Rainy weather : अवकाळी पावसाचे वातावरण आणखी किती दिवस राहणार?
1 min read✴️ अवकाळी पावसाचे वातावरण आठवडाभर असले तरी आजपासून (दि. 28 एप्रिल) पुढील 4 दिवस म्हणजे सोमवार दि. १ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाची तीव्रता अधिक जाणवते.
✴️ मध्य महाराष्ट्रातील विशेषतः खानदेशातील अकराणी, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर, एदलाबाद परिसरात अवकाळी पावसाचे वातावरण अधिक जाणवेल. शुक्रवारी (दि.28 एप्रिल) गारपिटीची शक्यता ह्या भागात जाणवते. उर्वरित खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यात सोमवार (दि.1 मे) पर्यंत ठिकठकाणी ढगांच्या गडगडाटांसह पावसाच्या तुरळक सरी काेसळण्याची शक्यता जाणवते. सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात तीव्रता अधिक जाणवेल. शुक्रवारी (दि.28) संपूर्ण मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही.
✴️ मुंबईसह कोकणात मात्र शुक्रवार (दि. 28) व शनिवार (दि. 29) तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. रविवार (दि. 30 एप्रिल)पासून अवकाळी पावसाचे वातावरण निवळू शकते.
✴️ मराठवाड्यात संपूर्ण आठवडा म्हणजे गुरुवार (दि. 4 मे) पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण टिकून राहणार असले तरी शुक्रवार (दि. 28) व शनिवार (दि. 29) पर्यंत पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. विशेषतः नांदेड, लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात या वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल.
✴️ विदर्भात मात्र संपूर्ण आठवडा म्हणजे गुरुवार (दि. 4 मे) पर्यंत अवकाळी पावसाच्या वातावरणासह पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. शुक्रवार (दि. 28) व रविवार (दि. 30) या तीन दिवसात काही ठिकाणी गारपीट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल. शुक्रवार (दि. 28) व रविवार (दि. 30) पर्यंत संपूर्ण विदर्भात जोरदार अवकाळी पावसासह सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
✴️ पुढील तीन दिवसात म्हणजे रविवार (दि. 30 एप्रिल)पर्यंत महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू 2 डिग्रीने सरासरीपेक्षा घसरून आल्हाददायक वाटेल. पुढील पाच दिवसात कोणत्याही उष्णतेच्या लाटीची शक्यता सध्या महाराष्ट्रात जाणवत नाही.
✴️ बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला, कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर व सभोवतालच्या परिसरापर्यंत तेथे सुरू असलेल्या पश्चिमी प्रकोपातील साखळ्यांमुळे पाऊस, बर्फवृष्टी, मधूनच गारपीट इत्यादीमुळे शुक्रवार (दि. 28 एप्रिल)पासून मंगळवार (दि. 2 मे)पर्यंत सध्याचे वातावरण गैरसोयीचे होवू शकते.
✴️ सिझननुसार घडणाऱ्या प्रणल्यांनुसारच देशात पूर्व-मोसमी (मार्च, एप्रिल, मे – तीन महिने) या सिझनमधील वारा खंडितता ही प्रणाली ठळक वैशिष्ट्यांची आहे. मात्र, यावर्षी तिचा कालावधी अधिक म्हणजेच 50 दिवस टिकून राहिला व अजूनही आहे. शिवाय, या प्रणालीचा आस सरासरी जागेपेक्षा वायव्येकडे (उत्तर महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत) दोलायनात झुकल्यामुळे महाराष्ट्रात या वर्षी अवकाळी पावसाचा परिणाम अधिक जाणवला व अजूनही जाणवत आहे. म्हणूनच वारा खंडितता या प्रणालीचा प्रभाव अजूनही टिकून असल्यामुळे आज हवेचा निर्वात दाबाचा आस (ट्रफ) समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत मालदीवपासून अरबी समुद्राहून मध्य महाराष्ट्रपर्यंत पसरलेला आहे. त्यामुळेच विदर्भासह मध्य भारतात अवकाळी वातावरणाचा परिणाम सध्या जाणवत आहे.(ही माहिती हवामान साक्षरतेसाठी समजावी.)