Citrus Psylla Management : ‘सिट्रस सायला’चा प्रदुर्भाव व व्यवस्थापन
1 min read✴️ डाफोरीना सिट्री (सायलीडी : हेमीप्टेरा) किडीची ओळख
डाफोरीना सिट्री (Diaphorina citri) (सायलीडी – Psyllid : हेमीप्टेरा-Hemiptera) ही कीड सायला (Psylla) नावाने ओळखली जाते. या किडीची अंडी पिवळ्या रंगाची, बादामाच्या आकाराची, 0.3 मि.मि. लांब असून, ही कीड नवतीच्या हंगामात अर्धवट पानाच्या गुंडाळीमध्ये किंवा कळ्यांमध्ये अंडी घालते. या किडीची प्रथमावस्थेतील पिल्ले 0.3 ते 0.45 मि.मि. लांब, हिरवट नारंगी रंगाची व नंतरच्या अवस्थेतील 1.0 ते 1.6 मि.मि. लांब व पिवळ्या – नारंगी रंगाची तसेच लाल डोळ्यांच्या रंगाची असतात. प्रौढ कीड 3 ते 4 मि.मि. लांब ठिपकेदार, भुऱ्या रंगाचे व पारदर्शक पंखाचे असतात. रस शोषण करताना या किडीचे डोके पानाच्या पृष्ठभागालगत तसेच मागील भाग किंवा शरीर व वरच्या दिशेने झुकलेले असतेत्र ही कीड पानाच्या पृष्ठभागापासून 45 डिग्री अंशाचा कोन तयार करते. सायला किडीचा जीवनक्रम 15 ते 45 दिवसांमध्ये पूर्ण होतो.
✴️ नुकसानीचे स्वरूप
या किडींची पिल्ले व प्रौढ संत्रा (Orange) व माेसंबीच्या (Sweet Lemon) झाडांचे कोवळे शेंडे, पाने आणि कळ्यांमधील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने मुरडली जातात, गळतात व शेंडे वाळतात. पिल्ले मधासारखा चिकट, गोड व पांढरा पदार्थ स्त्रावित करतात, ज्यावर काळी बुरशी (Black fungus) झपाट्याने वाढते. या बुरशीच्या थर पानांवर व फांदीवर दिसून येतो. त्यामळे पानांची प्रकाश संश्लेषणाची (Photosynthesis) क्रिया मंदावते. प्रादुर्भाव जास्त आढळल्यास फळधारणेवर सुद्धा परिणाम होतो. सायला किडीमुळे ‘ग्रीनिंग’ (Greening) जीवाणूचा (Bacteria) प्रसार होते. त्यामुळे शेंडेमर रोग झपाट्याने वाढतो.
✴️ किडींचा सक्रीय काळ
ही कीड संत्रा व माेसंबीच्या नवतीच्या काळात म्हणजेच वसंत ऋतूत अर्थात मार्च-एप्रिल आणि पावसाळ्यात (वर्षा ऋतू) जुलै-ऑगस्टमध्ये कोरड्या कालावधीत सक्रीय असते.
✴️ कीड व्यवस्थापन
✳️ सेंद्रीय लागवडीतील उपाय
❇️ कीडग्रस्त व वाळलेल्या फांद्या काढून घ्याव्यात आणि झाडाचा घेर प्रमाणात ठेवावा, ज्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचू शकेल.
❇️ संत्राबागेत किंवा आजूबाजूला गोड लिंबाची झाडे नसावीत. कारण ही झाडे सायला किडीचे खाद्य असून, प्रजननाचे फार मोठे स्त्रोत ठरू शकते.
❇️ खताचा व पाण्याचा वापर नियंत्रित ठेवावा, ज्यामुळे झाडांना येणारी नवीन पालवी नियंत्रणात ठेवता येईल.
❇️ नवजातीच्या हंगामात पेट्रोलियम स्प्रे ऑईल (मॅक ऑल सीझन हॉर्टीकल्चरल मिनरल ऑईल) 2 टक्के किंवा अझॅडिरॅक्टीन (1 टक्का) 3.7 मि.लि. नीम सोप किंवा पोंगामिया (करंज) 5 ग्राम प्रति लिटर पानकळ्या उमलण्याच्या वेळी किंवा या किडीचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
❇️ नवतीच्या हंगामात मॅलाडा डेसजारेडन्सी (Malada Desjardinsi) या मित्र किटकाच्या 30 अळ्या प्रतिझाड दोन वेळा सोडल्याने सायला किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
✳️ रासायनिक उपाययाेजना
❇️ या किडीचा प्रार्दुभाव लक्षात येताच थायमेथोक्झाम 0.3 ग्राम किंवा इमिडाक्लोप्रिड 0.5 मिलि. किंवा अॅसीफेट 1.0 ग्राम किंवा क्विनाॅलफॉस 10 मि.ली. किंवा डायमेथोएट 2.0 मि.लि. किंवा नोव्हॅलुरॉन 0.55 मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
❇️ ही कीड कळ्यातून व बारीक नवीन फांद्यातून रस शोषण करते. परिणामी, कळ्यांची वाढ न होता त्या गळून पडतात. या किडीच्या नियंत्रणाकरिता नागपुरी संत्र्याला नवीन नवती आल्यानंतर नीम तेल 100 मि.ली./10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
❇️ नीम तेल पाण्यात मिसळत नसल्यामुळे 10 ग्राम डिटर्जंट पावडर प्रती 100 मि.लि. नीम तेलात मिसळावे किंवा थायोमेथोक्झाम 25 डब्ल्यू.जी. 1 ग्राम/10 लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही 1.5 मि.लि. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✴️ सिट्रस ग्रीनिंग (मंद ऱ्हास) रोगाची लक्षणे
सिट्रस ग्रीनिंग (Citrus Greening) रोगग्रस्त पानांच्या शिरा पिवळसर पडून पाने झिंक अन्नद्रव्याची कमतरता असल्यासारखी दिसतात. रोगाची तीव्रता अधिक झाल्यास पानाचा काही भाग हिरवा राहून बाकी भाग पिवळा पडतो व फांद्या मृत झाल्यामुळे झाड विरळ दिसते. रोगग्रस्त नवीन पाने लहान, उभट व पिवळी दिसतात. रोगग्रस्त फळे आकाराने लहान, कुरुप, चवीला कडू व निम्नदर्जाची असतात. अशा फळातील बीज निर्जीव असतात.
✳️ रोगाचा प्रसार
❇️ ग्रीनिंग हा रोग कॅन्डीडेंटस लिबेरीबॅक्टर एशियाटीकस (Candidatus Liberibacter asiaticus) या जीवाणूमुळे (Bacteria) उद्भवतो. हा जीवाणू झाडातील अन्नपुरवठा करणाऱ्या ऊतींमध्ये राहतो.
❇️ नवीन कलम तयार करताना हा रोग संसर्ग झालेल्या बडवूडपासून (कांडीपासून) पसरतो. बगीच्यामध्ये असणाऱ्या सिट्रस (डायफोरिना सिट्री-Diaphorina citri) या किडीमुळे प्रसार होण्यास मदत होते.
❇️ सिट्रस ग्रीनिंगचे अचूक निदान करणे ही फार महत्त्वाची बाब आहे. यासाठी मोसंबी या सूचक झाडाचा वापर जैविक अनुक्रमणिका (बायोलॉजिकल इन्डेकसिंग-Biological Indexing)मध्ये केला जातो. याव्यतिरिक्त अधिक अचूक व संवेदनशील निदानाकरिता पीसीआर (पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन – Polymerase chain reaction) या आण्विक तंत्राचा वापर केल्या जातो.
❇️ या रोगाचे जीवाणू संपूर्ण झाडांमध्ये राहतात. पण रोगाची सर्वोत्तम लक्षणे हिवाळ्यात (डिसेंबर-मार्च) दिसतात.
✴️ व्यवस्थापन
❇️ रोगमुक्त रोपवाटिकेत रोपे व कलमे तयार करणे व कलम कांडीचे (बंडवूड) रोगमुक्ततेसंबंधी प्रमाणपत्र कार्यक्रम राबविणे.
❇️ मातृवृक्षाची निवड करताना रोगांचे निदान करून रोगमुक्त मातृवृक्षापासून कलम कांडीने निवडणे.
❇️ रोगाचा प्रसार होऊ नये, याची विशेष काळजी घ्यावी. यासाठी रोगमुक्त नोंदणीकृत असलेल्या रोपवाटिकेतून रोपे/कलमा घ्याव्यात.
❇️ टेट्रासाइक्लीन हाईड्राक्लोराईड 6 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात 45 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी तसेच झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्याची पावडर प्रत्येकी 200 ग्राम घेऊन झाडाच्या आळ्यामध्ये (बेसीनमध्ये) टाकावे.
❇️ सिट्रस सायला या रोग प्रसारक (व्हेक्टर) किडीचे नवतीच्या हंगामात योग्य कीटकनाशक वापरून वेळीच नियंत्रण करावे.
❇️ या रोगाची लक्षणे दिसणाऱ्या फांद्याची छाटणी केल्याने जीवाणूंचा संचय होणे टाळता येताे. या जीवाणूची हालचाल संसर्ग झालेल्या झाडांमध्ये फार संथ गतीने होते. त्यामुळे ज्या फांद्यामध्ये लक्षणे दिसतात फक्त त्यांनाच कापावे.
❇️ जास्त प्रमाणात संसर्ग झालल्या म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग झालेल्या झाडांना मुळासकट उपटून जाळून टाकावे.
❇️ सायला किडींची संख्या कमी असल्यावर झाडाची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या नष्ट कराव्या अन्यथा या रोगाचा प्रसार प्रादुर्भाव झाडे व सायला कीड अशा दोन्ही कारणांमुळे जलद गतीने होईल.
❇️ गोडलिंबाचे झाड हे सिट्रस सायला किडीचे पर्यायी खाद्य (होस्ट) आहे. त्यामुळे बगीचाच्या परिसरात किंवा आजूबाजूला गोडलिंबाची झाडे लावावी.