krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon rain : परिस्थिती अति अनुकूल पण पाऊस घाट माथ्यावरच, चित्र निराशाजनक

1 min read
Monsoon rain : मुंबई व काेकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या पावसाच्या दृष्टीने सर्व बाबी अति-अनुकूल असल्या तरी पाऊस (Monsoon rain) मात्र घाट माथ्यावरच रेंगाळत आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रासाठी सध्याचे चित्र किमान आठवडाभरासाठी तरी विशेष आशादायी नाही.

🌐 अति-अनुकूल परिस्थितीची कारणे
सध्या गेल्या चार दिवसांपासून म्हणजेच मंगळवार (दि. 4 जुलै)
✳️ मान्सून-ट्रफ (Monsoon-trough)
✳️ ऑफ-शोर-ट्रफ (off-shore-trough) गुजरात ते केरळ अरबी समुद्र संपूर्ण पश्चिम किनारपट्टी
✳️ 19 डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यानचा 4 ते 6 किमी उंचीवरील 2 किमी हवा जाडीत पूर्व-पश्चिम असा एकमेकाविरोधी वाहणारा वारा (blowing wind) व दिशा बदल
✳️ अरबी समुद्रातील महाराष्ट्रात व गुजरात किनारपट्टी सीमाक्षेत्र बेचक्यात 2 ते 6 किमी उंचीवरील 4 किमी हवा जाडीत गोलाकार चक्रीय वारा (Circular wind) स्थिती
✳️ झारखंडच्या भू-भागावर खालच्या पातळीतील उंचीवरील गोलाकार चक्रीय वारा स्थिती
इत्यादी मान्सून काळातील या सर्व वातावरणीय पाच मुख्य प्रणाल्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्यासाठी अति-अनुकूल असूनही अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अगदीच तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडत आहे. परंतु, जो पडतो आहे, तो मान्सूनी पावसाला साजेसा असा अधिक क्षेत्र व्यापकतेचा, दीर्घ कालावधीचा व एका संथ लयीतल्या पडणाऱ्या गुणधर्माचा जाणवत नाही.

🌐 आजपासून (शुक्रवार, दि. 7 जुलै) पुढील सहा दिवस म्हणजे बुधवार (दि.12 जुलैपर्यंत) कोकण व पूर्व विदर्भातील तीन जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील 18 जिल्ह्यात पावसाची तीव्रता अजून कमी होवून केवळ मध्यमच पावसाची शक्यता जाणवते. हा पाऊस फक्त घाट माथ्यापर्यंतच मर्यादित आहे.

🌐 20 जुलैपर्यंत अशी अवस्था राहिली तर आश्चर्य वाटायला नको. 21 जुलै नंतरच्या आठवड्यात मान्सून पुन्हा उर्जीतावस्थेत येऊ शकतो. तोपर्यंत वाट बघा, लक्ष ठेवा या फेजमधून जावे लागते की काय, असे वाटते.

🌐 मान्सून-ट्रफ अंतर्गत वातावरणीय प्रणाली अरबी समुद्रातील महाराष्ट्रात-गुजरात किनारपट्टी सीमाक्षेत्र बेचक्यात 2 ते 6 किमी उंचीवरील 4 किमी हवा जाडीत गोलाकार चक्रीय वारा स्थितीनुसार मान्सून देशाच्या वायव्यकडे जर सरकून उत्तर विदर्भ व पूर्व मध्य प्रदेश दरम्यान एक-दोन दिवस स्थिरावला तर त्यातून महाराष्ट्राच्या टंचाईग्रस्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा करू या!

🌐 महाराष्ट्रासाठी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असूनही जर अर्धा महिना (15 जुलैपर्यंत) अशीच अवस्था असणार असेल आणि उरलेल्या अर्ध्या महिन्याची सरासरी जर कोकण व पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यातील जोरदार पावसाने भरून निघणार असेल तर, पाऊस वितरणाची ही असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. 21 ते 27 जुलै या आठवड्यातील पावसावरच या सरासरीची भिस्त अवलंबून असेल.

🌐 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील (10+8+8) 26 जिल्ह्यात चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी व पेर झालेल्या नाजूक रोपट्यांसाठी पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. या क्षेत्रात बऱ्याच पेरण्या (Sowing) बाकी आहेत. ज्या संयमी जाणकार शेतकऱ्यांनी राज्य कृषी खाते (Department of Agriculture) व केंद्रीय हवामान खात्याच्या (Central Meteorological Department) सूचनाकडे लक्ष दिले, असेच शेतकरी दुबार-पेरणी व वायफळ गुंतवणुकीपासून सुरक्षित आहेत. अर्थात महाराष्ट्रातील तुरळक काही ठिकाणी बियाणे उतरून पडेल, इतपत पेरणी योग्य पाऊस 6 व 7 जुलैपर्यंत झाला आहे. अशा सर्व ठिकाणी पेर करण्यास हरकत नसावी. मात्र, एकदम बाखर ओलीवर मात्र पेरणी मुळीच करू नये.

🌐 संपूर्ण देशात सध्या या आठवड्यात सगळीकडे जोरदार पाऊस होत आहे. मात्र, फक्त कोकण व काहीसा विदर्भ (10 जिल्हे) वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 26 व सीमांध्रतील रायलसीमा भागातील 8 जिल्ह्यासह संपूर्ण तामिळनाडू व तेलंगणा राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातही मान्सून ट्रफ सरासरी जागेपेक्षा उत्तरेकडे सरकणे तसेच ‘मॅडन जूलीयन ऑसीलेशन’ही (Madden Julian Oscillation) पुढील दाेन आठवडे पावसासाठी पूरक जाणवत नाही.

🌐 पावसापासून मनुष्य व वित्त हानी होवू नये व प्रशासनाला कृती कार्यवाही करता यावी म्हणून हवामान खात्याकडून लाल ते पिवळ्या रंगापर्यंत पावसाच्या तीव्रतेनुसार लघु कालावधीचे (पाच दिवसांचे) धोक्याचे इशारे (Alerts) दिले जातात. परंतु, प्रत्यक्ष तो दिवस उजाडेपर्यंत जर वातावरणात काही बदल झाल्यास हवामान खात्याकडून एका पायरीने चढ किंवा उतार करून सुधारणा केली जाते व तसे सूचित केले जाते. अंदाजाच्या अचूकतेकडे जाण्याचा हा प्रयत्न असतो.

🌐 ‘नोआ’च्या (National Oceanic and Atmospheric Administration) म्हणण्यानुसार 8 जूनलाच ‘एल-निनो’ (El Nino) विकसित झाला तर, ‘आयएमडी’च्या (India Meteorological Department) अहवालनुसार सध्या ‘एन्सो’ (ENSO – El Nino-Southern Oscillation ) न्यूट्रल (Neutral) अवस्थेत म्हणजे ना ‘एल-निनो’ (El Nino) ना ‘ला-निना’ (La Nina) अशी स्थिती आहे. येणाऱ्या पावसाळ्यात एल-निनो विकसित होईल. म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यात पावसात घट ही होवू शकते. शिवाय ‘आयओडी’ ही ना धन (Positive) ना ऋण (negative) अशा अवस्थेत आहे. म्हणजे ही स्थिती मान्सूनच्या पावसासाठी घातक नसली तरी पूरकही नाही. वातावरणाची सध्यस्थिती संपर्ण देशात निर्माण झाली आहे. एकंदरीत कितीही विधायक व सकारात्मक शक्यता मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत मांडल्या तरी स्मरण असावे एल-निनोचे असेच सध्यातरी म्हणावे लागेल.

🌐 सध्याच्या वातावरणातील ही जटीलता एटमोस्फेरिक फिजिक्समधील ‘गतिक हवामानशास्र’ (Dynamic meteorology) या उपविषयातील हवामान घटकांची सूक्ष्म पातळीवरील गतिशीलतेवर (mobility) आधारित आहे. सध्याचा वातावरणीय गुंतागुंतीचा खेळ हा त्याचाच परिणाम समजावा.

🌐 खरे तर, वैज्ञानिकांना हे एक आव्हानच वाटू लागले आहे. याच ठिकाणी वैज्ञानिक हे आव्हान तर स्वीकारतीलच. पण, पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणेही कसा गुंतागुंतीचा खेळ असतो, याचीही नोंद या निमित्ताने जनसामान्यांच्या मनी असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!