krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton production prices : कापसाचे उत्पादन घटूनही दर दबावातच का?

1 min read
Cotton production prices : चालू आठवड्यात कापसाचे दर (Cotton prices) प्रति क्विंटल 450 ते 500 रुपयांनी तसेच सरकीचे (cotton seed) दर प्रति क्विंटल 200 ते 250 रुपयांनी उरतले आहेत. याच आठवड्यात काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया (Cotton Association of India)सह अन्य तीन महत्त्वाच्या संस्थांनी देशभरातील कापूस उत्पादनाचा घटलेला अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे, कापसाचा वापर आणि मागणीत थाेडी वाढ झाल्याचे या संस्थांनी त्यांच्या रिपाेर्टमध्ये नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कापसाची दरवाढ अपेक्षित असताना कमी उत्पादनाचे (production) भांडवल करून कापड उद्याेग कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (import duty) कमी करणे व त्यातून कापसाची आयात वाढविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे.

🌎 उत्पादनासाेबतच अंदाजही घटला
सन 2022-23 च्या कापूस हंगामाच्या (1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर) सुरुवातीला (ऑक्टाेबर 2022 काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया (Cotton Association of India)ने देशभरात एकूण 375 लाख गाठी (170 किलाे रुई) कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला हाेता. सीएआयने डिसेंबर 2022 मध्ये त्यांचा अंदाज 352 लाख गाठी, जानेवारी 2023 मध्ये 345 लाख गाठी, मार्च 2023 मध्ये सीएआयने 321.50 लाख गाठी आणि एप्रिल 2023 मध्ये 303 लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. यूएसडीए (United States Department of Agriculture)ने सुरुवातीला 362 लाख गाठी, जानेवारी 2023 मध्ये 339 लाख गाठी, फेब्रुवारी 2023 मध्ये 326.58 लाख गाठी आणि नंतर 313 लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला हाेता. कमिटी ऑफ काॅटन प्राॅडक्शन ॲण्ड कन्झमशन (Committee of Cotton Production and Consumption)ने त्यांचा अंदाज 365 लाख गाठींवरून 337 लाख गाठींवर आणला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते 337.23 लाख गाठी तर टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजच्या सूत्रांच्या मते देशात किमान 330 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या हंगामात देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टर वाढल्याने उत्पादनात वाढल्याने या संस्थांनी त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाजही वाढविला हाेता. मात्र, बाजारातील कापसाची आवक आणि घटते उत्पादन विचारात घेत या संथांनी त्यांच्या अंदाजातही घट केली.

🌎 रुईचे दर स्थिर, सरकीच्या दरात चढ-उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात दाेन महिन्यांपासून रुईचे दर 96 ते 99 सेंट प्रति पाउंड दरम्यान स्थिर आहेत. भारतात मध्यंतरी सरकीचे दर प्रति क्विंटल 3,300 रुपयांवर गेल्याने कापसाच्या दराने आठ हजार रुपयांवर मजल मारली हाेती. हे दर सध्या 200 ते 300 रुपयांनी कमी झाल्याने कापसाचे दर परत 8,000 रुपये प्रति क्विंटलवरून 7,600 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. देशांतर्गत बाजारात रुईचे दर प्रति खंडी (356 किलाे रुई) 61,000 ते 63,000 रुपये दरम्यान स्थिर आहेत. मागील वर्षी हेच दर प्रति खंडी 1 लाख ते 1 लाख 11 हजार रुपयांवर पाेहाेचले हाेते. येत्या महिनाभरात सरकीच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड (Cotton Advisory Board)चे माजी सदस्य तथा जिनर विजय निवल यांच्यासह इतर जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली.

🌎 बाजारात कापसाची आवक वाढतेय
मागील वर्षीच्या तुलनेत या हंगामात देशांतर्गत बाजारातील कापसाची आवक (arrival) सुरुवातीपासून कमी राहिली आहे. 1 ऑक्टाेबर 2021 ते 19 एप्रिल 2022 या काळात देशभरात 251.59 लाख गाठी तर 1 ऑक्टाेबर 2022 ते 19 एप्रिल 2023 या काळात 215.20 लाख गाठी कापूस बाजारात आला. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत कापसाची आवक 36.39 लाख गाठींनी कमी हाेती. 1 ऑक्टाेबर 2021 ते 27 एप्रिल 2022 या काळात 255.84 लाख तर 1 ऑक्टाेबर 2022 ते 27 एप्रिल 2023 या काळात 225.39 लाख गाठी कापूस बाजारात आल्याने ही आवक 30.45 लाख गाठींनी कमी आहे. 22 नाेव्हेंबर 2022 पर्यंत ही आवक 27.16 लाख गाठी,29 डिसेंबर 2022 पर्यंत 49.83 लाख गाठी, 28 जानेवारी 2023 पर्यंत 61.36 लाख गाठी, 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत 57.52 लाख गाठी तर 16 मार्च 2023 पर्यंत बाजारातील कापसाची आवक 95.46 लाख गाठींनी कमी हाेती.

🌎 निर्यातीऐवजी आयातीसाठी दबाव
सन 2021-22 च्या हंगामात भारताने 48 लाख गाठी कापसाची निर्यात (export) केली हाेती. सन 2022-23 च्या हंगामात 30 एप्रिल 2023 पर्यंत किमान 20 लाख गाठी कापूस निर्यातीचे साैदे झाले नाहीत. या हंगामात किमान 50 लाख गाठी कापूस निर्यात झाला असता तर देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर आणखी वधारले असते. केंद्र सरकारने चालू हंगामात कापसाची निर्यात वाढविण्यास प्राेत्साहन देण्याऐवजी हंगामाच्या सुरुवातीलाच कापूस आयातीला (import) परवानगी दिली. त्यामुळे जून ते सप्टेंबर 2022 या चार महिन्यात 16.12 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आली. ही आयात स्वस्तात पडावी म्हणून केंद्र सरकारने 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टाेबर 2022 या काळात कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (import duty) शून्यावर आणला हाेता. केंद्र सरकारने हा शेतकरी विराेधी निर्णय देशातील टेक्सटाईल आणि गारमेंट उद्याेजक लाॅबीच्या दबावापाेटी घेतला हाेता. यासह इतर तांत्रिक बाबींमुळे कापसाचे दर सुरुवातीपासून दबावात ठेवण्यात आले.

🌎 आयात वाढविण्यासाठी घटलेल्या उत्पादनाचा वापर
देशातील कापसाचे उत्पादन घटले आहे. कापसाच्या कमी पुरवठ्यामुळे टेक्सटाईल आणि गारमेंट उद्याेग संकटात सापडले आहेत. या व तत्सम बाबींचा वापर करीत टेक्सटाईल आणि गारमेंट उद्याेजकांनी केंद्र सरकार व बाजारात सायकाॅलाॅलिकल प्रेशर (Psychological pressure) तयार केले जात आहे. यासाठी उद्याेजक सीएआय व तत्सम संस्थांचा वापर करीत आहे. कापसाची सहज आयात करता यावी, यासाठी कापूस उत्पादन घटल्याची आकडेमाेड केली जात आहे. यातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून आयात शुल्क शून्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. खरं तर सरकारने कापसाची निर्यात वाढवायला हवी.शिवाय, कापसाच्या निर्यातीत सातत्य ठेवून केंद्र सरकारने कापूस निर्यातीला साखरेप्रमाणे अनुदान द्यायला हवे, असे मत बाजार तज्ज्ञ तथा शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. सूत आणि कापडाची मागणी घटल्याने कापसाचे दर दबावात आल्याची माहिती कापड उद्याेजकांनी दिली असली तरी ही लाॅबी कापसाच्या आयातीसाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करीत आहे.

🌎 कापसाची आवक स्थिर ठेवा
सध्या अडचणीचा काळ असल्याचे कापूस दरवाढीची चिन्हे दिसत नाही. या महिन्यात (एप्रिल) कापसाची आवक वाढली तर दर कमी हाेतील. परंतु, शेतकऱ्यांनी न घाबरता मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दरवाढीची शक्यता असल्याने थाेडे थांबून कापूस विक्रीचे नियाेजन करावे, असा सल्ला कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गाेविंद वैराळे यांनी दिला. बाजारात कापसाची आवक वाढली तर दर कमी हाेणार आहेत. दर खाली येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी, असे आवाहन एमसीएक्स-पीएसी (काॅटन)चे सदस्य दिलीप ठाकरे यांनी केले आहे. सध्या कापसाची दरवाढ ही सरकीच्या दरावर अवलंबून आहे. सरकीची मागणी घटल्याने दर कमी झाले असून, आगामी काही दिवसात ते वधारण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड (Cotton Advisory Board)चे माजी सदस्य तथा जिनर विजय निवल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!