लोकसभेत किंवा राज्यांच्या विधानसभेत फक्त गोंधळ केला जातो, हंगामा होतो, सभात्याग होतात, पण चर्चा हाेत नाही. चर्चेशिवाय झालेले निर्णय जनतेवर थोपवले जातात. यासाठी होणारा सर्व खर्च वाया जातो. जनता कर भरून मरते, पण राज्यकर्त्यांना याचे काही देणे घेणे नाही. परत परत निवडून येण्यासाठी हे सर्व करावं लागतं. देश, राज्य, रसातळाला गेला तरी चालेल, पण आपण परत सत्तेत आलो पाहिजे, हाच फक्त सत्ताधारी पक्षाला ध्यास असतो. त्यात मतदारांचा, जनतेचा बळी द्यावाच लागतो हे सर्वमान्य झाले असावे. ही व्यवस्था बदलण्यासाठी पुन्हा एक क्रांती (Revolution) करणे गरजेचे आहे.

✳️ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लाेकप्रतिनिधी
देशाचे पूर्ण राजकारण काही कुटुंबांच्या हातात गेले आहे. काही घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात व सत्तेत आहे. यात सर्व पक्षांचे नेते आहेत. लोकशाही जाऊन राजेशाही व्यवस्था सुरू झाली आहे की काय असा विचार पडतो. भारतातील लोकसभेत व विधानसभेतील लोकप्रतिनिधींपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त आमदार, खासदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खून व बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खेदाची बाब म्हणजे, ही मंडळी अनेक वेळा निवडून येतात. अशा लोकशाहीची तर जनतेने अपेक्षा केली नव्हती.

✳️ पोखरलेला चौथा स्तंभ
लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांकडून सुद्धा फार अपेक्षा राहिल्या नाहीत. सत्य जनते समोर आणण्यापेक्षा टीआरपी केंद्रित माध्यमेच पहायला मिळतात. कोण्या एक विशिष्ट पक्षाची पाठराखण करण्यातच ते धन्यता मानतात. मुख्य मुद्दा किंवा ज्वलंत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याची जबाबदारीच जणू त्यांना दिली आहे. निर्भीड व सडेतोड पत्रकाराला ते मध्यम सोडून देण्यास भाग पडतात. स्वतःचे यु ट्यूब चॅनल काढून मत प्रदर्शित करण्याची वेळ त्यांच्यावर आणली आहे. अशा परिस्थितीत समाज मध्यमांची जबाबदारी वाढते, पण त्यात ही विविध पक्षांनी कामाला लावलेल्या पगारी झुंडी फेक न्यूज व विरोधकांच्या बनावट, विकृत पोस्ट तयार करून टाकत असतात. सामान्य नागरिकाला नेमके खरे काय अन् खोटे काय हे समजणे मुश्किल झाले आहे.पण हेच एक मध्यम आता काही प्रमाणात जनतेच्या हातात आहे. याचा योग्य वापर झाला तरच क्रांती घडू शकते.

✳️ भेदभाव आणि जळता देश
सत्तेत राहण्यासाठी समाजात फूट पडून सत्ता मिळवणे व सत्तेत रहाणे हे सर्वच राजकीय पक्षांचे धोरण असते. काही कोणाचे लांगूलचालन करतात, काही तुष्टीकरण करतात, काही द्वेष भावना निर्माण करतात. यात समाजात भेदभाव निर्माण होऊन एक भीतीचे वातावरण तयार होत असते. सुरक्षिततेसाठी प्रत्येक जातीचे, धर्माचे लोक आप आपल्या कळपात घुसून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत असतात. यातून समाजाचे ध्रुवीकरण व मतांचे ध्रुवीकरण होत असते. हेच या मंडळींना हवे आहे. सध्या धुमसत असलेले मणिपूर याचे ताजे उदाहरण आहे. दोन महिन्यानंतर समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला तो एक व्हिडीओ हे फक्त हिमनगाचे टोक आहे. असे याच्यापेक्षाही भयंकर अपराध तेथे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दंगेखोरांना हत्यारे पुरवली जातात, दंगे रोखण्यासाठी सरकार काही कठोर पावले उचलत नाही, गुन्हे दाखल होत नाहीत, ही फारच गंभीर बाब आहे. मणिपूर जळते आहे, आता हरियाणा पेटले आहे, उद्या कदाचित आपला महाराष्ट्र? महापुरुषांवर गरळ ओकून असंतोष निर्माण केला जातोय, का? हे वेळीच रोखले पाहिजे, नाहीतर पूर्ण आयुष्य दहशतीखाली जगावे लागेल व पुढची पिढी अपराध्यांच्या गुलामीत जगेल. आताच सावध होऊ या. एक राजकीय क्रांतीची तयारी करू या.

✳️ क्रांती होऊ शकते!
प्रस्थापित भ्रष्ट व अजागळ व्यवस्था बदलण्यासाठी आता खरंच एका क्रांतीची (Revolution) गरज आहे. देशात अनेक वेळा सत्ता बदल झाले व प्रत्येक वेळेला छोटी मोठी क्रांती घडली आहे, ते आता सुद्धा परत घडू शकते. भारतावर दीडशे वर्षं सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांना स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीनंतर देश सोडावा लागला. अनेक दशके एकमुखी सत्ता भोगलेल्या काँग्रेसला 1977 साली सत्ता सोडावी लागली. सत्तेत आलेल्या विरोधकांतील बेबनावामुळे पुन्हा सत्तेत आलेल्या काँग्रेसला बोफोर्सच्या मुद्द्यावर सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एक रथ यात्रा लाट तयार करू शकते. एक अण्णा आंदोलन सत्तापालट करू शकते. आता ही हे परत घडू शकते. गरज आहे प्रामाणिक नेतृत्वाने पुढे येण्याची! हिंमत दाखवण्याची व जनतेने या प्रामाणिक उमेदवारांना निवडून देण्याची!! पुन्हा एकदा विचारधारेवर निवडणूक लढू या. देशातील जनतेला योग्य शिक्षण, सुरक्षा, न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य, जळत्या देशातील भयग्रस्त जनतेला सुखी समृद्ध व निर्भय जीवन जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करू या. यासाठी, ज्यांनी सिद्ध केले आहेत की ते भ्रष्ट आहेत, समाजकंटक आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना पुन्हा मतदान न करण्याचा, निवडून न देण्याचा संकल्प करायला हवा. हे साध्य करण्यासाठी काही रक्तरंजित क्रांतीची गरज नाही. फक्त योग्य व्यक्तीला सत्तेत पाठवण्याची गरज आहे. देशातील सर्व नागरिकांच्या, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताचे धोरण राबविणाऱ्या पक्षाच्या, विचाराच्या व्यक्तींना निवडून द्यायची आवश्यकता आहे. हिंमत दाखवायची आवश्यकता आहे. हे नाही करता आलं तर तुमच्या विद्ववत्तेला, शिक्षणाला काही अर्थ नाही. देशाच्या अधोगतीला व तुमच्या पुढच्या पिढीच्या गुलामीच्या जगण्याला तुम्हीच जबाबदार असाल, हे लक्षात असू द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!