Leopard Restaurant : बिबट्याचं रेस्टॉरंट
1 min readज्यांचा कुत्रा बिबट्यानं मारला त्यांच्याशी चर्चा करून आम्ही माहिती घेतली. घरचं पाळीव जनावर गेल्यानं घरातली मंडळी शोकाकुल होती. खास करून त्या घरातली मुलगी. एकंदरीत रात्रीच्या वेळी ओट्यावर कुत्रा बांधलेला असताना बिबट्यानं त्याची शिकार केली होती. कुत्रा बांधलेला असल्याने बिबट्याला शिकार उचलून नेता आली नसावी. घरची लोकं खूप संतापली होती. वनविभागाला त्वरित बिबट्या पकडून नेण्यासाठी त्यांनी सांगितले. त्यावेळी कोणी काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत, म्हणून मीही त्यांना फार काही सांगत न बसता प्राथमिक माहिती घेऊन पुढे काय करता येईल, यासाठी वनविभागाशी चर्चा करत होतो.
कुत्रा परदेशी प्रजातीचा होता, शिवाय घरातल्या लोकांचा त्याच्यावर जीवही खूप होता. त्यामुळे मी वनविभागाला नुकसान भरपाई द्यायला सूचना करत होतो. परंतु, पाळीव गुरे ढोरे मेल्यावरच नुकसान भरपाई देता येते, त्यात पाळीव कुत्र्याची तरतूद नसल्यानं नुकसान भरपाई देता येणार नाही, असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं. परंतु, वनविभागाने पंचनामा करताना कुत्र्याऐवजी वासरू दाखवून एखादे जुने फोटो वापरून नुकसान भरपाई द्यावी, असे माझे मत होते. कारण हे प्रकरण लगेच संपणार असं दिसत नव्हं., त्यात नुकसान भरपाई न मिळाल्याने या घरातील लोकं गावातील इतर लोकांना भडकवतील आणि पुढील गोष्टी अडचणीच्या होतील असं माझं ठाम मत होतं.
शेवटी तेच झालं, दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही कॅमेरा ट्रॅप बसवायला गेलो, तेव्हा गावकरी खूप संतापले होते. कारण बिबट्याचे ठसे गावात काही लोकांच्या गोठ्या भोवती दिसत होते. कदाचित रात्री बिबट्या इथेच घुटमळत असणार, ज्यामुळे गावकरी अधिक संतापले. त्यांची भीती देखील रास्त होती. कारण गावात जेमतेम 10-15 घरे आणि प्रत्येकाच्या वाड्यात 8-10 दुभती जनावरे, कोंबड्या होत्या. बहुतांशी लोकांचा दुधाचा धंदा असल्यानं पहाटे 4 वाजता उठून दूध काढणे आणि मग सकाळीच ते विकायला जाणे, असा बहुतांशी लोकांचा दिनक्रम. अशावेळी अंधारात कुठून बिबट्यानं हल्ला केला तर आम्ही काय करायचं? आज हल्ले कुत्र्यावर होतात, उद्या माणसांवर होणार नाही, याची तुम्ही काय शास्वती देणार? आमची लहान लहान मुल सकाळी शाळेत जातात. बिबट्यानं हल्ला केला तर कितीला पडेल? तुम्ही गेलेला जीव परत आणून देणार का? आधी त्या बिबट्याला पकडा, असा सर्व गावकऱ्यांचा सूर होता.
बिबट्या पकडून प्रश्न सुटणार नाहीत. बिबटे सहसा माणसावर हल्ले करत नसतात. शिवाय, बिबटे पकडण्याआधी तो खरच उपद्रवी आहे का? त्याच्यापासून कोणाला धोका होईल अथवा नाही, याची चाचपणी करावी लागते. कारण कधी कधी बिबट्या पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडल्यानंतर देखील ते पुन्हा त्यांच्या अधिवासात येतात. शिवाय, आपण एका ठिकाणचा बिबट्या दूर कुठे तरी बोरिवली नॅशनल पार्क सारख्या ठिकाणी नेऊन टाकू शकत नाहीत. कारण तसे केल्यास त्या ठिकाणचा मूळ स्थानिक बिबट आणि बाहेरून आणून सोडलेला बिबट यांच्यात हद्दीसाठी भांडण होतं आणि जो सक्षम असेल, तो अधिवास काबीज करतो. त्यानंतर नबळा बिबट जंगलापासून लांब मानवी वस्ती जवळ रहायला सुरुवात करतो. अशावेळी लोकवस्ती जवळची भटकी कुत्री त्याची भूक भागवत असतात.
2000 साली नॅशनल पार्कमध्ये कित्येक लोकं बिबट्याच्या हल्ल्यात मारली गेली होती. हे हल्ले बहुतांशी बाहेरून आणून सोडलेल्या बिबट्यांनी केले असल्याचं निष्पन्न झालं होतं, त्यामुळे बिबट्या पकडून दुसरीकडे सोडणे हा इलाज नसून, एकीकडला प्रश्न दुसरी कडे पाठवणे आणि त्यात साध्यासुध्या प्राण्याला नरभक्षक बनवणे आहे. म्हणून आपण बिबट्यासोबत राहणे शिकले पाहिजे आणि थोडी खबरदारी बाळगली पाहिजे. जसे की, आपली जनावरे संध्याकाळ होण्याआधीच बंदिस्त गोठ्यात ठेवली पाहिजेत. कोंबड्या रात्री झाडावर न ठेवता झापाखाली झाकून ठेवल्या पाहिजेत. रात्री अगर पहाटे घराबाहेर शौचाला न बसणे, शक्य नसल्यास सोबत कोणाला तरी घेऊन जाणे, लहान मुलांना संध्याकाळी मावळतीच्या वेळेला बाहेर न सोडणे, असे महत्त्वाचे उपाय सांगून आम्ही कॅमेरा ट्रॅप बसवून निघून आलो.
दुसऱ्या दिवशी वनविभाग फटाके घेऊन गावात पोहोचले. त्यांनी बिबट्या येऊ नये म्हणून संध्याकाळच्या वेळी फटाके फोडायला सांगितले. असं करत दोन तीन दिवस गेले असतील, तोच पुन्हा एकदा बिबट्या गावात आला आणि यावेळी तो गावातील पहिल्याच घराच्या मागील गोठ्यात गुरांच्या मधे बसला होता. पहाटे 4 च्या सुमारास त्याला गावकऱ्यांनी पाहिलं. आता मात्र गावकरी भलतेच संतापले होते. बिबट्याला पकडण्यासाठी जिथून तिथून राजकीय दबाव आणणे सुरू झाले. आम्ही समजवायला गेलो तर आमचं कोणी ऐकेच ना. उलट गावकरी आमच्यावर संतापले. त्यातील एक जण मला म्हणाला, आम्ही इथे जीव मुठीत घेऊन राहतोय, तुम्हाला काय जाते ऑफिसमध्ये बसून भाषण करायला. प्रत्यक्षात बघा, तुम्ही कधी बिबट्यावर काम तरी केलं आहे का? आता मात्र धीर सुटत चालला होता.
मी बिबट्या पुन्हा पुन्हा गावात येतो, या मागे काही निष्कर्ष काढला होता. मागे केळीच्या बनात मला बिबट्याचे दोन आकाराचे ठसे मिळाले होते. त्यात एक ठसा पूर्ण वाढ झालेल्या मादीचा आणि दुसरा ठसा किशोरवयीन बिबट्याचा असावा, असा माझा संशय होता. कदचित मादी किशोरवयीन बिबट्याला शिकार शिकवत असेल, ज्यामुळेच हा नेमक्या बांधलेल्या जनावरांना शिकार बनवत असावा, असा अंदाज बांधत मी केळीच्या बनात जिथे ठसे मिळाले, त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवला. दुसऱ्या दिवशी आम्ही गावात पोहोचलो. वाढत्या जनप्रक्षोभामुळे वनविभागाने गावात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा आणून ठेवला होता. परंतु, बिबट्या पकडू नये, असे माझे ठाम मत होते. कारण तसे केल्याने गावकऱ्यांच्या जीवाला धोका अधिक वाढला असता. कारण जर पिंजऱ्यात किशोरवयीन बिबट्या न सापडता त्याची आई सापडली तर, त्या बिबट्याचं शिकारीच प्रशिक्षण अपूर्ण राहील, ज्यामुळे त्याला नीट शिकार करता येणार नाही. अशावेळी जर त्याची आई सोबत नसेल तर शिकार मिळणे कठीण आणि त्यातून किशोरवयीन बिबट्या भुका राहील. परिणामी तो सहज मिळणारं सावज म्हणजे माणूस आणि गावात माणसांवर एका मागून एक हल्ले करणारा नरभक्षक आपणच तयार करू. म्हणून घाई न करता सर्व पाऊले उचलून पुढे जाणं गरजेचं होतं.
अशावेळी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांचे योग्य लोकं शिक्षण घडवून आणणे अत्यंत गरजेचं होतं. म्हणून वनविभागाने डहाणू येथील Rescue टीमला देखील पाचारण केले. मग मी आणि रेमंड आम्ही दोघांनी बिबट्या लोकं वस्तीमध्ये का येतो? ते सांगायला सुरुवात केली. दरम्यान, लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही रात्री गस्त घालू, असे देखील सांगितले. शिवाय, त्या गावचा जावई म्हणजे आमचा सत्यन दादा. तोही मदतीला आला. दादा आणि मी फार वेळापासून एकमेकांना ओळखत होतो. शिवाय, दादाला मी वन्य जीवनावर फार काळ काम करत आहे, हे देखील माहीत असल्याने त्यानी गावकऱ्यांना माझ्याबद्दल सांगितलं. आता गावकरी थोडे शांत झाले. मग मी आणि सत्येनदादा कॅमेरा ट्रॅप बसवून रात्री गावात गस्तीला यायचं ठरवलं.
ठरल्याप्रमाणे जेवणं करून मी, सत्येनदादा, योगेशदादा आणि प्रथमेश गावात पोहोचलो आणि वन्य प्राण्यांच्या गप्पा रंगल्या. आम्ही गप्पा टाकत टाकत गाव फिरत होतो. कुत्री आम्हाला पाहून दुरून भुंकत राहायची. त्यामुळे एक दोघांनी आम्हाला 11 वाजताच्या सुमारास गावात गस्त घालताना पाहिलं. कुत्र्यांचा आवाज सोडला तर गावात भयाण शांतता. एक दोन घरांच्या मागे बाभळीच्या झाडावर 20-25 कोंबड्या झोपल्या होत्या. प्रत्येक घरी गुरंढोरं, अंगणात झाडावर झोपलेल्या कोंबड्या, जणू काही गावकऱ्यांनी बिबट्यासाठी रेस्टॉरंटच (Restaurant) उघडलं होतं. गावकरी आम्हाला नेहमी म्हणात आमच्याच गावात का बिबट्या येत राहतो? याच उत्तर मी झाडावर पाहत होतो.
फिरत फिरत आम्ही रस्त्यावरच्या विजेच्या तारांवर पाहिलं तो ठिपक्यांचे घुबड जोडीजोडीनं बसले होते. प्रत्येक जोडी एक दिवा राखून होती. दिव्याच्या उजेडावर आकर्षित होणारी कीटक खात अधेमधे आम्हाला पाहत, हे इथून तिथे उडत होते. त्यांना पाहत अधेमधे गस्त घालत रात्र उलटून गेली. दादा आणि मी 6 वाजता घरी आलो. पटपट अंघोळी आटपून कामावर जायची लगबग सुरू झाली. (क्रमश:)