krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

BRS, KCR : गुलाबी चित्राची दुसरी बाजू

1 min read
BRS, KCR : तिसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो तर पाऊस झालेला होता. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. रस्त्यावर वाळायला घातलेल्या धानाच्या (भाताच्या) खाली पाणी जाऊन ते खराब झाले होते. शेतकरी कॉक्रीटच्या रस्त्यावर धान पसरवून वळवित होते. नैसर्गिक आपत्तीची किती नुकसान भरपाई मिळते, असे विचारले असता, काहीच देत नाहीत असे म्हणाले. तिकडे पीकविमा नाही अन् कर्जमाफी सुद्धा मिळलेली नाही. ही शेतकऱ्यांनी दिलेली माहिती. एकूणच केसीआर(KCR)च्या नेतृत्वाखाली दाखवले जाणारे तेलंगणाचे गुलाबी चित्र इतके गुलाबी नाही.

राज्यात यांचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढला आहे. राज्याची सत्ता केसीआरच्या कुटुंबीयांच्या हातात आहे. मुलगा , मुलगी, जावई, साडूचा मुलगा ही मंडळीच सर्व कारभार पहातात. केसीआरची मुलगी कविता ही मागील लोकसभेत मुख्यमंत्र्याची मुलगी असताना निझामाबाद मतदारसंघात हारली. तिच्या भ्रष्टाचाराला व दादागिरीला निझामाबाद परिसरातील व्यापारी व जनता वैतागली होती. ते इतके खराब आहे मग निवडून कसे येतात, असा प्रश्न आम्ही केला तर एमआयएमची साथ आहे म्हणून निवडून येतात. बीआरएस (BRS – Bharat Rashtra samiti)चे काम खरच इतके चांगले असते तर त्यांना निवडणुकीत दारू, कोंबड्या व पैसे वाटण्याची गरज का पडावी?

कालेश्वरम उपसा जलसिंचन प्रकल्पाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. या प्रकल्पामुळे काही क्षेत्र सिंचन खाली आले आहे, पण यात नवीन काही नाही. असे प्रकल्प इतर राज्यात आहेत. तसेच कलमेश्वर प्रकल्पाचे जनरेट मागील पुरात पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. असे तेथील जाणकार सांगत होते. शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल झाले आहेत. काहींनी तेलंगणाचा सरकारी दौरा केला. सरकारी लोकांनी जे गुलाबी गुलाबी आहे, तेच त्यांना दाखवले व ही मंडळी त्याला भाळली. काहींनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे भले होईल, या आशेने बीआरएस स्वीकारले. पण, काहींनी केवळ बीआरएसकडे खूप पैसा आहे. आपण लटकून राहिलो तर काही न काही ओघळ आपल्यापर्यंत येईल व आपल्याला बरे दिवस येतील म्हणून बीआरएसमध्ये गेले आहेत.

शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीची बीआरएस बरोबर युती करून निवडणूक लढविण्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी काही नेत्यांना संवाद करण्याची जवाबदारीही दिली होती. पण केसीआरने छत्रपती संभाजीनगर येथील भाषणात खाजगीकरणाला विरोध करीत थेट राष्ट्रीयकरणाची भाषा केल्यामुळे एका स्वातंत्र्यवादी पक्षाला बीआरएस बरोबर युती करणे शक्य होणार नाही, असे दिसते. महाराष्ट्रातील सभांमध्ये केसीआर यांनी तेलंगणात शेतीसंबंधी दस्तऐवजाच्या डिजिटलायजेशनवर बराच भर दिला. तलाठी व्यवस्था हटविली आहे व सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध होते, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सुद्धा बरीच कागदपत्रे आता सेतू कार्यालयातच ऑनलाइन मिळतात व काही चुकांची दुरुस्ती करावयाची असल्यास तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी अशी महसूल यंत्रणा आहे. तेलंगणात मात्र महसूल यंत्रणेचे सर्व अधिकार संपवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत व शेतकऱ्यांना थेट मंत्रालयातच संपर्क करावा लागतो आहे. तेथील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने थेट मुख्य सचिवांनाच न्यायालयात बोलवले व या प्रकाराबाबत जाब विचारला होता, अशी माहिती एका जेष्ठ वकिलांनी आम्हाला दिली.

राज्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी कोणतेही नवे उद्योग नसल्यामुळे बेकारीचे प्रमाण खूप वाढले आहे. शेती धंदा अजूनही तोट्यात आहे. त्यामुळे तरुण वर्ग शेतीकडे पाठ फिरवित आहे व महाराष्ट्रासारखीच शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न न होण्याची समस्या तिथे ही मोठ्या प्रमाणात आहे. तेलंगणात शेतीसाठी सिंचनाला प्राधान्य देऊन योजना राबविल्या, हे कौतुकास्पद आहे. पण, फुकट वाटप योजनांमुळे राज्य कर्जबाजारी झाले आहे. छोटे राज्य असून, ही आज तेलंगणावर आज 4.33 लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. म्हणजे दरडोई 1 लाख 25 हजार रुपये. हे सर्व पहाता तेलंगणा मॉडेल हे फार यशस्वी मॉडेल आहे असे वाटत नाही. मी जे लिहिले आहे ते सप्रमाण आहे. शेतकऱ्यांशी बोलतानाचे व्हिडीओ आहेत. कोणाला खात्री करायची असेल तर माझ्याकडे येऊन पाहू शकता. ही महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांशी तुलना नाही. फक्त बीआरएसने केलेले दावे किती खरे, किती खोटे याची पडताळणी करण्याचा प्रयत्न आहे.

शेवटी एकच म्हणेल की, जे आर्थिक किंवा राजकीय लाभासाठी बीआरएसमध्ये जात आहेत, त्यांनी खुशाल जावे. पण जे शेतकऱ्यांचे भले होईल या आशेने (किंवा शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी) बीआरएसमध्ये जात आहेत, त्यांनी एकदा तेलंगणाचा ग्रामीण भागाचा दौरा करावा, शेतकऱ्यांशी बोलावे व पटले तरच प्रवेश करावा. आयुष्यभर चळवळीत कमावलेली प्रतिष्ठा अशी गमावू नये. महाराष्ट्रातील राज्यकर्ते लबाड आहेत, म्हणून बीआरएसमध्ये प्रवेश करत असाल तर, आगीतून निघून फुपाट्यात प्रवेश करण्यासारखे आहे, हे मात्र नक्की! (समाप्त)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!