krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

The march of prosperity : समृद्धीचे महामार्ग आणि पाऊलवाटांचे संतुलन!

1 min read
The march of prosperity : गेल्या काही वर्षात देशात रस्ते बांधणीची कामे वेगाने सुरू असून, ती पूर्ण होत आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण! चारही दिशांना चारपदरी, सहापदरी रस्ते. उड्डाण पूल, भुयारी रस्ते. कुणीतरी मा. नितीन गडकरी साहेबांना 'रोडकरी' हे अतिशय सार्थ टोपणनाव दिलं होतं. 40-45 वर्षांपूर्वी रस्ते एकेरी डांबरी असायचे. रस्त्यावरचे खड्डे हा‌ विनोद, व्यंगचित्रांपासून उपोषण, आंदोलनापर्यंतचा विषय होता. प्रत्येक गावाला, प्रत्येक रस्ता 'लोकप्रतिनिधीं'च्या कृपेने होतो. तोही विषय बोचऱ्या विनोदांचा, ) आरोपांचा, चौकशी आणि निषेध चर्चांचा असतो.

पुन्हा खड्डे आणि रस्त्यांचे समीकरण
आमच्या खेड्याला राज्यमार्गाशी जोडायला 5 किमीच्या रस्त्याचे सर्वेक्षण सात वर्षे होत होते. बहुतेक सगळ्याच गावांत अगदी शहरातही शहराचे आतले रस्ते अजूनही खेड्यातल्या रस्त्यांची‌ आठवण करून देतात. बुद्धीबळाच्या पटावरच्या चौकोनासारखे खड्डे आणि रस्ता, एक आड एक असतात. त्या रस्त्यावरून खड्डे चुकवत जायला प्रखर बुद्धिमत्ता लागते. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी भरल्यावर तर‌ बुद्धीचा कस लागतो. पावसाळ्याआधी रस्ते तयार होतात. त्यावर मुली बोटांना नेलपेंट लावतात, तितके पातळ डांबर‌ पसरवले जाते. ते पहिल्याच पावसात वाहून जाईल, याची खबरदारी घेतली‌ जाते. मग पुन्हा खड्डे आणि रस्ता यांचे समीकरण मांडले जाते.

🌐 इंग्रजांनी दिला वाहतुकीला वेग
समृद्धी महामार्गावरचा प्रवास मात्र रहदारीचे नियम पाळून‌ केला तर खरंच अतिशय सुखावह असतो. ‘दळणवळण’ या गमतीशीर शब्दाचा खरा अर्थ वाहतूक. आजच्या गतीप्रिय समाजाला समृद्धी महामार्ग हे वाहतुकीसाठी वरदान आहे. फक्त या महामार्गावरून कुणाची, कशाची आणि कुठे वाहतूक‌ होते, हे जरा लक्षात घेतले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश राज्यकर्ते आणि त्यांच्या चाकरांच्या टोलेजंग इमारती असलेल्या वसाहती. बाकी प्रजेच्या‌, रयतेच्या वस्त्या. वस्त्या वाड्यातून, खेड्यापाड्यातून शेतमाल, महसूल आणि मजुरांचा ओघ खेड्याकडून शहरांकडे सुरू झाला. तेव्हा खेड्यातले रस्ते म्हणजे पाऊलवाटा किंवा खाचर रस्ते. शेतमाल बाजारपेठेत न्यायला बैलगाडीचा वापर होता. एकूणच दळणवळण, वाहतूक संथ आणि शांत होती. इंग्रजांनी भारतातील लाकूड आणि कापूस लुटण्यासाठी रेल्वे रूळ अंथरले. त्यावरून रेल्वेगाड्या धावू लागल्या. वाहतुकीला थोडा वेग आला.

🌐 तलवार, तराजू, नांगर आणि पुस्तकी शिक्षण
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे फक्त राज्यकर्ते बदलले. गोरे जाऊन काळे आले. जानेवारी 1950 ला‌ संविधान लागू‌ झालं. 1951 साली पहिली घटना दुरुस्ती‌ झाली. 2018 पर्यंत एकूण 104 घटना दुरुस्त् करण्यात आल्या. पण, कृषीविषयक धोरण मात्र आजतागायत जसंच्या तसंच राहिलं. पूर्वी तलवार, तराजू आणि नांगर ही उपजीविकेची साधनं होती. इंग्रजांनी‌ चतुराईने तलवार आणि तराजू‌ आपल्या‌ हातातून काढून‌ घेतले आणि जास्त चतुराईने पुस्तकी शिक्षणाचा खुळखुळा आपल्या‌ सगळ्यांच्या हातात‌ दिला. शिकलेल्यांना कारकुन मास्तरांच्या नोकऱ्या‌ दिल्या. वसुलीचे ‌अधिकारही दिले. वसुली‌ मात्र स्वत:कडेच ठेवली. नोकरीमुळे पगाराची‌ हमी मिळाली. आजही तलवार म्हणजे कायदा आणि तराजू‌ म्हणजे व्यापार सरकारने आपल्याच अधिकारात ठेवला आहे आणि पुस्तकी शिक्षणाचा खुळखुळा जास्तच खुळखुळता‌ ठेवला आहे. त्यामुळे‌ खेड्यात राहणारी तरुण पिढी गावाकडच्या पाऊल वाटांवरून शहरांच्या महामार्गाकडे वेगाने धावत सुटली आहे. खरे तर, या पाऊलवाटाच‌ महामार्गाला समृद्धी‌ देत‌ आहेत. पण, पाऊलवाटांवरून धावणाऱ्या त्या पावलांची महामार्गाला जाणही नाही. महामार्गावरून धनवंतांच्या दुचाकी, चारचाकी पैशाची चाके लावून गरगरत‌ आहेत. महामार्ग शहरांकडून शहरांकडेच ‌जाणार. वेग हे महामार्गाचं वैशिष्ट्य. म्हणूनच सगळ्यांना त्याचं आकर्षण‌ आहे. त्यामुळेच समृद्धीचा, संपत्तीचा ‌प्रवासही अतिशय वेगाने होत आहे.

🌐 लक्ष्मीचा मुक्त‌संचार मंदावला
समृद्धीच्या‌ (Prosperity) बाबतीत ही वाहतूक एकेरीच आहे. समृद्धीचा असा ‘वन वे ट्राफिक’ किती दिवस चालणार? समृद्धीला स्थैर्याची‌ जोड हवी असेल तर, समृद्धी सर्वांची आणि‌ मुक्त असावी‌ लागते. भारतीय समाजमनात समृद्धीचं प्रतीक आहे ‘लक्ष्मी’ चंचलता, चपलता हा लक्ष्मीचा‌ सहज स्वभाव मानल्या जातो. समृद्धी‌ एकाच ठिकाणी साचून राहिली तर लक्ष्मी अपगामिनी होते, असे संकेत आहेत. श्री – सूक्तात‌ अनपगामिनी लक्ष्मीची इच्छा आणि आवाहन आहे. अपगामिनी म्हणजे अधोगतीकडे जाणारी, नेणारी. साचलेल्या संपत्तीवर‌ तरंगणारी बाळे स्वत: अधोगतीला जातात, इतरांनाही नेतात, हे ‌आपण बघतोच. म्हणजे‌ समाजाच्या सर्व स्तरात संपत्ती झिरपली (Wealth permeated) पाहिजे. आधुनिक अर्थशास्त्रही‌ हेच सांगते. पैसा जितका जास्त‌ फिरेल जितक्या जास्त हातातून फिरेल‌, तितकी अर्थव्यवस्था स्थिर असते. पण आज‌ मात्र लक्ष्मीचा मुक्त‌संचार नाही. ठराविक ठिकाणी तिला कोंडून‌‌ ठेवले आहे, असे दिसते. महामार्गासाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करताना ‘शेती’ला लागलेले ग्रहण सुटले असते तर पाऊलवाटांवरच्या पावलांनी जास्त दमदारपणे वाटचाल केली असती.

🌐 स्थलांतर‌ थांबण्याऐवजी वाढले
पाऊलवाटांवरून शहरात दाखल झालेल्या काही जणांची पुन्हा गावाकडे परतायची इच्छा असते. पण समांतर महामार्गांचा चार पदरी, सहा पदरी चक्रव्यूह त्यांना‌ भेदताच येत नाही. मग महामार्ग ज्या‌‌ शहरात पोचवेल, त्या शहराच्या‌ कानाकोपऱ्यात‌ ते‌ वस्ती करतात. शहरात उच्चभ्रूंच्या वसाहती वाढतात आणि कोपऱ्या कापऱ्यातल्या वस्त्या‌ सुद्धा. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी‌, थांबवण्यासाठी तत्कालीन‌ मुख्यमंत्री मा. वसंतराव‌ नाईक यांनी 1972 मध्ये एक योजना‌‌ आणली होती. 1977 मध्ये‌‌ या योजनेसाठी कायदा करण्यात आला. त्या योजनेतही रस्तेबांधणी‌ हा महत्त्वाचा‌ बिंदू होता. अस्मानी सुलतानीने गांजलेले 40-40 एकरांचे‌ मालक रोजगार‌ हमी योजनेत टिकास फावडे घेऊन हजर‌‌ झाले. त्याला ‌आता 46 वर्षे झाली, स्थलांतर‌ सुरूच आहे. थांबले तर नाहीच, उलट‌‌ जास्त वेगाने होऊ लागले. अक्षरश: कोट्यवधी‌ लोकांनी स्थलांतर केले. आता अनेकांच्या मनातल्या परतीच्या वाटाही पुसून गेल्या आहेत. त्यांचेच‌ अनुकरण‌ करत पुढच्या तरुण पिढ्या समृद्धीच्या आशेने महामार्गावर दाखल होत आहेत. हजारातला एकटा दुकटा समृद्ध झाला. त्याला वसाहतीत रहिवास मिळाला. बाकी 999 कोनाकोपऱ्यात!

🌐 समृद्धीच्या आशेने शहरांकडे
समृद्धांच्या वसाहतींजवळच्या वस्त्यांमधले‌ सगळे‌‌ कष्टकरी‌, हातावर पोट‌ असणारे! हमाल, गवंडी, टॅक्सी आणि रिक्षा ड्रायव्हर, कंडक्टर‌, संस्था आणि संस्थानांमधले सुरक्षा‌ कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, हातगाडीवाले,भाजीपाला व फळ विक्रेते, सलून चालवणारे, इस्त्री करून देणारे, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मुली, कापड दुकान, किराणा दुकान, दारू दुकान, औषधी दुकान, गॅरेजेमध्ये‌ काम करणारे‌, बाजारपेठेतल्या वेगवेगळ्या दुकानांत काम करणारे नोकर, घरगडी, मोलकरणी, नर्सेस, वॉर्ड बॉईज, चहापानाच्या टपऱ्यावाले, खर्रा, गुटखा, सुपारीवाले, कॅटरिंग व्यवसायातील नोकरवर्ग, बिछायत केंद्रात काम करणारे, इलेक्ट्रिशियन्स, टेलरिंग व्यवसायातील लोक, खासगी शाळांमधून कमी पगारावर काम‌ करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, शहरात घर करून खेड्यापाड्यात जाऊन येऊन नोकरी करणारे जिल्हा परिषद कर्मचारी, सगळेच पिढीजात शेती सोडून समृद्धीच्या आशेने महामार्गावरून शहरात दाखल झाले आहेत. नागरी सुखवस्तू वसाहतीत रहिवास मिळवण्याच्या आशेने, इच्छेने हजारो तरुण तरुणी शेतीकडे निकराने पाठ फिरवून दरवर्षी याच जथ्यात सामील होत आहेत. या सगळ्यांना सामावून घेणं शहरांनाही कठीण झाले आहे. शहरे सुजत फुगत चालली आहेत. त्यांच्या‌ सीमा, त्यांच्या हद्दी एकमेकात गुंतल्या गेल्या आहेत. प्रत्येक श्रीमंत वसाहतीच्या आड एक झोपडपट्टी पसरली‌ आहे. या असंतुलनाने आता सगळेच समाज जीवन संत्रस्त‌ झाले आहे.

🌐 आर्थिक असंतुलनातूनच इतर असंतुलनांचा जन्म
रस्त्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो. एकदा जंगलात फिर फिर फिरून वाट चुकलेल्या सरदाराने एका कुटीतल्या साधूला विचारले, ‘महाराज हा रस्ता कुठे जातो?’ साधू म्हणाला, ‘रस्ता कुठेच जात नाही. अनेक वळणांच्या‌ रस्त्यांवरून मनाचे योग्य संतुलन राखणारे नक्कीच इच्छित स्थळी जातात.’ या महामार्गांचेही तसेच आहे. प्रचंड लोकसंख्या या मार्गांवरून मार्गक्रमण, अतिक्रमण आणि आक्रमणही करत असते. त्या लोकसंख्येचे असंतुलन आपल्या निष्काळजीपणाने झाले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या‌ प्रचंड जनसमूहाचे गंतव्य स्पष्ट हवे. भरकटलेला पांथस्थ कुठेही जाऊ शकतो. त्याला भूल पडू‌ शकतेकिंवा पाडली जाऊ शकते. तो एकटा असला तरी आणि समूहात असेल तर सगळ्या समूहालाच कुणी चुकीच्या मार्गाने‌ नेऊ शकतो. आर्थिक असंतुलनातूनच‌ इतर असंतुलने तयार होतात. सगळ्या प्रकारच्या‌ असंतुलनांचा धोका टाळण्यासाठी रस्ता‌ चुकू शकणाऱ्या‌ कोट्यवधी तरुणांसाठी महामार्ग आणि पाऊलवाटा यावरून समृद्धीचे‌ येणे आणि जाणे सुद्धा नियमीत हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!